संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तिन्ही सैन्यदलांतील महिला नौकानयन पथक आयएएसव्ही त्रिवेणी या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणार

Posted On: 09 SEP 2025 10:23PM by PIB Mumbai

मुंबई, 9 सप्टेंबर 2025

भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात प्रथमच, लष्कर, नौदल आणि हवाई दल अशा तिन्ही दलांतील दहा महिला अधिकारी त्रिवेणी नामक भारतीय लष्कराच्या नौकानयन नौकेतून  (आयएएसव्ही) येत्या गुरुवारी म्हणजेच 11 सप्टेंबर 2025 रोजी पृथ्वी प्रदक्षिणेसाठी प्रस्थान करतील.

देशाच्या तिन्ही सेनादलांच्या एकत्रीकरणावरुन नाव मिळालेली ही नौका तिन्ही सेनादलांमधील संयुक्ततेची आणि समन्वयाची भावना प्रतिबिंबित करते. या प्रवासासाठी निघणाऱ्या पथकात लष्कराच्या पाच अधिकारी, नौदलातील एक अधिकारी आणि हवाई दलातील चार अधिकारी समाविष्ट आहेत.भारताची तिन्ही सेनादले एकत्र येऊन पृथ्वी प्रदक्षिणेची मोहीम हाती घेत आहेत असे पहिल्यांदाच घडत आहे त्यामुळे ही घटना म्हणजे भारताच्या सागरी क्षेत्रातील वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा तसेच सेनादलांमध्ये कार्यरत नारीशक्तीचे झळाळते उदाहरण ठरले आहे.

या पथकातील सदस्यांनी सेशेल्स येथे झालेल्या प्रशिक्षण मोहिमेसह गेली अडीच वर्षे प्रत्येक संबंधित क्षेत्रात कठोर प्रशिक्षण घेतले आहे. हेवी ब्रिजिंग ट्रेनिंग कँप (एचबीटीसी)मधील अनुभवी आणि उत्तम पात्रता असलेल्या प्रशिक्षकांनी या सगळ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून पायाभूत आणि मध्यवर्ती सागरी नाविकी अभ्यासक्रमांसह नौकेला दिशादर्शन, संपर्क, स्कुबा डायव्हिंग, मुलभूत वैद्यकीय सेवा आणि प्रथमोपचार यांसारख्या बहुविध कौशल्यांचा त्यात समावेश आहे.

या महिला अधिकारी एकूण प्रवासात 26,000 सागरी मैलांचे अंतर पार करतील, या दरम्यान त्या दोनदा विषुववृत्त ओलांडतील आणि केप लीयुविन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होप अशा तीन महत्त्वपूर्ण केप्सना फेरी घालतील. त्यांचा हा प्रवास, सर्व महत्त्वाचे महासागर तसेच दक्षिणी महासागर आणि ड्रेक पसाजसह पृथ्वीवरील सर्वात धोकादायक जलमार्गांवरून होणार असून त्यामध्ये निसर्गाच्या कर्मकठीण आव्हानांच्या विरुद्ध मानवी लवचिकतेची कसोटी लागणार आहे. ही मोहीम नऊ महिन्यांच्या काळात पूर्ण होईल आणि मे 2026 मध्ये मुंबईला परतण्यापूर्वी हे पथक चार परदेशी बंदरांना भेट देईल.

भारतीय नौदलाची त्रिवेणी ही 50 फुट लांबीची नौकानयन नौका पुद्दुचेरी येथे स्वदेशी पद्धतीने बांधण्यात आली असून ती आत्मनिर्भर भारत संकल्पनेचे मूर्त रूप आहे. आधुनिक दिशादर्शन तसेच संपर्क प्रणालीने सुसज्ज असलेल्या या नौकेने आधीच सरावादरम्यान 10,000 सागरी मैलांचा प्रवास पूर्ण केला आहे आणि आता ती हे जागतिक आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज झाली आहे.   

देशाच्या तिन्ही सेनादलांतील सर्व महिला सदस्य असलेली ही पृथ्वीप्रदक्षिणा म्हणजे केवळ नाविक मोहीम नव्हे. तर भारताचे वाढते सागरी सामर्थ्य, नवे अडथळे तोडून पुढे जाणाऱ्या नारी शक्तीची उर्जा आणि आणि जागतिक मंचावर स्वतःचा मार्ग आखणाऱ्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा हा उत्सव आहे.

शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2165118) Visitor Counter : 2
Read this release in: English