दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या 97500 मोबाईल टॉवर्समध्ये बीएसएनएलच्या केपे येथील 4जी मोबाईल टॉवरचा समावेश

प्रविष्टि तिथि: 29 SEP 2025 4:53PM by PIB Mumbai

गोवा, 29 सप्‍टेंबर 2025

 

ओदिशामधील बेरहमपूर येथे दिनांक 27 सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 97500 मोबाईल टॉवर्सचे उद्घाटन केले. या मोबाईल टॉवर्सपैकी 92600 टॉवर्स संपूर्णपणे स्वदेशी बीएसएनएल टॉवर्स असून त्यामध्ये देशी 4जी तंत्रज्ञानाचा वापर केलेला असून हे टॉवर्स ही  सेवा नसलेल्या 26000 गावांना सुविधा पुरवणार आहेत. यामध्ये दक्षिण गोवा जिल्ह्यातील केपे तालुक्यात मोर्पिला येथील 4जी मोबाईल टॉवरचा देखील समावेश आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीतील गोवा दूरसंचार संचालनालयातर्फे (डीओटी) मोर्पिला येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांद्वारे झालेल्या उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण सादर करण्यात आले.डीओटी, गोवा येथील उपमहासंचालक (राज्य समन्वय) राजीव कुमार, बीएसएनएलचे गोव्यासाठीचे महाव्यवस्थापक एल.बी.लाल यांच्यासह मोर्पिला ग्राम पंचायतीचे सरपंच आणि इतर गावकरी यावेळी उपस्थित होते.

मोर्पिला येथील हा मोबाईल टॉवर संपूर्णतः स्वदेशी 4जी तंत्रज्ञान स्टॅकद्वारे निर्मित आहे, ज्यामध्ये तेजस नेटवर्कद्वारे विकसित रेडिओ अॅक्सेस नेटवर्क आहे, तसेच सी-डीओटी द्वारे विकसित मुख्य नेटवर्क असून त्याचे एकत्रीकरण टीसीएसद्वारे झालेले आहे. त्यातील सॉफ्टवेअर 5जी पर्यंत अद्ययावत केलेले आहे.

मोर्पिला येथील हा टॉवर केंद्र सरकारच्या 4जी संपृक्तता प्रकल्पांतर्गत उभारण्यात आला आहे आणि या टॉवरच्या माध्यमातून सुधारित मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट जोडणी उपलब्ध झाल्यामुळे रहिवाशांना विशेषतः तरुणांना डिजिटल अध्ययन स्त्रोत, ऑनलाइन नोकरीच्या सुविधा तसेच सायबर जगताशी संबंधित इतर लाभ मिळवणे शक्य होणार आहे. संपर्क सुविधेत वाढ करणे हा ग्रामीण भागातील डिजिटल दरी कमी करणे, अधिक वेगवान नेटवर्क तसेच गावांमध्ये अधिक उत्तम व्याप्ती निर्माण करून एकंदर डिजिटल समावेशनाला चालना देणे या उद्देशाने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे.

या देशव्यापी प्रकल्पाद्वारे जगामध्ये आपापल्या देशात 4जी स्टॅक स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करुन त्याचा वापर करणाऱ्या सुमारे पाच देशांच्या निवडक गटात भारत समाविष्ट झाला असून याद्वारे देशाचे तंत्रज्ञानविषयक स्वावलंबित्व तसेच राष्ट्रीय सुरक्षेला आणखी बळकटी मिळाली आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2172751) आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English