माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या वतीने आयोजित वार्तालाप - माध्यम परिषदेच्या माध्यमातून नंदुरबारमधील पत्रकारांनी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि लाभार्थ्यांशी साधला संवाद


केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने आयोजित अन्न आणि पोषण विषयक प्रदर्शनाचे नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 24 JUL 2025 8:40PM by PIB Mumbai

नंदुरबार, 24 जुलै 2025

पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाच्या वतीने आज नंदुरबार जिल्हातल्या पत्रकारांसाठी वार्तालाप - माध्यम परिषद, या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्याकडून शाश्वततेकडे (From Skills to Sustainability) ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील 53 पत्रकार सहभागी झाले होते. या परिषदेत सहभागी झालेल्या निमंत्रित पत्रकारांना नंदुरबार जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळणाऱ्या महाराष्ट्राभरातील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने पत्रकारांनी परिषदेसाठी उपस्थित असलेल्या योजनेच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधला आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले. 

या परिषदेच्या उद्घाटन सत्रात भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे, पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाचे संचालक सय्यद रबीहाश्मी आणि नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी उपस्थित होत्या.पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाच्या सहाय्यक संचालक निकिता जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकेतून या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचा उद्देश मांडला. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी उद्घाटन सत्राला संबोधित केले. त्यांनी आपल्या संबोधनातून वार्तालाप उपक्रमाची प्रशंसा केली. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार हे नागरी प्रशासनाचे कान आणि डोळे असल्याचे म्हणत, या अनुषंगाने पत्रकारांची महत्वाची भूमिका त्यांनी मांडली. पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाचे संचालक सय्यद रबीहाश्मी यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. पत्रकारितेच्या क्षेत्रात 1.55 लाखांहून अधिक प्रकाशने आणि 900 पेक्षा जास्त दूरचित्रवाणी वाहिन्यांचा समावेश असून, पत्रकारांच्या एवढ्या मोठ्या विश्वाला सरकारशी जोडण्यात वार्तालाप सारखा उपक्रम महत्वाची भूमिका बजावत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

परिषदेची सुरुवात भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाचे ( ट्रायफेड )प्रादेशिक व्यवस्थापक अजित वाच्छानी आणि ट्रायफेडचे आदिवासी लाभार्थी यांच्यातील ‘भविष्य घडवताना: आदिवासी नवोन्मेष आणि विपणनाद्वारे रोजगारनिर्मिती’ या शीर्षकाच्या परिसंवादाने केली. त्यांनी माहिती दिली की नंदुरबारमध्ये 11 वनधन विकासगट मंजूर झाले आहेत. 

सरकारी योजनेअंतर्गत होत असलेल्या चांगल्या ब्रँडिंगमुळे त्यांच्या गटातील समुदायांना आपली आदिवासी उत्पादने ट्रायफेडच्या माध्यमातून सहा पट अधिक नफ्यात कशी विकता आली आहेत, हे लाभार्थ्यांनी सांगितले. एका लाभार्थ्याने मुंबई, दिल्ली, नागपूर आणि इतर शहरांमधील विविध स्टॉलवर मोहाचे लाडू आणि अळंबी उत्पादने कशी यशस्वीरित्या विकली गेली आणि देशभरात प्रसिद्धी कशी मिळाली, याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. या योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या समन्वयाने राबविल्या जातात. या परिसंवादाचे सूत्रसंचालन पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या प्रसारमाध्यमे आणि संपर्क अधिकारी सोनल तुपे यांनी केले.

त्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी 'सर्वांसाठी खेळ: खेलो भारत नीती 2025 आणि SAI च्या योजनांवरील चर्चा' या चर्चासत्राला संबोधित केले. सहाय्यक संचालक अपूर्वा मंदा यांच्यासमवेत त्यांनी केंद्र सरकारच्या नवीनतम खेलो भारत धोरण 2025 सारख्या उपक्रमांचे सादरीकरण केले, ज्याचा उद्देश तळागाळातील खेळाडूंना शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण तसेच आर्थिक मदत देऊन त्यांचे संगोपन करणे हा आहे.

या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात आदिवासी प्रशिक्षण घेतलेल्या आणि यासारख्या इतर क्रीडा लाभार्थ्यांनी तळागाळातील खेळाडू क्रीडाक्षेत्रात कशा पद्धतीने करिअर करू शकतात, याबद्दलचे आपले अनुभव कथन केले.

तिसऱ्या परिसंवादाला मसाले मंडळ, भारत च्या सहसंचालक डॉ. ममता धनकुटे यांनी संबोधित केले. नंदुरबारच्या मिरची उत्पादनाची क्षमता जोखताना: मसाले मंडळाचे उपक्रम हा परिसंवादाचा विषय होता. परिसंवादाला उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मिरची उत्पादन अर्थव्यवस्थेतील नंदूरबारची क्षमता जाणून घेण्यात रस दाखविला. मिरचीची मूल्यवर्धित उत्पादने जसे की चिली फ्लेक्स आणि मिरची पावडर यामध्ये स्थानिक मिरची उद्योगांसाठी असलेल्या संधी त्यांनी अधोरेखित केल्या. 

नंदूरबारचे प्रमुख व्यवसाय निरीक्षक संदीप कुमार गुप्ता आणि प्रमुख वस्तू कारकून प्रमोद ठाकूर यांनी पश्चिम रेल्वेच्या एक गाव, एक उत्पादन उपक्रमाची माहिती दिली. 

पीआयबीच्या सहायक संचालक निकीता जोशी आणि माध्यम व जनसंपर्क अधिकारी सोनल तुपे यांनी पत्र सूचना कार्यालयाचे कार्य व सेवा यांची ओळख सादरीकरणाच्या माध्यमातून सांगितली. या सत्रात पत्रकारांच्या वार्तांकनामधली पीआयबीची सहायकाची भूमिका विशद करण्यात आली. 

या चर्चासत्राच्या अनुषंगाने नंदूरबारमधील छत्रपची शिवाजी नाट्य मंदिरात आरोग्य व पोषण या विषयावर तीन दिवसांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय जनसंपर्क विभागाने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि माय भारत ऑफिस, नंदूरबार यांच्या सहकार्याने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते झाले. 

हे प्रदर्शन 24 ते 26 जुलै 2025 (गुरुवार ते शनिवार) या कालावधीत सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत नागरिकांना विनाशुल्क पाहता येईल. आरोग्य आणि पोषणाबाबत जनजागृती करणे व माहिती देणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. प्रदर्शनस्थळी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रश्नमंजुषेचे कार्यक्रमदेखील होणार आहेत.


सोनल तुपे/तुषार पवार/नंदिनी मथुरे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2148061)
Read this release in: English