संरक्षण मंत्रालय
व्हाईस ॲडमिरल राहुल गोखले यांनी स्वीकारला पश्चिम नौदल कमांडच्या कर्मचारीवृंद पदाचा कार्यभार
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2025 7:35PM by PIB Mumbai
युद्ध सेवा पदक, तसेच नौदल पदक विजेते व्हाईस ॲडमिरल राहुल विलास गोखले, यांनी दिनांक 01 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत पश्चिम नौदल कमांडच्या (Western Naval Command) चीफ अॉफ स्टाफ (Chief of Staff) कर्मचारीवृंद प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. नौदल सेवेत प्रदीर्घ आणि अद्वितीय अनुभव असलेले ॲडमिरल गोखले हे महत्त्वाचे स्थान भूषवणार आहेत.
ॲडमिरल गोखले हे पुण्यातल्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी वेलिंग्टन इथले डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, गोव्यातले नौदल युद्ध महाविद्यालय आणि ऑस्ट्रेलियातल्या कॅनबेरा इथल्या ऑस्ट्रेलियन डिफेन्स कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
नौकानयन आणि दिशा या विषयातले तज्ज्ञ असलेल्या ॲडमिरल गोखले यांनी विविध महत्त्वाच्या कमांडची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या नियुक्तींमध्ये आयएनएस कोराचे कार्यकारी अधिकारी, तसेच आयएनएस खुकरी आणि कोलकाताचे समादेशक अधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी पूर्व आरमाराचे फ्लीट ऑपरेशन्स अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.
ॲडमिरल गोखले यांनी नौदल मुख्यालयात नौदल योजना संचालनालय, परदेशी सहकार्य संचालनालय आणि कार्मिक संचालनालय इथे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. तसेच, त्यांनी इस्लामाबाद इथल्या भारतीय उच्चायुक्तालयात नौदल सल्लागार म्हणूनही देशाची सेवा केली आहे. ध्वज अधिकारी (Flag Rank) पदावर बढती होण्यापूर्वी, त्यांनी पूर्वेकडच्या किनारपट्टीवरील सर्वात आद्य आणि प्रतिष्ठित नौदल आस्थापना असलेल्या आयएनएस सिरकार्सचे नेतृत्व केले.
समुद्री प्रशिक्षण ध्वज अधिकारी (Flag Officer Sea Training) म्हणून काम पाहताना, समुद्रातल्या सर्व प्लॅटफॉर्मच्या कार्यात्मक प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतल्या नौदल मुख्यालयात सहाय्यक मनुष्यबळ प्रमुख (मानव साधनसंपत्ती विकास) म्हणून सेवा केला आणि पश्चिम नौदल कमांडच्या चीफ अॉफ स्टाफ पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी त्यांनी भारतीय नौदलाच्या पश्चिमी आरामाराचे नेतृत्व केले.

***
गोपाळ चिप्पलकट्टी / निखिलेश चित्रे / परशुरांम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2174664)
आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English