गृह मंत्रालय
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 87 वा स्थापना दिन पुण्यातील सीआरपीएफच्या ग्रुप सेंटर येथे उत्साहात साजरा
Posted On:
27 JUL 2025 8:58PM by PIB Mumbai
पुण्यातील सीआरपीएफचे ग्रुप सेंटर येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) 87 वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. 27 जुलै 1939 रोजी मूळतः क्राउन रिप्रेझेंटेटिव्ह पोलिस म्हणून उभारलेल्या या दलाचे 1949 मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल असे नामकरण करण्यात आले आणि तेव्हापासून ते जगातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलाच्या रुपात विकसित झाले आहे. हे दल देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या रक्षणात मोलाची भूमिका बजावत आहे.

पुण्यातील ग्रुप सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारकात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. कर्तव्य बजावताना देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून त्यांचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर एक विशेष सैनिक संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी पुण्यातील ग्रुप सेंटरचे उप महानिरीक्षक यांनी युनिटच्या सर्व अधिकारी आणि जवानांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी संचालनालय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी उपाययोजनांबद्दल जवानांना माहिती दिली, यामुळे जवानांचे मनोबल वाढले.

यावेळी तंदुरुस्ती आणि एकतेची भावना दर्शविण्यासाठी एक सायकल मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत सर्व स्तरावरील जवानांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. पर्यावरण जागरूकता आणि शाश्वतता वाढविण्यासाठी सेंटरच्या परिसरात एक भव्य वृक्षारोपण मोहीम देखील आयोजित करण्यात आली.

या कार्यक्रमात ग्रुप सेंटर प्रांगणातील मुलांसाठी एक चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमुळे मुलांमधील सर्जनशीलतेला चालना मिळाली आणि दलाच्या परंपरेशी त्यांचा भावनिक संबंध दृढ झाला.
ग्रुप सेंटरच्या सर्व मेसमध्ये सौहार्द आणि बंधुत्वाचे प्रतीक असलेल्या पारंपरिक ‘बारा खाना’च्या आयोजनाने या उत्सवाचा समारोप झाला. अधिकारी, कनिष्ठ अधिकारी आणि जवान यांनी एकत्र भोजन करून बंधुता आणि एकतेचा संदेश दिला.

या प्रसंगी, पुण्यातील ग्रुप सेंटरचे उप महानिरीक्षक वैभव निंबाळकर आयपीएस यांनी उपस्थितांना संबोधित केले :
“केंद्रीय राखीव पोलीस दलाचा इतिहास हा बलिदान आणि शौर्याची तसेच जिंकलेल्या लढायांची आणि मिळवलेल्या गौरवांची गाथा आहे. ही गाथा शूर सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या घामाने आणि रक्ताने लिहिली गेली आहे. आज, आपण हा गौरवशाली वाटचालीचा उत्सव साजरा करत असताना, आपण केवळ राष्ट्र आणि त्याच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्याच्या वेदीवर सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहत नाही तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोर येणाऱ्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करण्याची प्रतिज्ञा करतो.”
हा कार्यक्रम गौरव, शिस्त आणि निष्ठा यांनी ओतप्रोत भरलेला होता , जो केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मूल्यांचा गाभा आहे. ग्रुप सेंटरने आपल्या वैभवशाली परंपरेला अभिवादन करत देश सेवेसाठी अटळ निष्ठा पुन्हा एकदा व्यक्त केली.

***
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2149153)