ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते नाशिकमध्ये केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेच्या प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेचे झाले उद्घाटन

Posted On: 10 SEP 2025 9:51PM by PIB Mumbai

नाशिक, 10 सप्टेंबर 2025 

आज एका ऐतिहासिक कार्यक्रमात भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी स्वायत्त संस्था असलेल्या सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीपीआरआय) नाशिक येथील अद्ययावत प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेचे (आरटीएल) उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र राज्याचे  जलसंपदा आणि संकट व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वीज आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी या सुविधेचे उद्घाटन केले आणि प्रयोगशाळा राष्ट्राला समर्पित केली. 

नव्याने स्थापन झालेले आरटीएल नाशिक हे भारताच्या पश्चिम भागातील उद्योगांना सेवा देण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या स्थित असून विविध प्रकारच्या विद्युत आणि वीज उपकरणांसाठी रोहित्र, ऊर्जा मापक, स्मार्ट मापक आणि रोहित्र तेल यासारखी अत्याधुनिक चाचणी सेवा त्यांच्यातर्फे उपलब्ध करून दिली जाते.

या कार्यक्रमादरम्यान, वीज आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी भारताच्या वीज क्षेत्राच्या वाढीला आणि आत्मनिर्भरतेला गती देण्यासाठी मजबूत चाचणी पायाभूत सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले. जागतिक मानकांनुसार जागतिक दर्जाच्या चाचणी आणि संशोधन सेवा उपलब्ध करण्यासंदर्भातील सीपीआरआयची भूमिका देखील त्यांनी अधोरेखित केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील विद्युत उद्योगाची गुणवत्ता हमी आणि वाढ यासाठी गरज असणाऱ्या नाशिक येथील प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेच्या महत्त्वावर भर दिला. राज्याचे जलसंपदा आणि संकट व्यवस्थापन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात ग्रामीण विकास आणि राज्य सरकारच्या विकास धोरणांना बळकटी देण्यासाठी या चाचणी प्रयोगशाळेकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल माहिती दिली. महाराष्ट्राचे  जलसंपदा आणि संकट व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात ग्रामीण क्षेत्राला दर्जेदार उत्पादने आणि संधी उपलब्ध करून देणाऱ्या वीज क्षेत्रातील या प्रयोगशाळेचे महत्त्व अधोरेखित केले.

सीपीआरआयचे महासंचालक असित सिंह यांनी वीज आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, प्रतिष्ठित पाहुण्यांचे आणि सहभागींचे हार्दिक स्वागत केले.

सीपीआरआय विषयी माहिती :

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (सीपीआरआय), 1960 मध्ये स्थापन झाली. वीज क्षेत्रातील एक प्रमुख राष्ट्रीय चाचणी आणि संशोधन संस्था म्हणून सीपीआरआय विद्युत ऊर्जा उपकरणे आणि प्रणालींच्या संपूर्ण श्रेणीमध्ये प्रगत संशोधन, चाचणी, प्रमाणन आणि सल्लागार सेवा उपलब्ध करण्यासाठी समर्पित आहे. बेंगळुरू येथे मुख्यालय असलेले सीपीआरआय भोपाळ, हैदराबाद, नोएडा, कोलकाता येथे कार्यरत आहे आणि रायपूर येथे इतर नवीन युनिट स्थापन केले जात आहे. नागपूर येथील थर्मल रिसर्च सेंटरनंतर नाशिक (नवीन युनिट) हे महाराष्ट्र राज्यातील दुसरे युनिट आहे. या संस्थेचे नेतृत्व महासंचालक करतात.


सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2165472) अभ्यागत कक्ष : 35
Read this releasein: English