आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ (आयसीएमआर)-एस.एच.आय.एन.ई. उपक्रमांतर्गत ICMR-NIV पुणे येथे ‘ओपन स्कूल डे’ चे आयोजन
Posted On:
13 AUG 2025 5:15PM by PIB Mumbai
मुंबई, 13 ऑगस्ट 2025
शास्त्रज्ञ आणि नवकल्पनाधारकांच्या उगवत्या पिढीला प्रेरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील प्रसार कार्यक्रम असलेल्या भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ(आयसीएमआर)- एस.एच.आय.एन.ई. (उभरत्या संशोधकांसाठी विज्ञान आणि आरोग्यविषयक नवोन्मेष)उपक्रमाचा भाग म्हणून आयसीएमआर-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही)दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी संस्थेच्या डॉ. आंबेडकर मार्ग तसेच पाषाण अशा दोन्ही शाखांमध्ये ‘ओपन स्कूल डे’ चे आयोजन केले.पुणे परिसरातील 26 वेगवेगळ्या शाळांतील 9 वी ते 12 वी या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या 369 शालेय विद्यार्थ्यांनी उपक्रमात भाग घेतला. यामध्ये सहभागी शाळांतील 36 शिक्षक देखील यावेळी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.

विज्ञान भारती (विभा) या संस्थेच्या सक्रीय सहभागामुळे हा उपक्रम आणखी समृद्ध झाला. केंद्रीय आरोग्य संशोधन विभाग सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ.राजीव बहल यांनी यावेळी उपस्थित उच्च माध्यमिक वर्गांतील विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणाच्या श्रोतृवृंदाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना वर्षभरातील एक दिवस शास्त्रज्ञ म्हणून एखाद्या संशोधन संस्थेत व्यतीत करण्याचे जोरदार आवाहन केले होते ही बाब डॉ.बहल यांनी अधोरेखित केली. आयसीएमआर-एनआयव्ही या संस्थेचे संचालक डॉ.नवीन कुमार यांनी सहभागी विद्यार्थ्यांना विषाणूंविषयी महत्त्वाची माहिती दिली तसेच विषाणू विज्ञान क्षेत्रातील संशोधनाचे महत्त्व विषद केले.
या कार्यक्रमात रोगवाहक घटकामुळे होणारे आजार, श्वसनमार्गाचा संसर्ग, प्राणीजन्य आजार यांसह अनेक महत्त्वाच्या संशोधन संकल्पना सादर करण्यात आल्या होत्या. सदर सत्रात विषाणूजन्य संसर्गांवर आधारित चित्रफलक प्रदर्शने, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील समस्या सोडवण्यातील योगदानांबाबत विचारसंपन्न व्हिडिओज, कीटकशास्त्रीय नमुन्यांचे जिवंत सादरीकरण आणि संरक्षणात्मक साधनांचा वापर इत्यादी कार्यक्रमांसह आयसीएमआर-एनआयव्ही संस्थेत कार्यरत शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची अपूर्व संधी अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता.
यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आयसीएमआर-एस.एच.आय.एन.ई. हे नाव लिहिलेल्या टोप्या तसेच सहभागाची प्रमाणपत्रे देण्यात आली. केरळमध्ये अलाप्पुझा येथे आयसीएमआर-एनआयव्हीच्या क्षेत्रीय एककात देखील अशाच पद्धतीचे सत्र आयोजित करण्यात आले होते आणि त्यामध्ये 10 शाळांतील 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील आरोग्य संशोधन विभागाच्या आधिपत्याखाली कार्यरत आयसीएमआर- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय संशोधन संस्था आहे. या संस्थेने देशात क्रिमियन काँगो हिमरेजिक फिवर विषाणू, निपाह विषाणू आणि झिका विषाणू यांसारख्या अति धोकादायक रोगकारकांचा लवकर शोध घेण्यात आणि त्यांच्या साथींवर नियंत्रण ठेवण्यात मोठे योगदान दिले आहे. क्यासनूर फॉरेस्ट आजाराला कारणीभूत विषाणू, जपानी एनसीफीलायटीस कारक विषाणू आणि सार्स-कोव्ही-2 विषाणू यांचा प्रतिबंध करणाऱ्या लसींचे संशोधन करण्यात तसेच सार्वजनिक वापरासाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यात दिलेल्या योगदानाचा या संस्थेला मोठा अभिमान आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागातील विषाणू संशोधन आणि निदानप्रयोगशाळांच्या जाळ्यासाठी महत्वाचे स्त्रोत केंद्र म्हणून काम करते. सदर संस्थेमध्ये होणाऱ्या संशोधन कार्यांचा समन्वय प्रख्यात शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या वैज्ञानिक सल्लागार समिती (एसएसी) द्वारे करण्यात येतो.
* * *
पीआयबी मुंबई | सोनल तुपे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156092)
अभ्यागत कक्ष : 26