वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
दोन्ही देशातील धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला सिंगापूरचा अधिकृत दौरा
Posted On:
03 OCT 2025 6:36PM by PIB Mumbai
भारत आणि सिंगापूर यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी तीन दिवसांचा अधिकृत सिंगापूर दौरा केला. या भेटीत भारताची भक्कम विकास गाथा, गुंतवणूक केंद्रित सुधारणांप्रती वचनबद्धता आणि उत्पादकता, पायाभूत सेवा, वित्तीय सेवा आणि हरित अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात दोन्ही भागीदार देशांना असलेल्या अफाट संधींना अधोरेखित करण्यात आले.
गोयल यांनी सिंगापूरच्या नेतृत्वासोबत घेतलेल्या भेटीदरम्यान, सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, नवोन्मेष आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये सहकार्य वाढवणे आणि शाश्वत विकासात नवीन संधी शोधणे इत्यादी मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली. याशिवाय त्यांनी सिंगापूरचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. विवियन बालकृष्णन यांचीही भेट घेतली. प्रादेशिक आणि जागतिक आर्थिक प्राधान्य असलेल्या धोरणात्मक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी आपल्या चर्चेत विचारविनिमय केला. तर सिंगापूरचे उप पंतप्रधान आणि व्यापार आणि उद्योग मंत्री गैन किम योंग यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत, भारत आणि सिंगापूरमधील औद्योगिक आणि व्यापार सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली.
या भेटीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उत्पादन क्षेत्रातील परकीय थेट गुंतवणुकीसंदर्भात यावेळी झालेल्या व्यापारविषयक गोलमेज परिषदेत AmCham, EuroCham, जर्मन चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्स आणि इतर उद्योगधुरीणांनी भाग घेतला. या परिषदेत प्रमुख भाषण देताना पीयूष गोयल यांनी भारताची वेगवान आर्थिक वृद्धी, गुंतवणुकीला पोषक योजना आणि जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थान मिळवण्याच्या दृष्टीने सुरु असलेले धोरणात्मक उपक्रम यांविषयी सविस्तर माहिती दिली.
या नेतृत्त्वविषयक भेटीगाठींबरोबरच गोयल यांनी सिंगापूर मधील प्रमुख कॉर्पोरेट आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांशी व्यावसायिक बैठका घेतल्या. गोयल यांनी एसआयए इंजिनिअरिंग कंपनी सोबत झालेल्या बैठकीत, भारतातील वेगाने वाढणाऱ्या 'देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल'(एमआरओ) क्षेत्रावर आणि भारतीय विद्यापीठांच्या सहकार्याने एमआरओ व्यावसायिकांसाठी भारत-सिंगापूर कौशल्य केंद्र जलद गतीने सुरू करण्याची गरज यावर चर्चा केली. कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंटने महाराष्ट्रातील डेटा सेंटरसाठी अक्षय ऊर्जा उपायांचा विस्तार करण्याची वचनबद्धता व्यक्त केली, तसेच औद्योगिक उद्याने, कामगार गृहनिर्माण मॉडेल्स आणि पत वित्त पुरवठ्यातील संभाव्य संधींचा शोध याविषयी चर्चा केली. रॉयल गोल्डन ईगल कंपनीने भारतातील त्यांच्या टिशू आणि पल्प ऑपरेशन्सबद्दल ची माहिती सामायिक केली तसेच ऑपरेशनल पातळीवर येणाऱ्या आव्हानांवर चर्चा केली तसेच शाश्वत वनीकरण आणि पुनर्वनीकरण पद्धतींवरील ज्ञानाच्या देवाणघेवाणीत उत्सुकता दाखवली. गोयल यांनी जीआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन येओ आणि टेमासेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलहान पिल्ले यांच्याशीही बैठका घेतल्या, या चर्चेदरम्यान पायाभूत सुविधा, आतिथ्य, अक्षय ऊर्जा, वित्तीय सेवा आणि शहरी विकास यांसारख्या भारत-केंद्रित क्षेत्रात लक्ष लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात आला.
गोयल यांच्या या भेटीत भारत आणि सिंगापूर यांच्यातील भक्कम आणि वाढत्या धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारीचा पुनरुच्चार झाला. दोन्ही देशांनी उत्पादकता, पायाभूत सेवा सुविधा, हरित संक्रमण, डिजिटल अर्थव्यवस्था आणि वित्तीय गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला.
***
गोपाळ चिप्पलकट्टी / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2174619)
Visitor Counter : 13