दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक दिवंगत लक्ष्मीदास बोरकर यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन
Posted On:
19 AUG 2025 7:00PM by PIB Mumbai
पणजी, 19 ऑगस्ट 2025
स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीदास बोरकर जनशताब्दी सोहळा समितीने, टपाल विभागाच्या सहकार्याने, गोव्यातील प्रतिष्ठित स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजसुधारक दिवंगत लक्ष्मीदास बोरकर यांच्या सन्मानार्थ एका विशेष टपाल तिकिटाचे आणि लिफाफ्याचे प्रकाशन दिनांक 17 ऑगस्ट, 2025 रोजी मडगाव येथील रवींद्र भवन येथे गोव्याचे राज्यपाल पी. अशोक गजपती राजू यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना, राज्यपाल पी गजपती राजू यांनी लक्ष्मीदास बोरकर यांच्या कार्याची माहिती दिली. बोरकर निर्भय पत्रकार होते आणि त्यांनी सक्रीय राहून गोव्यातील पोर्तुगीज राजवटीला आव्हान दिले. गोवा मुक्तीसाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला तसेच अनेक हालअपेष्टा सहन केल्या. भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान स्मरणात ठेवण्याचे आणि त्यांचा गौरव करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
स्वातंत्र्यलढ्यातील बोरकरांच्या मध्यवर्ती भूमिकेचे महत्त्व अमिताभ सिंग यांनी सांगितले आणि सार्वजनिक सेवा आणि साहित्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले होते अशी माहिती दिली. "राष्ट्र आणि समाजाच्या कार्यासाठी पाच दशकांहून अधिक काळ समर्पित कार्य केलेल्या व्यक्तीला" सन्मानित करण्यासाठी टपाल तिकीट आणि ‘लिफाफा’ यांचे प्रकाशन करत असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली.
1943 ते 1961 या काळात लक्ष्मीदास बोरकर यांचे गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीतील उल्लेखनीय योगदान, तसेच डॉ. राम मनोहर लोहिया यांच्याशी असलेले त्यांचे जवळचे संबंध, पत्रकारिता आणि संघटनात्मक नेतृत्व याबद्दल लक्ष्मीदास बोरकर यांचे पुत्र डॉ. नितीन बोरकर यांनी, माहिती दिली. त्यांनी लक्ष्मीदास बोरकर यांच्या सन्मानार्थ वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांची रूपरेषाही सांगितली.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध कोकणी लेखक दामोदर मावजो; समारोह समितीचे अध्यक्ष गुरुदास सावळ; विद्वान आणि प्रमुख वक्ते डॉ. नारायण देसाई; गोवा विभागाचे टपाल सेवा संचालक रमेश पी. पाटील यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला लक्ष्मीदास बोरकर यांचे कुटुंबीय, टपाल तिकीट संग्राहक आणि टपाल विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
लक्ष्मीदास बोरकर यांचे जीवन आणि कार्यावर आधारित 'दास-पर्व' या माहितीपटाच्या प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
17 ऑगस्ट 2025 रोजी जारी करण्यात आलेले 'टपाल तिकीट' आणि 'लिफाफा' 18 ऑगस्ट 2025 पासून पणजी येथील फिलाटेलिक काऊन्टर, पणजी मुख्य टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध असतील.

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158037)
अभ्यागत कक्ष : 12