माहिती आणि प्रसारण मंत्रालय
टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारत पॅव्हिलियनच्या ‘WAVES’ ची दमदार छाप
Posted On:
05 SEP 2025 7:35PM by PIB Mumbai
मुंबई, 5 सप्टेंबर 2025
टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF) उभारलेल्या भारत पॅव्हिलियन अर्थात भारतीय दालनाचे 4 सप्टेंबर 2025 रोजी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव अजय नागभूषण आणि टोरांटोमधील भारताचे प्रभारी वाणिज्यदूत कपीध्वज प्रताप सिंग यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाले. टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमेरॉन बेली हे देखील यावेळी उपस्थित होते. यासोबतच वेव्हज बाजार (WAVES Bazaar) या भारताच्या चित्रपट, माध्यम आणि AVGC-XR क्षेत्रासंबंधीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ई-बाजारपेठेनेही उत्तर अमेरिका क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

यंदाच्या महोत्सवातील भारत पॅव्हिलियन अंतर्गत वेव्हज बाजारवर भर दिला गेला आहे. वेव्ह्ज या चित्रपट, दूरचित्रवाणी, प्रसारण, गेमिंग, ॲनिमेशन, संगीत आणि AVGC-XR क्षेत्रातील सर्जनशील कलाकार आणि खरेदीदारांना एकत्र आणणाऱ्या जागतिक ई - बाजारपेठेचे आयोजन राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) केले आहे. वेव्ह्ज बाजार या मंचाच्या माध्यमातून आपल्या संपर्कांचा विस्तार करण्याची, खरेदीदार - विक्रेत्यांना परस्परांसोबत संवाद साधण्याची, आपल्याकडील प्रकल्पांचे सादरीकरण करण्याची तसेच प्रकल्पांसाठी परस्पर सहकार्य मिळवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भारतीय सर्जनशील कलाकार आणि आंतरराष्ट्रीय भागधारकांनाही परस्परांसोबत फलदायी भागीदारी प्रस्थापित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
भारत पॅव्हिलियनच्या उद्घाटनानंतर अजय नागभूषण यांनी उपस्थितांशी संवाद साधला. टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारत पॅव्हिलियन म्हणजे, केवळ भारताच्या चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्टतेचा उत्सव साजरा करण्याचे माध्यम नसून, ते जागतिक भागीदारी प्रस्थापित करण्याचे एक व्यासपीठही असल्याची बाब त्यांनी नमूद केली. वेव्हज बाजार मंचाद्वारे नियुक्त केलेल्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ परीक्षक मंडळाने एका आठवड्याच्या आत 200 पेक्षा जास्त अर्जांमधून सहा उत्कृष्ट प्रकल्पांची निवड केल्याची माहिती त्यांनी दिली. पहिल्यांदाच, केवळ महिलांच्या नेतृत्वाखालील चित्रपट प्रकल्पांचे प्रतिनिधी मंडळ टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रतिनिधी मंडळातल्या अद्भूत सर्जनशील कलाकार म्हणजे केवळ चित्रपट दिग्दर्शक म्हणून आलेल्या नाहीत, तर जागतिक चित्रपट मंचावर महिलांचे विचार, दृष्टीकोन आणि कथांना मध्यवर्ती स्थान दिले जात असलेल्या एका नव्या युगाच्या दूत आहेत असे ते म्हणाले.
टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दरम्यान 6 सप्टेंबर 2025 रोजी होणार असलेल्या आगामी वेव्हज बाजार कार्यक्रमाचे महत्त्वही त्यांनी सांगितले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने फेब्रुवारीमध्ये मुंबईत आयोजित केलेला वेव्ह्ज हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे. आता हा उपक्रम जगभरात पोहोचला असून, कॅनडामध्येही त्याचा प्रभाव आणि व्याप्ती दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. या चित्रपट महोत्सवादरम्यानच्या वेव्हज बाजाराअंतर्गत नियोजित कार्यक्रमामध्ये निमंत्रितांची चर्चा, गोलमेज बैठका, धोरणात्मक संवाद तसेच भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींमध्ये थेट व्यवसायविषयक (B2B) बैठकांसह, इतर अनेक उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
कपिध्वज प्रताप सिंह म्हणाले, “टोरांटो हे चैतन्यमयी चित्रपट उद्योग आणि विशाल भारतीय समुदायाचे घर आहे. टीआयएफएफ मध्ये वेव्हज बाजाराची सुरुवात होणे हे भारत आणि कॅनडा यांच्या दरम्यानचे सांस्कृतिक तसेच व्यापारी संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेने योग्य वेळी टाकलेले पाऊल आहे.”

टीआयएफएफचे सीईओ बेली यांनी संस्कृतींच्या दरम्यानची भागीदारी जोपासण्याप्रती टीआयएफएफची कटिबद्धता अधोरेखित केली तसेच जागतिक चित्रपटीय परिदृश्यात भारताच्या वाढत्या प्रभावाची पोचपावती सुद्धा दिली. आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणून मोठ्या प्रमाणात मान्यता पावलेल्या बेली यांनी टीआयएफएफचे रुपांतर एका खऱ्या अर्थाने जागतिक चित्रपट महोत्सवात केले असून हा महोत्सव वैविध्यात प्राविण्य मिळवत नव्या कलाकारांना अधिक संधी देत पथदर्शी कथाकथनासाठीच्या जागतिक मंचाची उभारणी करत आहे.
वेव्हजच्या उद्घाटनानंतर वेव्हजचे महत्त्व आणि त्यांचे परिणाम, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सर्जक अर्थव्यवस्थांच्या दरम्यानचा सेतू म्हणून वेव्हजची क्षमता यावर केंद्रित असलेल्या बहुशाखीय चर्चा आयोजित करण्यात आल्या आणि त्यात नजीकच्या भविष्यात भारतीय कार्यक्रमांना केंद्रस्थानी ठेवून टीआयएफएफमध्ये समर्पित चित्रपट बाजार स्थापन करण्यासाठी सहयोगाच्या शक्यतेचा शोध घेण्यात आला. अशा प्रकारचा उपक्रम भारत आणि उत्तर अमेरिका यांच्या दरम्यान सह-उत्पादन, सामग्री विनिमय आणि औद्योगिक सहयोग यासाठीचा उत्प्रेरक म्हणून काम करेल.
टीआयएफएफ 2025 मध्ये एनएफडीसीद्वारे प्रदर्शित भारतीय दालन, आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रात भारताची वाढती आघाडी अधोरेखित करत जागतिक नेटवर्किंग, थेट व्यवसायविषयक (B2B) बैठका आणि चित्रपट उद्योगांच्या दरम्यानची देवाणघेवाण यासाठीचे वैशिष्ट्यपूर्ण केंद्र म्हणून काम करते.
एनएफडीसी विषयी थोडक्यात माहिती:
जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) या केंद्रीय संस्थेची स्थापना करण्यात आली. चित्रपट निर्मिती, आंतरराष्ट्रीय सहयोग, सह-उत्पादन करार, महोत्सव आणि वेव्हज बाजार सारखे विपणन उपक्रम यांच्या माध्यमातून भारतीय चित्रपट क्षेत्रातील प्रतिभेची जोपासना करणे आणि भारतीय चित्रपटांची जागतिक स्तरावर पोहोच वाढवणे याप्रती एनएफडीसी कटिबद्ध आहे.
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/तुषार पवार/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164272)