रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान, पर्यायी शेती-आधारित उपजीविका आणि नवोन्मेषी पद्धतींशी जोडल्यास शेतकरी समृद्ध होतील - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


नील अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि स्वच्छ इंधन शेतकऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण करु शकतात

प्रविष्टि तिथि: 12 SEP 2025 8:06PM by PIB Mumbai

नागपूर, 12 सप्टेंबर 2025

देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या विदर्भात दुग्धव्यवसाय, ऊस, रोपवाटिका, हातमाग आणि संत्री उत्पादनाची प्रचंड क्षमता आहे.

जर पारंपारिक कृषी पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञान, पर्यायी शेती-आधारित उपजीविका आणि नवोन्मेषी पद्धतींशी जोडले गेले तर  शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यास आणि पर्यायाने शेतकरी आत्महत्यांना आळा घालण्यास मदत होईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 21 ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान नागपूर मधील अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 'अ‍ॅग्रोव्हिजन 2025' या महाकृषी प्रदर्शनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.

अशा आयोजनांचे प्राथमिक उद्दिष्ट शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संबंधित व्यवसाय तसेच विदर्भ आणि लगतच्या प्रदेशातील शेती मजबूत करण्यासाठी, संकट कमी करण्यासाठी आणि नवोन्मेषी पद्धतींची माहिती देणे आहे, असे गडकरी म्हणाले.

विदर्भाची ताकद अधोरेखित करताना, गडकरी यांनी या प्रदेशात दररोज 50 लाख लिटर दूध संकलन वाढवण्याची गरज आणि इस्रायली लागवड तंत्रज्ञानासह आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित केली. यासोबतच प्रति एकर संत्र्याची उत्पादकता 20-25 टनांपर्यंत वाढवण्यासाठी स्पेनमधील व्हॅलेन्सिया संत्र्यांच्या जाती विदर्भात रुजवण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.

7.5 लाख कोटी रुपयांची नील अर्थव्यवस्था शेतकऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देते, असे गडकरी यांनी सांगितले. सहयोगी उपक्रम म्हणून प्रदेशातील गोड्या पाण्याच्या साठ्यांचा वापर कोळंबी लागवडीसाठी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, इथेनॉल आणि आयसोब्युटनॉल सारखी स्वच्छ इंधने तसेच शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी ड्रोन आणि बांबू-आधारित उत्पादनांसारख्या नवोन्मेषाचा अवलंब करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या प्रदर्शनात प्रात्यक्षिके, 60 तज्ज्ञांच्या 30 हून अधिक तांत्रिक कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. सोबतच अन्न प्रक्रिया, शेतीसाठी माहिती तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील दुवे यावरील विशेष सत्रे होणार आहेत. प्रदर्शनात आधुनिक शेती उपकरणे, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धती प्रदर्शित केल्या जातील. प्रदर्शनात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी तसेच कृषी-स्टार्टअपसाठी समर्पित कक्ष देखील असतील.

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2166119) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English