शिक्षण मंत्रालय
अंतराळ कार्यक्रमाचे प्रणेते प्रा. ई. व्ही. चिटणीस यांच्या सन्मानार्थ आयसर पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
28 JUL 2025 9:23PM by PIB Mumbai
मुंबई, 28 जुलै 2025
भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार प्राध्यापक एकनाथ वसंत चिटणीस यांच्या सन्मानार्थ शताब्दी उत्सव परिषदेची सुरुवात आयसर (आयआयएसईआर) पुणे येथे चिंतन, उत्सव आणि प्रेरणा दिनाने झाली.
कार्यक्रमाची सुरुवात “इंडिया इन स्पेस” या प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली, यामध्ये इस्रोच्या प्रक्षेपण वाहनांचे - एसएलव्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि चांद्रयान-3 सारख्या प्रमुख पेलोड्सचे स्केल मॉडेल प्रदर्शित करण्यात आले.

डॉ. सुनील भागवत आणि श्री. ए. पी. देशपांडे यांनी स्वागतपर भाषणे करताना भारताच्या सुरुवातीच्या अंतराळ कार्यक्रमातील प्रा. चिटणीस यांचे योगदान आणि विज्ञान संवादाप्रती त्यांची वचनबद्धता यांचे स्मरण केले. नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स (एनसीएससी) चे अध्यक्ष डॉ. ए. पी. जयरामन यांनी डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबतच्या सहकार्याचा आणि स्वदेशी उपग्रह तसेच प्रक्षेपण वाहन कार्यक्रमांना आकार देण्यातील प्रा. चिटणीस यांच्या भूमिकेचा आढावा घेतला.
माजी एसएसी संचालक डॉ. प्रमोद काळे यांनी प्रा. चिटणीस यांच्या नेतृत्व आणि नैतिक मार्गदर्शनाबद्दल वैयक्तिक विचार मांडले, तर डीईसीयूचे माजी संचालक डॉ. किरण कर्णिक यांनी इस्रोच्या सुरुवातीच्या काळातील त्यांच्या धोरणात्मक भूमिकेबद्दल भाष्य केले. डॉ. चेतन चिटणीस यांनी भावपूर्ण वैयक्तिक श्रद्धांजली वाहिली, दुर्मिळ कौटुंबिक किस्से तसेच प्रा. चिटणीस यांच्या मूल्यांबद्दल आणि त्यांच्या शांत सामर्थ्य उलगडून दाखवले.

इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. ए. एस. किरण कुमार यांनी आपल्या बीजभाषणात प्रा. चिटणीस यांचे संस्थात्मक योगदान आणि इस्रोच्या वैज्ञानिक संस्कृतीवरील कायमस्वरूपी प्रभाव यावर प्रकाश टाकला. "फ्रॉम फिशिंग हॅम्लेट टू रेड प्लॅनेट" या पुस्तकातून त्यांनी प्रा. चिटणीस यांचा इस्रोच्या संस्थात्मक मूल्यांवर आणि वैज्ञानिक संस्कृतीवर असलेला खोल प्रभाव अधोरेखित केला.
या उद्घाटन सत्रात त्यांच्या चिरस्थायी वारशाला आदरांजली वाहण्यासाठी प्रख्यात शास्त्रज्ञ, विज्ञान संवादक, विद्यार्थी आणि चाहते एकत्र आले. भारताच्या अंतराळ यशाचा पाया रचण्यास मदत करणाऱ्या आणि शास्त्रज्ञांच्या पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तीला हा कार्यक्रम योग्य आदरांजली ठरला.

* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2149514)