आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयसीएमआर–एनआयआयएचतर्फे पुढील पिढीतील वैज्ञानिकांना प्रेरणा देण्यासाठी  एस.एच.आय.एन.ई (पुढील पिढीतील संशोधकांसाठी विज्ञान आणि आरोग्य नवप्रवर्तन) कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 08 AUG 2025 6:16PM by PIB Mumbai

 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी (आयसीएमआर–एनआयआयएच) यांच्यातर्फे दिनांक 8 ऑगस्ट 2935 रोजी एस.एच.आय.एन.ई  (पुढील पिढीतील संशोधकांसाठी विज्ञान आणि आरोग्य नवप्रवर्तन)या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत संस्थेच्या परिसरातील शाळांमधील नववी इयत्तेतील हुशार विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. हा उपक्रम आरोग्य संशोधन विभाग (डीएचआर) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्यातर्फे देशभर आयोजित करण्यात आलेल्या ओपन-डे कार्यक्रमाचा एक भाग होता. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विद्यार्थ्यांनी एक दिवस वैज्ञानिक म्हणून घालवावा” या आवाहनाशी सुसंगत आहे.

आयसीएमआर–एनआयआयएच मध्ये के.एम.एस. डॉ. शिरोडकर हायस्कूल आणि सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल येथील 70 विद्यार्थी आणि 4 शिक्षक सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांना संस्थेतील अत्याधुनिक जैववैद्यकीय संशोधन प्रयोगशाळांची मार्गदर्शित सफर करून देण्यात आली. सोबतच त्यांना विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण, विज्ञान व आरोग्यविषयक माहितीपट, आणि शास्त्रज्ञांशी थेट प्रश्नोत्तर सत्रांचा अनुभव मिळाला. या कार्यक्रमामध्ये 'डॉ. क्युरिओ' या मॅस्कॉटने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वातावरणनिर्मिती केली.

आरोग्य संशोधन विभागाचे सचिव व आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी विद्यार्थ्यांना व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित करत सांगितले, “कोविड-19 च्या काळात आयसीएमआरने लस विकास, अचूक चाचण्या आणि उपचार पद्धती तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आम्ही विद्यार्थ्यांना आमच्या प्रयोगशाळांना भेट द्यायला आमंत्रित करतो जेणेकरून त्यांना विज्ञान कसे नवकल्पना घडवते आणि नवतंत्रज्ञान निर्माण करते हे पाहता येईल.”

या प्रसंगी आयसीएमआर–एनआयआयएच च्या संचालिका डॉ. मनीषा मडकईकर यांनी सांगितले की, “जिज्ञासा ही नवकल्पनांचे बीज असते. तसेच एस.एच.आय.एन.ई  कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल आणि भविष्यात ते वैज्ञानिक व नवोपक्रम करणारे म्हणून देशाच्या आरोग्यदृष्ट्या प्रगतीमध्ये योगदान देतील, अशी आशा आहे.”

विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर एका विद्यार्थ्याने सांगितले की, “ही माझी पहिलीच वेळ होती जिथे मी प्रत्यक्ष संशोधन प्रयोगशाळा पाहिली आणि यामुळे मला वैज्ञानिक होण्याची प्रेरणा मिळाली.” दुसऱ्याने सांगितले की, “ही सत्रे खूप मजेशीर आणि शैक्षणिक होती, विज्ञान प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळाली.”

विद्यार्थ्यांना आयसीएमआरच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांवरील माहितीपट दाखवण्यात आले, ज्यामध्ये कोवॅक्सिन विकास, आयड्रोन प्रकल्प, क्षयरोग निर्मूलन मोहिम व ‘विषाणू युद्ध अभ्यास’या महामारी सज्जतेच्या  कवायती यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचा समारोप सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे व सामूहिक छायाचित्रांचे वितरण करून करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी नवी उमेद व प्रेरणा निर्माण झाली.

एस.एच.आय.एन.ई या कार्यक्रम आयसीएमआरच्या तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या आणि भारताच्या विज्ञान, आरोग्य संशोधन व नवकल्पना क्षेत्रासाठी सक्षम प्रतिभा घडवण्याच्या दृढ निश्चयाचे प्रतीक आहे.

***

निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2154436) Visitor Counter : 2
Read this release in: English