वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-सिंगापूर @60: विकास आणि सहभागासाठी भागीदारी
प्रविष्टि तिथि:
04 OCT 2025 6:47PM by PIB Mumbai
भारत आणि सिंगापूरमधील राजनैतिक संबंधांच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त सिंगापूरमध्ये 4 ऑक्टोबर 2025 रोजी "भारत-सिंगापूर @60: विकास आणि सहभागासाठी भागीदारी" हे व्यवसाय सत्र यशस्वीरित्या पार पडले. हा कार्यक्रम फिक्की, भारतीय उद्योग महासंघ आणि असोचाम यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात गेल्या सहा दशकांतील राजनैतिक संबंधांच्या परिवर्तनात्मक प्रगतीचे कौतुक केले, तसेच विश्वास, परस्पर आदर आणि व्यापक सहकार्य यावर आधारित भविष्यातील द्विपक्षीय संबंधातील आशादायी संधींचाही त्यांनी उल्लेख केला. विशेषतः शाश्वतता, डिजिटायझेशन, कौशल्यविकास, आरोग्यसेवा, प्रगत उत्पादन आणि संपर्कप्रणाली यासारख्या विविध क्षेत्रातील व्यापक सहकार्यावर त्यांनी भर दिला.
सिंगापूर प्रजासत्ताकाच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री गान सिओ हुआंग यांनी दोन्ही राष्ट्रांमधील दृढ आणि ऐतिहासिक संबंध पुन्हा अधोरेखित केले. मजबूत आर्थिक नाते तसेच लोकांचा परस्पर संबंध यामुळे या भागीदारीला बळ मिळते असे त्यांनी नमूद केले. त्यांनी भारतासोबत व्यापार, गुंतवणूक आणि नवोन्मेष-आधारित सहकार्य मजबूत करण्याच्या सिंगापूरच्या दृष्टिकोनाबद्दल सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमात दोन्ही देशातील मजबूत आर्थिक संबंधांवर भर देण्यात आला तसेच तंत्रज्ञान, डिजिटल परिवर्तन, हरित ऊर्जा आणि कौशल्यविकास, औद्योगिक पार्क, पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा यासह इतर क्षेत्रात नवीन युगाच्या संधींचा फायदा घेऊन दोन्ही देशांमधील सहयोगी संधींचा वेध घेण्यात आला.
या व्यवसाय सत्राचा समारोप मेजवानीने झाला, ज्यामुळे सहभागी सदस्यांमध्ये गहन संवादाला चालना मिळाली आणि ठोस व्यावसायिक परिणामांसाठी मार्ग मोकळा झाला.
गोलमेज परिषदेच्या सोबतीला, सहकार्याचे मार्ग शोधण्यासाठी आघाडीचे जागतिक गुंतवणूकदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले. या बैठकांमध्ये सहकार्याच्या संधींचा शोध घेण्यात आला
उच्चस्तरीय राजनैतिक सहभाग
तीन दिवसांच्या भेटीदरम्यान एक महत्त्वाचा क्षण म्हणजे सिंगापूर प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांच्या समवेत इस्ताना इथे झालेली बैठक. यावेळी झालेल्या चर्चेत भारत आणि सिंगापूरमधील दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीला पुन्हा पुष्टी मिळाली. सामायिक मूल्ये, मजबूत आर्थिक संबंध, नवोन्मेष आणि शाश्वततेवरील भर यावर ती आधारित आहे.
भारतीय व्यवसाय प्रतिनिधी मंडळाशी संवाद
भारतीय व्यावसायिक प्रतिनिधी मंडळाशी संवाद साधून या बैठकीचा समारोप झाला. यामुळे धोरणात्मक प्राधान्यक्रम गुंतवणूकदारांच्या अपेक्षांशी संरेखित करण्यासाठी एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाले. परिणामी प्रादेशिक आणि जागतिक बाजारपेठांमध्ये विस्तारित सहकार्याचा मार्ग मोकळा झाला.
या चर्चेतून भारताच्या विकास प्रवासात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून सिंगापूरचे स्थान अधोरेखित झाले, असे याप्रसंगी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच वित्त, ऊर्जा संक्रमण, तंत्रज्ञान आणि शाश्वत पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये मजबूत संबंध निर्माण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी झाली.
***
निलिमा चितळे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2174904)
आगंतुक पटल : 23