कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेचा 20 वा हप्ता जारी


महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून केंद्रीय राज्यमंत्री  प्रतापराव जाधव, डॉ. रामदास आठवले,  मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे  या कार्यक्रमात झाले सहभागी

पीएम-किसान (PM-KISAN) योजनेच्या 20 व्या हप्त्याचे वितरण झाल्याचे औचित्य साधून ICAR–CIFE ने मुंबईत एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे केले आयोजन

Posted On: 02 AUG 2025 5:48PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 20 वा हप्ता जारी केला.

भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पीएम-किसान  ही फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधानांनी सुरू केलेली एक केंद्रीय योजना आहे.  या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांच्या आधार-जोडणी केलेल्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण  पद्धतीने, वार्षिक रु.6,000/- तीन समान हप्त्यांमध्ये जमा केले जातात.

वाराणसीमध्ये आयोजित शेतकरी महोत्सवाच्या भव्य आयोजनाचा उल्लेख करत , पंतप्रधानांनी जाहीर केले की पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशभरातील 10 कोटी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये 21,000 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सातत्याने काम करत असल्याचे सांगून, मोदींनी पूर्वीच्या सरकारांशी याची तुलना केली. ते म्हणाले की, आधीच्या सरकारांमध्ये शेतकऱ्यांच्या नावाने केलेली एकही घोषणा क्वचितच पूर्ण होत होती. मात्र, आपले  सरकार दिलेली वचने पूर्ण करते, आणि पीएम-किसान सन्मान निधी ही योजना सरकारची दृढ वचनबद्धता दर्शवते, यावर त्यांनी भर दिला. आजपर्यंत, ₹3.75 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा झाले आहेत, असे  मोदींनी नमूद केले. या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, कोणताही भ्रष्टाचार किंवा कमिशनशिवाय हा निधी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या सरकारने ही एक कायमस्वरूपी व्यवस्था केली आहेयातून कोणताही पैसा बाहेर जाणार नाही आणि गरिबांचे हक्क नाकारले जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

राज्यपाल, केंद्रीय मंत्री , मुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री तसेच राज्याच्या कृषी मंत्र्यांनी देशभरातील विविध भागांतून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बिहारमधील पाटणा येथे शेतकरी, अधिकारी आणि मान्यवरांच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित केले. महाराष्ट्रामध्ये चार केंद्रीय मंत्री राज्यातील चार वेगवेगळ्या ठिकाणांहून या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी मुंबईतील ICAR-केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था (CIFE) येथून कार्यक्रमात भाग घेतला, तर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ  केव्हीके बारामती येथील कृषी विकास ट्रस्ट येथून सहभागी झाले.

त्याच वेळी, जळगाव येथील केव्हीके मधून युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि केव्हीके बुलढाणा-II मधून आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमात सहभागी झाले. महाराष्ट्रात असलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, या पारदर्शी, डिजिटल आणि थेट लाभ योजनेमुळे शेतकऱ्यांचा सन्मान आणि आत्मविश्वास वाढला आहे.

Description: Image

राज्यमंत्री प्रतापराव जाधव केव्हीके, बुलढाणा येथे

जळगाव येथे राज्यमंत्री रक्षा खडसे

बारामती येथे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

मुंबई येथे राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले

आयसीएआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (सीआय एफ ई), मुंबई यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 20 वा हप्ता वितरित करण्याच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केला. यावेळी बोलताना मुख्य अतिथी केंद्रीय  राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी भारतातील मत्स्य संशोधन आणि शिक्षणात भरीव योगदान दिल्याबद्दल सीआय एफ ई चे कौतुक केले.

"मासेमारी हा एक आव्हानात्मक आणि कौशल्यपूर्ण व्यवसाय आहे," असे त्यांनी नमूद केले. "मत्स्यपालन क्षेत्राला बळकटी देणे आणि आधुनिकीकरण करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे." डिसेंबर 2018 मध्ये सुरू झालेल्या पीएम-किसान योजनेच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना मंत्र्यांनी नमूद केले की देशभरातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा फायदा झाला आहे. मत्स्यपालन क्षेत्राच्या उन्नतीसाठी विशेषतः कॅप्चर आणि कल्चर अशा दोन्ही प्रकारच्या मत्स्यपालनासाठी लक्ष्यित समर्थनाद्वारे आरेखित केलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेकडे (पीएमएमएसवाय) त्यांनी लक्ष वेधले. आयसीएआर-सीआयएफई या केवळ शिक्षण आणि संशोधनातच नव्हे तर आपल्या समुदायाभिमुख उपक्रमांद्वारे सामाजिक न्याय आणि समानता वाढविण्याऱ्या प्रमुख संस्था म्हणूनही उदयास आल्याबद्दल डॉ. आठवले यांनी त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयसीएआर-सीआयएफईच्या पुस्तिकांचे औपचारिक प्रकाशन प्रमुख पाहुणे डॉ. आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. याव्यतिरिक्त, आयसीएआर पुरस्कृत प्रकल्प "स्वच्छता कृती योजना आणि शहरी मासेबाजारातील माशांच्या कचऱ्याचा व्यावसायिक वापर" याअंतर्गत, मच्छिमार महिलांना स्वच्छता साधने वितरित करण्यात आली, ज्यामुळे शाश्वतता आणि समुदाय कल्याणाप्रति  संस्थेची वचनबद्धता दृढ झाली.

या कार्यक्रमाला वर्सोवा, जुहू, मढ, मनोरी इत्यादी विविध मासेमारी गावांमधील 55 हून अधिक मच्छिमार आणि महिला तसेच एफपीओ, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे सदस्य, सीआयएफई शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आयसीएआर-सीआयएफईचे कार्यवाहक संचालक डॉ. देबजित शर्मा, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. स्वदेश प्रकाश आणि डॉ. अर्पिता शर्मा, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नेहा कुरेशी देखील यावेळी उपस्थित होते.

***

सुषमा काणे/शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2151849)
Read this release in: English