नौवहन मंत्रालय
जहाजबांधणी महासंचालनालयाने साजरा केला भारताच्या सागरी भविष्याला आकार देणाऱ्या 75 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा सोहळा
प्रविष्टि तिथि:
05 SEP 2025 4:15PM by PIB Mumbai
मुंबई, 5 सप्टेंबर 2025
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अखत्यारितील जहाजबांधणी महासंचालनालयाच्या (DGS) वतीने अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत नुकतेच सिप्झ इथल्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (SEZ) भारत रत्नम्-मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर इथे, एका समारंभाचे आयोजन केले होते. या सोहळ्याला सरकारमधील प्रतिष्ठीत मंत्री, वरीष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वे, शिक्षणतज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि सागरी क्षेत्राशी संबंधीत उद्योग व्यावसायिक उपस्थित होते. या समारंभाच्या माध्यमातून समुद्र आणि सेवेच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीच्या 75 वर्षांच्या वाटचालीचे स्मरण केले.

अमृतमहोत्सवा निमीत्त आयोजित या समारंभात बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शांतनु ठाकूर यांच्यासह जहाजबांधणी महासंचालनालयाचे महासंचालक श्याम जगन्नाथन, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बी.के. त्यागी, जहाजबांधणी महासंचालनालयाचे मुख्य दक्षता अधिकारी मनोज कुमार, आणि टपाल सेवांचे संचालक (Mails & BD) मनोज कुमार यांसारखे मान्यवरही उपस्थित होते.
राज्यमंत्री शांतनु ठाकूर यांनी या समारंभाला संबोधित केले. जहाजबांधणी महासंचालनालय भारताच्या सागरी विकासाचा कणा असल्याचे ते म्हणाले. या संस्थेने आपल्या खलाशांना आधार देण्या चे, संबंधित उद्योग व्यवसायांच्या नियमनाची आणि या माध्यमातून जागतिक मानकांची सुनिश्चिती करण्याचं काम केलं आहे, अशा शब्दांत त्यांनी महासंचालनालयाच्या कामाची प्रशंसा केली. जागतिक जहाजबांधणी क्षेत्रात भारताची भूमिका अधिक मजबूत करणे, नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे आणि सागरी क्षेत्रात आपल्या युवा वर्गासाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. आपण सगळे एकत्रितपणे भारताला जागतिक दर्जाचे सागरी केंद्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल करू या असे आवाहनही त्यांनी केले.

जहाजबांधणी महासंचालनालयाचे श्याम जगन्नाथन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. जहाजबांधणी महासंचालनालय अमृतमहोत्सवी सोहळा म्हणजे केवळ 75 वर्षांचे अस्तित्व साजरा करण्यासारखी बाब नाही, तर हा क्षण म्हणजे भारताच्या 5,000 वर्षांच्या जुन्या सागरी वारशाच्या परंपरेतून दिलेली 75 वर्षांची सेवा, लवचिकता आणि नेतृत्वाचा उत्सव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सागरी क्षेत्राची सुरक्षितता सुनिश्चित करण्यापासून ते डिजिटलायझेशन आणि हरित जहाजबांधणीचा अवलंब करण्यापर्यंत, महासंचालनाने आजवर केलेली वाटचाल ही, या संस्थेने सातत्यपूर्णतेने जागतिक आव्हानांशी जुळवून घेतले असल्याची प्रचिती देणारी आहे असे ते म्हणाले. आता ही संस्था सागरी व्यवहार महासंचालनालयाच्या दिशेने (Directorate of Maritime Affairs) संक्रमण करू लागली आहे, अशावेळी संस्थेच्या कार्याचा विस्तार हा जहाजबांधणी, देशांतर्गत जलवाहतूक, अपतटीय मोहिमा, आणि सागरी क्षेत्राअंतर्गतची शाश्वततेपर्यंत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मॅरिटाइम इंडिया व्हिजन 2030 आणि अमृतकाळ 2047 या संकल्पनांपासून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेत जागतिक पटलावर खलाशांच्या संख्येबाबत भारताचा वाटा दुप्पटीपर्यंत वाढवणे, भारताला जहाजबांधणी क्षेत्रातल्या आघाडीच्या पाच देशांमध्ये स्थान मिळवून देणे आणि जागतिक दर्जाची सागरी प्रशिक्षण व्यवस्था विकसित करणे हे महासंचालनालयाचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली. अमृतमहोत्सव हा क्षण म्हणजे आपल्या समर्पण भावनेने संस्थेला आजवरचा यशदायी वाटचालीचा टप्पा गाठून देणाऱ्या संस्थेचे अधिकारी, खलाशी, प्रशिक्षण संस्था आणि उद्योग भागीदारांचा गौरव असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. या संस्थेप्रती या सगळ्यांची तीव्र भावनाच भारताला जागतिक सागरी क्षेत्राचे नेतृत्व करणारा देश बनवण्याच्या दिशेने पुढे घेऊन जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या एकदिवसीय सोहळ्याअंतर्गत चार उपक्रमांचे आयोजन केले गेले होते. याअंतर्गत 75 इअर्स ऑफ सी ॲन्ड सर्विस या सागरी प्रदर्शनाच्या उद्घाटनाने समारंभाची औपचारिक सुरुवात झाली. मुंबई बंदर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय जहाजबांधणी संचालक आणि सचिव राजीव जलोटा तसेच टी. एस. रेहमान या संस्थेचे प्राचार्य कॅप्टन डॉ. आशुतोष व्ही. अपंडकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात भारताचा समृद्ध सागरी वारसा आणि जहाज बांधणी क्षेत्राच्या आजवरच्या प्रगतीची वाटचाल मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने समारंभासाठी उपस्थित निवृत्त अधिकारी, जहाजबांधणी महासंचालनालयाचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रदर्शनातील दुर्मिळ दृश्ये, अभिलेखीय नोंदी आणि भारताच्या सागरी क्षेत्राच्या विकासाला दिशा देणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या इतिहासातून सफरीचा अनुभव घेता आला.

या सोहळ्याच्या निमित्ताने विशेष स्मरणिका टपाल पाकिटाचे तसेच विशेषत्वाने तयार केलेल्या My Stamp या टपाल तिकीटाचे अनावरण केले गेले. यासोबतच भारताच्या सागरी क्षेत्राची वाटचाल दर्शवणाऱ्या एका कॉफी टेबल बुकचे प्रकाशनासह, जहाजबांधणी महासंचालनालयाची 1949 मध्ये स्थापना स्थापना झाल्यापासूनच्या आजवरच्या वाटचालीवर आधारित माहितीपटाचा ट्रेलरही प्रदर्शित केला गेला.
या सोहळ्याच्या निमित्ताने सागरी क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने विविध श्रेणींअंतर्गत जहाजबांधणी महासंचालनालयाच्या वर्धापन दिन पुरस्कारांचे वितरणही केले गेले. याअंतर्गत नौशक्ती वुमन इन मॅरिटाइम एक्सलन्स अवॉर्ड, हरित समुद्र – ग्रीन शिपिंग पायनियर अवॉर्ड,. डिजिटल नौकिक – टेक ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड आणि ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड हे पुरस्कार प्रदान केले गेले.
या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने एकोज फ्रॉम द सी या संकल्पनेवर आधारित आणि भारतातील खलाशी आणि सागरी कर्मचाऱ्यांच्या धैर्य, लवचिकता आणि नावोन्मेषाचा गौरव करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
* * *
पीआयबी मुंबई | सोनल तुपे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2164219)
आगंतुक पटल : 38
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English