गृह मंत्रालय
गोवा आणि भारताला सुरक्षित आणि शाश्वत पर्यटनासाठी एक आदर्श बनवूया- राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांचे पर्यटन पोलिसिंगवरील प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप समारंभात प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2025 9:51PM by PIB Mumbai
पणजी, 19 सप्टेंबर 2025
पर्यटन हा केवळ एक उद्योग नाही. तो भिन्न संस्कृतींमधील एक दुवा आहे. पर्यटक सुरक्षा, मार्गदर्शन आणि शांततेच्या हमीसाठी पोलिसांवर अवलंबून असतात', असे आज गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू म्हणाले. ते पणजी येथील अल्टिन्हो येथील गोवा राखीव पोलीस शिबिरात राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ आणि गोवा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय पर्यटन पोलिसिंग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप समारंभात बोलत होते.

प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना, पुसापती अशोक गजपती राजू म्हणाले की, त्यांना मिळालेले प्रशिक्षण हे व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि सज्जता यामध्ये केलेली गुंतवणूक आहे. गोवा हे जगातील सर्वात आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. तुमची व्यावसायिकता ही पर्यटकांच्या मनःशांतीसाठी महत्त्वाची आहे. महत्वाच्या क्षणी पर्यटकांना कशी वागणूक दिली जाते, यावर त्यांची गोव्याबद्दलची प्रतिमा अवलंबून असते', असे ते म्हणाले.

गोव्याचे मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत यांनी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांना संस्थात्मक स्वरूप देण्यावर भर दिला. 'गोवा हे एक पर्यटन राज्य आहे आणि असे प्रशिक्षण पोलिसिंगला अधिक मजबूत करण्यास मदत करते. जागतिक आणि राष्ट्रीय पोलीस दलांनी गोव्याशी जोडले जावे हा आमचा दृष्टीकोन आहे. म्हणूनच गोवा सरकारने 'स्वदेश दर्शन' आणि 'स्मार्ट सिटीज' सारख्या योजना त्वरित लागू केल्या. नियमित प्रशिक्षणाने गोवा पोलिसांची क्षमता आणखी वाढेल, जे शांतता, सेवा आणि न्यायासाठी कटिबद्ध आहेत,' असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे आणि गोव्यामधून पर्यटन पोलिसिंग सुरू केल्याबद्दल त्याचे कौतुक केले.

त्यापूर्वी, गोव्याचे पोलीस महासंचालक, आलोक कुमार यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि पाच दिवसीय कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. 'सहभागींना पर्यटन आणि सांस्कृतिक संवेदनशीलतेवरील आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, तंत्रज्ञानावर आधारित देखरेख ठेवणे आणि आपत्ती प्रतिसाद यांसारख्या विविध विषयांवर काम करण्याची संधी मिळाली,' असे आलोक कुमार म्हणाले.
गोव्याचे पोलीस महानिरीक्षक, के. आर. चौरसिया यांनी आभारप्रदर्शन केले.
या कार्यक्रमात गोवा, अंदमान आणि निकोबार, दीव आणि दमण, दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीप आणि जम्मू-काश्मीर येथील 78 सहभागींनी प्रशिक्षण घेतले.

या कार्यक्रमात पर्यटन पोलिसिंग, पर्यटकांचे हक्क, आपत्कालीन प्रतिसाद, संकट व्यवस्थापन, सॉफ्ट स्किल्स, संवाद कौशल्य, सांस्कृतिक संवेदनशीलता आणि विविधतेची जाणीव, आरोग्य सुधारणा, प्रदूषण नियंत्रण, संघर्ष निराकरण, आचारसंहिता, समकालीन आव्हाने, एआय चा वापर, लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या विषयांचा समावेश होता. यात प्रात्यक्षिक सत्रांचाही समावेश होता.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2168800)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English