अणुऊर्जा विभाग
खारघर येथील अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) मधील टाटा मेमोरियल सेंटर (TMC) प्रोटॉन थेरपी सुविधेत स्थापनेपासून दोन वर्षांत 541 रुग्णांवर उपचार
65% रुग्णांना सवलतीच्या दरात, तर 27% रुग्णांना मोफत उपचार
Posted On:
15 AUG 2025 11:58AM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑगस्ट 2025
टाटा मेमोरियल सेंटर (TMC) नॅशनल हॅड्रॉन बीम थेरपी सुविधेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मे 2023 रोजी लोकार्पण केले. नवी मुंबईतील खारघर येथील अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) मध्ये ही अत्याधुनिक सुविधा आहे. यात 360 अंश रोटेशन गॅन्ट्री असलेले तीन रुग्ण कक्ष आहेत, जे नवीनतम पेन्सिल बीम स्कॅनिंग (PBS) तंत्रज्ञानाने सुसज्ज असून इंटेन्सिटी मॉड्युलेटेड प्रोटॉन थेरपी (IMPT) देण्यास सक्षम आहेत. 15 ऑगस्ट 2023 पासून सेवा सुरू झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत ACTREC येथील TMC प्रोटॉन थेरपी सुविधेत 541 रुग्णांवर उपचार झाले आहेत, अशी माहिती टाटा मेमोरियल सेंटरच्या प्रोटॉन थेरपी सेंटरचे उपसंचालक (शैक्षणिक) आणि प्रभारी डॉ. सिद्धार्थ लस्कर यांनी दिली.
65% रुग्ण सर्वसाधारण श्रेणीतील असून त्यांना सवलतीच्या दरात उपचार मिळाले, तर 27% रुग्ण (146 रुग्ण) यांना पूर्णपणे मोफत उपचार किंवा रुग्णालयाने रुग्ण कल्याण निधी (Patient Welfare Funds) आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतून उभारलेल्या निधीतून मदत मिळाली, असे डॉ. लस्कर यांनी सांगितले. 86 रुग्ण (16%) हे लहान मुलांच्या वयोगटातील होते. उपचार घेतलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांमध्ये CNS ट्यूमर (38%) आणि हाडांचे ट्यूमर (23%) यांचा समावेश होता, त्यानंतर डोके आणि मानेचे ट्यूमर (19%), लहान मुलांमधील ट्यूमर, स्त्रीरोग, स्तन, प्रोस्टेट आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्यूमर यांचा समावेश होता. आतापर्यंत केंद्रात उपचार घेतलेल्या सर्व रुग्णांची तज्ञ उपचार गटांकडून कसून तपासणी करून प्रोटॉन थेरपीचा जास्तीत जास्त फायदा मिळेल याची खात्री केली गेली आणि त्यांनी कमीत कमी दुष्परिणामांसह उपचार पूर्ण केले.
या केंद्रात अगदी लहान मुलांवर भूल देऊन उपचार करण्याची सुविधा आहे, तसेच उपचार घेणाऱ्या मुलांसाठी खास खेळाची जागा आहे. प्रोटॉन थेरपी घेणाऱ्या रुग्णांसाठी "प्रेरक" नावाचा स्वयंसेवी रुग्ण सहायता गट तयार करण्यात आला आहे, जो रुग्णांमध्ये परस्पर सहाय्य, संवाद आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ करतो. बहुतांश रुग्णांना ACTREC संकुलात अगदी नाममात्र शुल्कात राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.
TMC प्रोटॉन थेरपी सुविधेने देशाच्या सर्व भागांतील रुग्णांना सेवा पुरवली आहे. यापैकी 52% रुग्ण पश्चिम विभागातील, 23% पूर्व विभागातील, 14% उत्तर विभागातील, 6% दक्षिण विभागातील आणि 4% मध्य विभागातील होते. उपचार घेतलेल्या रुग्णांपैकी 1% आंतरराष्ट्रीय रुग्ण होते.
ACTREC चे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले की, टाटा मेमोरियल सेंटरने प्रौढ आणि मुलांमधील विविध आजारांसाठी प्रोटॉन थेरपीचा वापर अधिक चांगल्या प्रकारे परिभाषित करण्यासाठी उच्च दर्जाचे वैज्ञानिक पुरावे तयार करण्यासाठी काही संशोधन प्रकल्प सुरू केले आहेत. टाटा मेमोरियल सेंटर आणि भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मधील शास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्या सहकार्याने तंत्रज्ञान आणि जीवशास्त्राचे मूल्यांकन करणारे संशोधनही सुरू करण्यात आले आहे. "भविष्यात अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर उपाय विकसित करण्यासाठी संशोधन उपक्रम हाती घेण्याची आमची योजना आहे," असे डॉ. चतुर्वेदी म्हणाले.
टाटा मेमोरियल सेंटर ने आयोन बीम अॅप्लिकेशन्स (IBA), बेल्जियम यांच्या सहकार्याने हे यश मिळवले आहे, जे सध्या उच्च दर्जाच्या प्रोटॉन थेरपी उपकरणांमध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर आहेत. IBA कडे प्रोटॉन थेरपी उपकरणांच्या जागतिक बाजारपेठेत 50% पेक्षा जास्त वाटा आहे, तसेच नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासातही ते आघाडीवर आहेत. TMC आणि IBA यांनी संयुक्तपणे क्लिनिशियन, भौतिकशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांसाठी प्रोटॉन थेरपीमध्ये कौशल्यवृद्धीसाठी व्यावहारिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याचा पहिला कार्यक्रम सप्टेंबर 2025 मध्ये नियोजित आहे.
टाटा मेमोरियल सेंटर चे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी नमूद केले की, अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर येथील प्रोटॉन थेरपी सेंटर हे टाटा मेमोरियल सेंटरच्या सर्व गरजू रुग्णांना, त्यांच्या उपचार खर्चाची क्षमता विचारात न घेता, अत्याधुनिक कर्करोग उपचार प्रदान करण्याच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.
टाटा मेमोरियल सेंटर ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत प्रशासित स्वायत्त अनुदान-सहाय्य संस्था आहे.
* * *
पीआयबी मुंबई | यश राणे/ सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156744)
Visitor Counter : 2