नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौवहन महामंडळाने ताफ्यात “सह्याद्री” एलपीजी वाहक जहाजाचा समावेश


जागतिक वायू वाहतूक संबंधित बाजारपेठेत स्थान झाले बळकट

Posted On: 15 AUG 2025 12:30PM by PIB Mumbai

मुंबई, 15 ऑगस्‍ट 2025

 

79th स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय नौवहन महामंडळाने (SCI) मोठ्या प्रमाणात वायू वाहतूक करणाऱ्या (VLGC) “सह्याद्री” या जहाजाचा ताफ्यात समावेश करून आपली एलपीजी वाहतूक क्षमता बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

भारत सरकारच्या सागरी अमृत काल संकल्पना 2047 आणि सागरी भारत संकल्पना 2030 यांच्याशी सुसंगतपणे आणि केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या (MoPSW) मार्गदर्शनाखाली, SCI भारतीय तिरंग्याखालील सागरी वाहतुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि नौवहन क्षेत्रात आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या ताफ्याचा विस्तार करत आहे.

या प्रसंगी, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्गमंत्री श्री. सर्वानंद सोनोवाल म्हणाले,

“आपल्या माननीय पंतप्रधानांनी मांडलेली नौवहनातील आत्मनिर्भरतेची संकल्पना अशा प्रकारे प्रत्यक्षात साकार होत आहे.”

IMO (आंतरराष्ट्रीय सागरी संघटना) क्रमांक 9359478 असलेल्या या नव्याने समाविष्ट जहाजाची बांधणी दक्षिण कोरियात झाली असून, भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्यालगतच्या सह्याद्री पर्वतरांगांचे प्रतीक म्हणून त्याचे “सह्याद्री” असे नामकरण करण्यात आले आहे.

या VLGC जहाजाची मालवाहतूक क्षमता 82,000 घनमीटर आहे, याची एकंदर लांबी (LOA) 225 मीटर, रुंदी 36 मीटर आणि खोली 22 मीटर आहे. हे जहाज DNV (डेट नॉर्स्के व्हेरिटास) आणि भारतीय नौवहन नोंदणी (IRS) या दोन्ही संस्थांच्या निकषांनुसार प्रमाणित आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय मानके आणि नियमनांची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित होते. यामुळे सागरी सुरक्षितता, पर्यावरण संरक्षण आणि कार्यक्षमता वाढते तसेच जोखीम कमी होते. या जहाजाची क्षमता आणि तांत्रिक मानके यामुळे SCI च्या ऊर्जा वाहतूक क्षमतेत, विशेषतः वेगाने वाढणाऱ्या एलपीजी क्षेत्रात, महत्त्वपूर्ण भर पडेल.

या जहाजाच्या समावेशामुळे SCI च्या मालकीच्या 57 जहाजांची एकूण वजनवाहन क्षमता आता 5.2 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचली आहे. हे नवे वायू वाहक जहाज प्रामुख्याने पर्शियन आखात आणि भारत यांच्यादरम्यान एलपीजी वाहतुकीसाठी तैनात केले जाईल, ज्यामुळे देशातील वाढत्या वायू मागणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या ऊर्जा पुरवठ्याची सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह वाहतूक सुनिश्चित होईल.

04 जुलै 2025 रोजी सेकंड हँड VLGC जहाजांच्या (प्रत्येकी 82,000 घनमीटर क्षमता) हस्तांतरणासाठी झालेल्या सामंजस्य करारांतर्गत हे पहिले जहाज अधिग्रहित करण्यात आले आहे. या करारातील दुसऱ्या जहाजाचे बाह्य हिमालयीन पर्वतरांगांच्या नावावरून “शिवालिक” असे नामकरण केले जाणार आहे.

हा धोरणात्मक विस्तार SCI च्या वेगाने वाढणाऱ्या एलपीजी क्षेत्रातील क्षमतेला लक्षणीय चालना देईल, महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवरील उपस्थिती बळकट करेल, जागतिक स्पर्धात्मकता वाढवेल आणि भारताच्या सागरी आत्मनिर्भरतेसाठी योगदान देईल.

 

* * *

 

पीआयबी मुंबई | यश राणे/ संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156752)
Read this release in: English