अणुऊर्जा विभाग
मुंबईत 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडचे (आयओएए 2025) आयोजन
आतापर्यंतच्या सर्वात भव्य आयओएएमध्ये सहभागी होण्यासाठी 64 देशांतून 300 च्या विक्रमी संख्येने विद्यार्थी स्पर्धक तसेच सुमारे 140 मार्गदर्शक/शिक्षक सहभागी होण्यासाठी येत आहेत
12 ऑगस्टला जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे उद्घाटन समारंभ तर 21 ऑगस्टला नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात (एनएमएसीसी) समारोप सोहळा रंगणार
Posted On:
07 AUG 2025 10:15PM by PIB Mumbai
मुंबई, 7 ऑगस्ट 2025
मुंबई शहर आता अधिक झगमगणार आहे कारण हे शहर 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड (आयओएए 2025) मध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील सुमारे 300 सर्वात हुशार तरुण खगोलशास्त्रज्ञांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होत आहे! टाटा मुलभूत संशोधन संस्थेच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे (एचबीसीएसई) 11 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत आयोजित होत असलेल्या या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेमुळे सुमारे एका दशकाहून अधिक कालावधीनंतर या आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेचे मुंबईत दिमाखदार पुनरागमन होत आहे.
पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय अणुउर्जा विभागाच्या पाठबळासह होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेली आयओएए 2025 ही केवळ एक स्पर्धा नाही. तर आंतरराष्ट्रीय सहयोग, वैज्ञानिक प्रतिभा यांचा उत्सव आहे आणि खास करून खगोलशास्त्रात भारताच्या वाढत्या आघाडीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे. या स्पर्धेसाठी जगाच्या प्रत्येक खंडातील 64 देशांतून स्पर्धक मुंबईत एकत्र येत असून, त्यापैकी अनेकजण प्रथमच भारताला भेट देत असल्यामुळे ही स्पर्धा कल्पना आणि संस्कृती यांच्या उत्साहपूर्ण देवाणघेवाणीचे आश्वासन देते.
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड (आयओएए)ची पार्श्वभूमी:
जगभरातील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राबाबत वाढत्या रुचीला प्रतिसाद देत तसेच या वेगाने प्रगत होत जाणाऱ्या क्षेत्राला समर्पित जागतिक मंचाची गरज ओळखून 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड (आयओएए)च्या आयोजनाची सुरुवात झाली.
पहिले आयओएए थायलंड मध्ये चियांग माई येथे आयोजित करण्यात आले. तेव्हापासून आयओएए प्रमाण आणि वैविध्य अशा दोन्ही बाबतीत वेगाने विस्तारत गेली.
आयओएए 2025
आयओएए 2025च्या मुंबईतील आयोजनात 64 देशांतून विक्रमी सुमारे 300 विद्यार्थी स्पर्धक तसेच सुमारे 140 नेते (मार्गदर्शक/शिक्षक) यांच्या सहभागासह विक्रम रचला जाणार आहे. यापैकी अनेक देशांतून प्रथमच स्पर्धक भारतात येत आहेत. आतापर्यंतच्या सर्वात भव्य आयोजनासह या कार्यक्रमातून विज्ञान शिक्षण आणि प्रतिभेच्या जोपासनेमध्ये भारताची आघाडी आणि जागतिक सहभाग यांचे दर्शन घडेल.
सोहोळ्यात अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती असेल. 12 ऑगस्टला होणाऱ्या उद्घाटन समारंभाला केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा.अजय सूद यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील तर आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाचे माजी उपाध्यक्ष प्रा.अजित केंभवी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. केंद्रीय अंतराळ विभाग सचिव आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो)अध्यक्ष डॉ.व्ही नारायणन यांच्या उपस्थितीत नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात (एनएमएसीसी) दिनांक 21 ऑगस्टला होणाऱ्या समारोप सोहोळ्यात होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती आणि केंद्रीय अणु उर्जा विभागाचे माजी सचिव डॉ. अनिल काकोडकर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2153959)