वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
नवी दिल्लीमध्ये व्यापार आणि गुंतवणूक विषयक भारत-सिंगापूर संयुक्त कृतिगटाची चौथी बैठक संपन्न
द्विपक्षीय चर्चांमध्ये व्यापार सुलभीकरण, गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि सहकार्याच्या नव्या क्षेत्रांवर अधिक भर
भारत-सिंगापूर भागीदारीने राजनैतिक संबंधांची 60 वर्षे तर व्यापक आर्थिक सहकार्य कराराची (सीईसीए) 20 वर्षे पूर्ण
Posted On:
15 AUG 2025 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी व्यापार आणि गुंतवणूक विषयक भारत-सिंगापूर संयुक्त कृतिगटाची (जेडब्ल्यूजीटीआय) चौथी बैठक संपन्न झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाचे विशेष सचिव राजेश अग्रवाल तसेच सिंगापूरच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाचे स्थायी सचिव डॉ.बेह स्वान जिन यांनी संयुक्तपणे या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. सदर बैठकीच्या एक दिवस आधी पार पडलेल्या तिसऱ्या भारत-सिंगापूर गोलमेज (आयएसएमआर) बैठकीच्या पाठोपाठ उपरोल्लेखित बैठक झाली.
जेडब्ल्यूजीटीआयमध्ये झालेल्या विचारविनिमयात द्विपक्षीय व्यापार तसेच गुंतवणूक संबंध अधिक दृढ करणे, अधिक उत्तम संरेखनासाठीची प्राधान्य क्षेत्रे निश्चित करणे, माल-व्यापारासाठी वाहतूक व्यवस्था आणि पुरवठा साखळीमध्ये सुधारणा करणे , नियामक चौकट अधिक मजबूत करणे आणि सीमापार व्यापार अधिक सोयीस्कर होण्याचे मार्ग शोधण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
या बैठकीत उपस्थितांशी बोलताना राजेश अग्रवाल म्हणाले की, भारत-सिंगापूर यांच्यातील नातेसंबंधामध्ये आता पारंपरिक व्यापाराच्या पलीकडे पोहोचून उत्क्रांतीचा टप्पा गाठला आहे. या दोन्ही देशांना व्यापार आणि गुंतवणुकीतील सशक्त सहभागाचा लाभ मिळत असला तरीही सहकार्यात आणखी वाढ करण्यासाठी प्रचंड संधी अजूनही उपलब्ध आहेत.
2025 या वर्षी भारत-सिंगापूर यांच्यादरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याला 60 वर्षे झाली आहेत आणि याच वर्षी दोन्ही देशांनी व्यापक आर्थिक सहकार्य करार केल्याला (सीईसीए) 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्ष 2005 मध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आलेला सीईसीए हा भारताने केलेला पहिला व्यापक व्यापार करार होता तर सिंगापूर पहिल्यांदाच एखाद्या दक्षिण आशियाई देशाशी हा करार करत होता.
वर्ष 2024–25 दरम्यान 34.26 अब्ज डॉलर्सच्या एकंदर द्विपक्षीय व्यापारासह सिंगापूर हा आसियान देशांच्या गटातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. तसेच एप्रिल 2000 ते जुलै 2024 या कालावधीत 163.85 अब्ज डॉलर्स (11,24,509.65 कोटी रुपये) च्या इक्विटीच्या ओघासह म्हणजेच देशाच्या समग्र इक्विटीच्या ओघाच्या 24% भागाच्या ओघासह सिंगापूर हा देश भारतात थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे.
सदर बैठकीमध्ये सेमीकंडक्टर क्षेत्र आणि व्यापाराच्या डिजिटलीकरणासह सध्या अस्तित्वात असलेल्या सहयोगाच्या इतर क्षेत्रांचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी कौशल्य विकास, क्षमता निर्मिती आणि परस्पर हिताच्या इतर उदयोन्मुख क्षेत्रांतील भागीदारीच्या शक्यता पडताळण्यात आल्या. अशा संधी ठोस परिणामांमध्ये परिवर्तीत करण्याच्या दृष्टीने वारंवार भेटींचे महत्त्व दोन्ही देशांनी मान्य केले.
* * *
सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156956)