कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
पश्चिमी राज्यांसाठी क्षमता उभारणी आणि जागरुकता अभियानाचे आयोजनः भविष्यातील कौशल्ये, दर्जा मानके आणि शाळा आणि उच्च शिक्षणात व्हीईटीचे एकात्मिकरण यावर भर देत एनसीव्हीईटी- महाराष्ट्र सरकारकडून मुंबईत कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
19 SEP 2025 7:36PM by PIB Mumbai
मुंबई, 19 सप्टेंबर 2025
राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद (एनसीव्हीईटी), भारत सरकारचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांनी महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागाच्या सहकार्याने आज मुंबईत मलबार हिल भागातील वाळकेश्वर येथे सह्याद्री अतिथी गृहात पश्चिम विभागासाठी क्षमता उभारणी आणि जागरुकता कार्यशाळेचे आयोजन केले.

या कार्यशाळेने महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव, आणि दादरा व नगर हवेली येथील हितधारकांना एकत्र आणले. यात राज्य कौशल्य विकास मिशन, व्यावसायिक प्रशिक्षणाचे राज्य परिषद, विद्यापीठे, शाळा आणि तांत्रिक मंडळे, पुरस्कार प्रदान करणाऱ्या संस्था, उद्योग भागीदार आणि प्रशिक्षण संस्था यांचा समावेश होता. कौशल्य परिसंस्थेतील एनसीव्हीईटीच्या उपक्रमांविषयी जागरूकता वाढवणे हा यामागचा उद्देश होता.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री, जयंत चौधरी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या उद्दिष्टांशी संरेखित, शिक्षणार्थी-केंद्रित आणि मागणी-आधारित कौशल्य परिसंस्था तयार करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनावर भर दिला. त्यांनी गुणवत्ता मानके मजबूत करण्यात आणि व्यावसायिक व सामान्य शिक्षणाचे अखंड एकीकरण वाढवण्यात एनसीव्हीईटीची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी पुढे सांगितले की, 'पीएमकेव्हीवाय 4.0', 'राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण प्रोत्साहन योजना', 'स्किल इंडिया डिजिटल हब' आणि नुकताच सुरू केलेला 'एआय तयारीसाठी कौशल्ये' कार्यक्रम यांसारखे उपक्रम भारतातील तरुणांना भविष्यासाठी तयार करत आहेत आणि आत्मनिर्भर व विकसित भारताच्या दृष्टिकोनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

महाराष्ट्राचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या अध्यक्ष या नात्याने उपस्थितांना संबोधित केले. कौशल्य प्रशिक्षणाचा संबंध हा रोजगार आणि सक्षमीकरणाशी असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेच्या माध्यमातून, सरकारने शाळा आणि उच्च शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षणाचे एकात्मिकीकरण घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले असून, सरकार युवा वर्गाला उदयोन्मुख कौशल्यांसह भविष्यासाठी तयार करत असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव देबश्री मुखर्जी यांनी या कार्यक्रमात बीजभाषण केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मुळे शैक्षणिक आणि व्यावसायिक शिक्षणाच्या एकात्मिकीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला असल्याचे त्या म्हणाल्या. राष्ट्रीय कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद, विभागीय कार्यशाळांच्या माध्यमातून विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुणवत्तेची हमी, समन्वय आणि क्षमता वृद्धीच्या प्रयत्नांना पाठबळ देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कौशल्य परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी राज्यांमध्ये आणि राष्ट्रीय कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेसारख्या राष्ट्रीय संस्थांसोबतचे सहकार्य, तसेच विश्वासार्ह मानांकन आराखड्याची उपलब्धता अत्यंत आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. या कार्यशाळेच्या आयोजनाची प्रशंसाही त्यांनी केली. ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता वृद्धी साठी अशी कार्यशाळा हे एक उत्कृष्ट व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यांच्या सादरीकरणाचे सत्रही पार पडले. महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील यांनी कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. गुजरात, गोवा, दमण आणि दीव, तसेच दादरा आणि नगर हवेली या राज्यांनीही आपापले अनुभव आणि धोरणे त्यांच्या सादरीकरणातून मांडली.

या दिवसभराच्या कार्यक्रमाअंतर्गत गुणवत्ता आश्वासन, शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स, एसआयडीएच पोर्टल, विविध उपक्रमांचे एकात्मिकीकरण, तसेच शाळा आणि उच्च शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षणाच्या समावेश अशा विषयांवरची सत्रे आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत भविष्यासाठीच्या धोरणांवरही चर्चा झाली. यानिमित्ताने राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेने प्रचार प्रसार विषयक उपक्रमांचा विस्तार, राज्यांमधील संस्थांना पाठबळ पुरवणे, तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व भागधारकांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी पुन्हा एकदा आपली वचनबद्धता व्यक्त केली. देशाच्या पश्चिम भागासह इतर प्रदेशांमधूनही कार्यक्रमातील सहभाग वाढावा यासाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168703)
अभ्यागत कक्ष : 30