कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी इथून चालवल्या जात असलेले बेकायदेशीर कॉल सेंटरचे रॅकेट केले उध्वस्त


सायबर फसवणुकीत सहभागी 5 आरोपींना अटक

44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन, सोने, आलिशान गाड्या आणि मोठी रोकडही केली जप्त

Posted On: 10 AUG 2025 2:31PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी (रेनफॉरेस्ट रिसॉर्ट) इथे एका भाडे तत्वावरील जागेत, काही खासगी व्यक्तींद्वारे चालवल्या जात असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटरचे रॅकेट उध्वस्त केले.

या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयने दि. 8 ऑगस्ट रोजी मुंबईचे  रहिवासी असलेल्या 6  व्यक्ती तसेच इतर अज्ञात व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालमध्ये नमूद केल्यानुसार, आरोपींनी परस्परांच्या सोबतीने, तसेच इतर काही अज्ञात व्यक्तींसोबत गुन्हेगारी कट रचून, बेकायदेशीर कॉल सेंटरच्या माध्यमातून स्वतःला अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस कॉल सेंटरचे प्रतिनिधी असल्याचे भासवले, आणि त्यांनी फसव्या कॉल्सच्या माध्यमातून  आर्थिक फसवणूक केली.

या गुन्ह्यातील आरोपी  अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांची फसवणूक करून, त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड्स किंवा क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून बेकायदेशीर कमाई करत होते. हे कॉल सेंटर महाराष्ट्रात नाशिकमध्ये इगतपुरी इथून चालवले जात होते. आरोपींनी हे बेकायदेशीर कॉल सेंटर चालवण्यासाठी डायलर्स, व्हेरिफायर्स आणि क्लोजर्स अशा पदांअंतर्गत सुमारे 60 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती.

या प्रकरणात सीबीआयने केलेल्या तपास आणि कारवाई अंतर्गत 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाच्या  डिजिटल पुराव्यासंह,  1.20 कोटी रुपयांची  बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि 1 कोटी रुपये किमतीच्या 7 आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कॉलसेंटरच्या माध्यमातून अंदाजे 5000 USDT क्रिप्टोकरन्सी (5 लाख रुपये) मूल्याचे, तसेच 2000 कॅनेडियन डॉलरचे गिफ्ट व्हाउचरचे (1.26 लाख रुपये) व्यवहार आढळून आले. यासोबतच संबंधित कॉलसेंटरच्या ठिकाणी सीबीआयने छापा मारल्यानंतर तिथे कॉल सेंटरमध्ये कार्यरत असलेले 62 कर्मचारी परदेशी नागरिकांना फसवण्याचे काम करत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे.

***

सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2154845)
Read this release in: English