सांस्कृतिक मंत्रालय
नेहरू विज्ञान केंद्राच्या वतीने सार्वजनिक आरोग्य आणि मुखवैद्यकशास्त्रावरील मेटल आयन्स 2025 या आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या पार्श्वभूमीवर पूर्व परिसंवादाचे आयोजन
Posted On:
19 SEP 2025 10:00PM by PIB Mumbai
मुंबई, 19 सप्टेंबर 2025
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदे अंतर्गतच्या मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राच्या वतीने 20 व्या आंतरराष्ट्रीय मेटल आयन्स परिसंवादाच्या (मेटल आयन्स 2025) पार्श्वभूमीवरील पूर्व परिसंवादाचे आयोजन केले गेले आहे. येत्या 20 आणि 21 सप्टेंबर 2025 असे दोन दिवस, नेहरू विज्ञान केंद्राच्या वरळी इथल्या सभागृहात हा परिसंवाद होणार आहे.
मुखवैद्यकशास्त्र आणि विकीरणशास्त्र, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अलीकडील प्रगती ही यंदाच्या परिसंवादाची संकल्पना आहे. या परिसंवादात, मुखवैद्यकशास्त्र, विकीरणशास्त्र, विषद्रव्यशास्त्र आणि पर्यावरणीय आरोग्य यांमधील उदयोन्मुख परस्पर संबंधांवर विचारमंथन होईल. यानिमित्ताने नामांकित वैद्य, संशोधक आणि विद्यार्थी एकत्र येणार आहेत. आरोग्य विषयक निगा राखण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, कर्करोग शास्त्रातील मेटल आयनची आंतरक्रिया, नॅनो तंत्रज्ञान आणि तंबाखू संबंधित संशोधनासह पर्यावरणीय कर्करोगजनके यांसारख्या प्रमुख विषयांवर या परिसंवादात भर दिला जाणार आहे.
यानिमित्ताने, हनुवटी/जबड्याच्या सांध्याचे विकार, तोंड/चेहर्याच्या वेदनांचे व्यवस्थापन तसेच दंतवैद्यकात त्रिमितीय मुद्रण यावर प्रात्यक्षिक स्वरुपातील कार्यशाळांचेही आयोजन केले जाणार आहे. या कार्यशाळांमध्ये प्रगत वैद्यकीय उपाययोजनांबद्दलची माहिती दिली जाईल.
विज्ञानाला लोकप्रिय बनवण्याच्या आणि विज्ञान क्षेत्रात सार्वजनिक सहभागाला चालना देण्याच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेच्या उद्दिष्टाला अनुसरूनच या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगानेच या परिसंवादात 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष सत्र आयोजित केले जाईल. याअंतर्गत वैज्ञानिक संकल्पनांना स्वच्छता ही सेवा तसेच स्वच्छ भारत अभियान यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांसोबत जोडून घेतले जाईल.
रविवार, 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता या परिसंवादाचे उद्घाटन सत्र होईल. या सत्रात खाली नमूद मान्यवर उपस्थित राहणार आहेत :
प्राध्यापक पॉल बी. त्चुनवौ, अधिष्ठाता आणि संचालक, आरसीएमआय सेंटर फॉर अर्बन हेल्थ डिसपॅरिटीज, मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका
प्राध्यापक डॉ. अनातोली स्काल्नी, उपाध्यक्ष - ट्रेस एलिमेंट इन्स्टिट्यूट फॉर युनेस्को, संचालक - मेडिकल एलिमेंटोलॉजी, आरयूडीएन युनिव्हर्सिटी, मॉस्को
मुंबईतील नायर दंतवैद्यक रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या कॉलेजच्या प्राध्यापिका तसेच मुखवैद्यकशास्त्र आणि विकीरणशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. सुनाली खन्ना या परिसंवादाच्या अध्यक्ष असणार आहेत.
हा आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून अत्याधुनिक विज्ञान आणि सार्वजनिक जागरूकतेमध्ये दुवा साधण्यासाठीचे एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध होईल. यातून विज्ञान आणि समाजाला जोडण्याच्या नेहरू विज्ञान केंद्राच्या वचनबद्धतेचीही प्रचिती येईल.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168804)
अभ्यागत कक्ष : 35