शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मनुष्यबळ क्षेत्रातील बदलती परिस्थिती तसेच तंत्रज्ञानाधारीत शिक्षण केंद्रस्थानी ठेवत शिक्षण आणि उद्योगजगतातील सहकार्य अधिक दृढ  करण्यासाठी आयआयएम जम्मुकडून  पुणे गोलमेज परिषदेचे आयोजन 

Posted On: 13 SEP 2025 6:33PM by PIB Mumbai

 

जम्मू इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (IIM Jammu) वतीने आज दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी पुणे गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील हॉटेल ब्लू डायमंड इथे ही परिषद पार पडली. या परिषदेच्या निमित्ताने  धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग जगतातील आघाडीची व्यक्तीमत्वे एकाच ठिकाणी आली होती. परिषदेतील सर्व सहभागींनी  शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासारख्या महत्वाच्या मुद्यावर या परिषदेत चर्चा केली. यासोबतच मनुष्यबळ क्षेत्रातील बदलती परिस्थिती तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगारांच्या अनुषंगाने सुसज्ज करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग घेण्याच्या मुद्यावरही या परिषदेत भर दिला गेला.

जम्मू इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष, पद्मश्री डॉ. मिलिंद पी. कांबळे आणि संस्थेचे संचालक, प्रा. बी.एस. सहाय यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. या उद्घाटन सत्राला उद्योग जगतातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरही उपस्थित होते.

यावेळी डॉ. मिलिंद पी. कांबळे या परिषदेला संबोधित केले. जम्मू इथली भारतीय व्यवस्थापन संस्था शिक्षण आणि उद्योग क्षेत्रामध्ये उद्देशपूर्ण सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील असून, पुणे गोलमेज परिषदेचे आयोजन हे याच प्रयत्नांअंतर्गतचे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.  आजच्या वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीच्या काळात, शैक्षणिक संस्थांनी केवळ एकट्याने काम न करता, उद्योग जगतातील आघाडीच्या व्यक्तीमत्वांसोबत सक्रिय संवाद राखला पाहीजे, आणि या माध्यमातून अभिनव, सर्वसमावेशक आणि शाश्वत उपाययोजना आखल्या पाहीजेत असा सल्ला त्यांनी दिला.  हवामानातील बदल, घडून येत असलेले डिजिटल परिवर्तन आणि एकसमान प्रगती यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या बाबतीत शैक्षणिक आणि औद्योगिक जगतातील घटकांनी एकत्रितपणे काम करायला हवे  असे आवाहन त्यांनी केले. विविधांगी  दृष्टीकोनांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या क्षमतेमध्येच अशा स्वरुपातील भागिदारीची ताकद दडलेली असते ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

जम्मू इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या प्रशासक  मंडळाचे सदस्य आणि चितळे बंधूचे व्यवस्थापकीय भागीदार इंद्रनील चितळे यांनीही या परिषदेत आपले विचार मांडले. ही गोलमेज परिषद म्हणजेशैक्षणिक संस्था आणि उद्योग जगतातील आघाडीची व्यक्तिमत्वे एकत्रितपणे व्यवस्थापन शिक्षणाच्या भविष्याला कशा रितीने आकार देऊ शकतात याचे उत्तम उदाहरण आहे असे ते म्हणाले.  अशा व्यासपीठांमुळे नवीन कल्पना, व्यावहारिक ज्ञान आणि विविधांगी दृष्टीकोनांची परस्पर देवाणघेवाण शक्य होते ही बाबही त्यांनी नमूद केली. कॉर्पोरेट जगताच्या बहुआयामी गरजांची पुर्तता  करण्याच्यादृष्टीने सर्व विद्यार्थ्यांकरता अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

संस्थेचे संचालक, प्रा. बी.एस. सहाय यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. अशा प्रकारच्या  भागीदारींच्या माध्यमातून बहुआयामी आणि भविष्याच्यादृष्टीने सज्ज शिक्षण विषयक परिसंस्थेची जडणघडण होते, या प्रक्रियेत बौद्धिकदृष्ट्या सक्षम आणि उद्योग क्षेत्रासाठी सज्ज असलेले पदवीधर घडतात असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प मांडला आहे, या संकल्पाच्या पुर्ततेच्या दृष्टिकोनातून उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याकरता, जम्मू आणि काश्मीर सरकारच्या सहकार्याने प्रोजेक्ट युवा हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली, तसेच या उपक्रमाचे महत्वही अधोरेखित केले.

जम्मू इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या नोकरभरती (Placement) विभागाचे प्रमुख डॉ. महेश गाडेकर यांनीही आपली मते मांडली. या गोलमेज परिषदेच्या निमित्ताने उद्योग जगत आणि शिक्षण क्षेत्रामधील परस्पर सहकार्याचे नवीन मार्ग खुले झाले आहेत असे ते म्हणाले.

पुणे गोलमेज परिषदेअंतर्गत निमंत्रितांच्या तीन ज्ञानवर्धक चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले होते.

यांपैकी पहिले चर्चासत्र हे उद्याच्या नेत्यांची जडणघडण : उद्योग जगताच्या युवा प्रतिभेकडून असलेल्या अपेक्षा या विषयावर झाले.

दुसऱ्या चर्चासत्रात संपर्क विस्ताराची ताकद  : उद्योग जगतासोबतच्या संवादातून संधीची दारे कशारितीने खुली होऊ शकतील या विषयावर चर्चा झाली.

तर, पुस्तकांपलीकडचे शिक्षण : शिक्षणाला अधिक व्यवहार्य बनवण्यात उद्योग जगताची भूमिका हा तिसऱ्या चर्चासत्राचा विषय होता.

पुणे गोलमेज परिषदेच्या आयोजनामुळे शिक्षण आणि उद्योगजगतातील परस्पर सहकार्य अधिक दृढ व्हायला मदत झाली, तसेच विद्यार्थी आणि कॉर्पोरेट जगताला फायदा लाभदायक ठरू शकेल अशा  ठोस कृतींचा मार्गही या परिषदेमुळे अधिक प्रशस्त झाला.  जम्मू इथली भारतीय व्यवस्थापन संस्था ही नेहमीच नवोन्मेषाला चालना देणाऱ्या तसेच शिक्षण क्षेत्राचे भविष्य आणि व्यावसायिक पातळीवरच्या प्रगतीला आयाम देणाऱ्या भागीदारींना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्धतेने काम करत आली आहे.

***

निलिमा चितळे / तुषार पवार / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2166429) Visitor Counter : 8
Read this release in: English