कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळसा मंत्रालयाकडून मुंबईत कोळसा वायुभवन- पृष्ठभाग आणि जमिनीखालील तंत्रज्ञान यावरील रोड शो चे आयोजन

Posted On: 12 SEP 2025 9:30PM by PIB Mumbai

मुंबई, 12 सप्टेंबर 2025

कोळसा मंत्रालयाने आज मुंबईत 'कोळसा वायुभवन - पृष्ठभाग आणि जमिनीखालील तंत्रज्ञान'  या विषयावर एका उच्च-स्तरीय रोड शोचे आयोजन केले. कोळशाचा अधिक स्वच्छ आणि कार्यक्षम वापर करण्याच्या दिशेने भारताच्या वाटचालीस गती देण्यासाठी या कार्यक्रमात धोरणकर्ते, उद्योग धुरीण , गुंतवणूकदार, तंत्रज्ञान पुरवठादार आणि इतर प्रमुख हितधारक एकत्र आले. या कार्यक्रमात कोळसा वायुभवन (coal gasification) कशा प्रकारे देशाच्या विशाल कोळसा साठ्याचे ऊर्जा आणि केमिकल फीडस्टॉकच्या टिकाऊ स्रोतांमध्ये रूपांतर करू शकते, आयातीवरील अवलंबित्व कमी करू शकते आणि आर्थिक वृद्धीची नवी दालने खुली करू शकते, हे दाखवण्यात आले.

यावेळी, कोळसा मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि नामनिर्देशित अधिकारी,  रुपिंदर ब्रार यांनी आपल्या प्रमुख संबोधनात, देशाने एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा पार केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हे यश भारताच्या विकासाच्या प्रवासात या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत आहे, असे त्या म्हणाल्या. कोळसा हा देशातील ऊर्जेचा सर्वात प्रमुख स्रोत आहे आणि तो भविष्यातही देशाच्या वाढत्या गरजा पूर्ण करत राहील, ज्यामुळे आर्थिक वाढ आणि राष्ट्रीय विकासाला चालना मिळेल, यावर त्यांनी भर दिला. मंत्रालयाची दूरदृष्टी स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, कोळसा वायुभवन भारताच्या ऊर्जा संक्रमणाचा आणि औद्योगिक विस्ताराचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनत आहे. ब्रार यांनी सांगितले की, कोळसा वायुभवनामुळे देशांतर्गत कोळसा साठ्याचा, पर्यावरणाची काळजी घेऊन वापर करता येतो, त्याचबरोबर स्वच्छ इंधन, रसायने, खते आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार होतात, जी आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक आहेत. ही प्रक्रिया 'आई वसुंधरेला परत देण्यासारखे' असून, यामुळे कोळशाच्या वापरामुळे होणारे पर्यावरणीय  दुष्परिणाम कमी होतात.

हा रोडशो पृष्ठभाग आणि  जमिनीखालील अशा दोन्ही कोळसा वायुभवन प्रकल्पांसाठी एक मजबूत परिसंस्था तयार करण्याच्या सरकारच्या अटल वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.  ब्रार यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी, संशोधन आणि विकास मजबूत करण्यासाठी, नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी, महत्त्वपूर्ण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत भागीदारी वाढवण्यासाठी आणि वायुभवन प्रकल्पांची व्यवहार्यता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी योग्य व्यवसाय मॉडेल्स विकसित करण्याचे आवाहन केले.

त्यांनी भागधारकांना  कोळसा वायूकरणातील प्रत्येक गुंतवणुक आणि नवोन्मेषाकडे पाहताना पर्यावरण संरक्षण, कार्बन उत्सर्जनात घट, चक्राकार अर्थव्यवस्थेची तत्त्वे आणि शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत दृष्टिकोन अंगीकारून जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी जुळवून घेण्यासाठी भविष्याचा विचार करण्याचे आवाहन केले जेणेकरून येणाऱ्या दशकांमध्ये भारताची ऊर्जा सुरक्षा, औद्योगिक स्पर्धात्मकता आणि पर्यावरणीय व्यवस्थापन  हातात हात घालून प्रगती करेल.

स्वच्छ ऊर्जा आणि औद्योगिक प्रगतीला चालना  देण्यात कोळसा वायुकरणाची प्रमुख भूमिका अधोरेखित करण्यासाठी त्याचे नेमके लाभ, प्रमुख घटक आणि प्रस्तावित कार्यपद्धतीचे विस्तृत सादरीकरण या रोडशो दरम्यान करण्यात आले. कोळशाचे वायुकरण केल्याने कोळशाचे रूपांतर हायड्रोजन (H₂), कार्बन मोनोऑक्साइड (CO), मिथेन (CH₄) आणि कार्बन डायऑक्साइड (CO₂) असलेल्या कृत्रिम वायूमध्ये (सिंगॅस) होते हे स्पष्ट करण्यात आले. या सिंगॅसचा वापर वीज निर्मिती, खते आणि रसायने तयार करण्यासाठी आणि हायड्रोजनसाठी कच्चा माल म्हणून करता येतो.

याशिवाय परस्परसंवादी  प्रश्नोत्तरांचे सत्र आयोजित केल्यामुळे भागधारकांना वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञांना कोळसा वायुकरणावरील  धोरण चौकट, तंत्रज्ञानातील पर्याय आणि गुंतवणुकीच्या संधींबाबत थेट प्रश्न विचारता आले.

स्वच्छ तंत्रज्ञान आणि चैतन्यशील नियामक आणि धोरणात्मक पाठबळ यांची सांगड घालून भूमिगत कोळसा वायुकरणाचा समावेश असलेल्या  कोळसा वायुकरणाला भारताच्या शाश्वत आणि सुरक्षित ऊर्जेच्या प्रवासातील एक प्रमुख आधारस्तंभ बनवण्याचे कोळसा मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने  जबाबदार पद्धतीने  भारताच्या विशाल कोळसा साठ्यातून नवीन मूल्य प्रवाह उघडण्यासाठी  नवोन्मेषी तंत्रज्ञानात अधिक प्रगती करुन आणि भागीदारीला चालना देण्याची केंद्र सरकारची वचनबद्धता पुन्हा एकदा या रोडशो मधून दिसून आली.


सुषमा काणे/शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2166152) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi