संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रशियात आयोजित झपाद 2025 या बहुपक्षीय सराव अभ्यासात सहभागी होण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांचे पथक रवाना

Posted On: 09 SEP 2025 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025

रशियामध्ये येत्या 10 ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत आयोजित झपाद 2025 या बहुपक्षीय संयुक्त लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांतील 65 जणांचे पथक आज रशियातील निझनीय येथील मुलीनो प्रशिक्षण तळाकडे रवाना झाले.

भारतीय पथकात भारतीय सशस्त्र दलाचे 57 सैनिक, भारतीय हवाई दलाचे 07 सैनिक आणि भारतीय नौदलातील एक कर्मचारी यांचा समावेश आहे. कुमाऊ रेजिमेंटची तुकडी आणि इतर शाखा तसेच सेवांच्या तुकड्या भारतीय सेनेच्या पथकाचे नेतृत्व करत आहेत.

लष्करी सहकार्यात वाढ करणे, आंतर- परिचालन क्षमता सुधारणे आणि पारंपरिक युद्धनीती तसेच दहशतवाद विरोधी मोहिमांच्या क्षेत्रात डावपेच, युध्दतंत्रे आणि पद्धती यांची देवाणघेवाण करण्यासाठी सरावात सहभागी सैन्यांना मंच उपलब्ध करून देणे हा बहुपक्षीय सराव झपाद 2025 च्या आयोजनाचा उद्देश आहे.

सदर सरावादरम्यान खुल्या आणि समतल भागात कंपनी स्तरावरील संयुक्त कृतींवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, यात सहभागी सैन्यांच्या तुकड्या संयुक्त नियोजन, डावपेचांचा सराव आणि विशेष शस्त्रे चालवण्याची कौशल्ये आत्मसात करणे यांसारख्या मोहिमा हाती घेतील. संयुक्त परिचालनात्मक क्षमता अधिक धारदार करण्याची, उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा समावेश करून घेण्याची तसेच बहुराष्ट्रीय लढाऊ वातावरणात काम करण्याची अनमोल संधी हा सराव उपलब्ध करून देईल.

झपाद 2025 लष्करी सरावातील सहभागामुळे भारत आणि रशिया या देशांतील संरक्षण संबंधी सहकार्य अधिक बळकट होईल आणि त्यांच्यातील मैत्रीला अधिक चालना मिळेल आणि त्यायोगे सहयोग आणि परस्पर विश्वासाची भावना दृढ होईल.

 

शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2164968) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali