संरक्षण मंत्रालय
गोवा शिपयार्डने तटरक्षक दलासाठी तयार केलेल्या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावतरण
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2025 6:56PM by PIB Mumbai
गोवा, 23 जुलै 2025
गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रमाने भारतीय तटरक्षक दल (ICG) साठी डिझाइन केलेल्या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे (PCV), यार्ड 1268 चे बुधवारी, 23 जुलै, 2025 रोजी, वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये जलावतरण केले.

समुद्र प्रचेत नावाचे हे दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांच्या मालिकेतील दुसरे जहाज आहे. समुद्र प्रताप (यार्ड 1267) या पहिल्या जहाजाचे 29 ऑगस्ट, 2024 रोजी अनावरण करण्यात आले होते. हीच परंपरा पुढे सुरू ठेवत, शिपयार्डमध्ये झालेल्या कार्यक्रमात समुद्र प्रचेतचे प्रिया परमेश यांच्या हस्ते समारंभपूर्वक जलावतरण करण्यात आले.
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवामणी, AVSM, PTM, TM कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात, शिवामणी यांनी किनारपट्टीवरील पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण प्रतिसाद कार्यवाहीसाठी भारताची क्षमता बळकट करण्याच्या दृष्टीने असलेले या प्रगत जहाजाचे धोरणात्मक महत्त्व स्पष्ट केले.

या प्रसंगी बोलताना जीएसएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांनी भारताची सागरी पर्यावरण सज्जता आणखी पुढच्या टप्प्यात नेण्यात हे जहाज अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. जहाजामध्ये 72% स्वदेशी सामग्रीचा वापर करून भारत सरकारचे आत्मनिर्भर भारताचे आणि सागरी क्षेत्रामध्ये शाश्वत विकासाचे ध्येय साकार करण्याच्या अनुषंगाने GSL च्या चमूने समर्पित प्रयत्न करून दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.
संपूर्णपणे GSLमध्येच डिझाइन आणि बांधणी केलेले हे जहाज भारतीय तटरक्षक दलाच्या परिचालनाच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करू शकेल अशा पद्धतीनेच तयार केले गेले आहे.
BC4L.jpeg)
114.5 मीटर लांबी, 16.5 मीटर रुंदी आणि 4,170 टन विस्थापन क्षमता हे असलेले जहाज 14 अधिकारी आणि 115 खलाशी यांच्या सहाय्याने चालवले जाईल. त्याच्या दोन बाजूंना स्वीपिंग आर्म्स बसवण्यात आले असल्याने ते मार्गक्रमण करत असताना गळतीमुळे पाण्यावर पसरलेले तेल गोळा करू शकते, तसेच त्यावरील आधुनिक रडार प्रणालीने ते तेलगळती कुठून होत आहे हे देखील शोधू शकते. हे जहाज पाण्यावर पसरलेला तेलाचा तवंग पूर्णपणे हटवू शकेल, दूषित झालेले पाणी पंप करून त्यातील प्रदूषकांचे पृथक्करण करून ते विलग करू शकेल तसेच पाण्यावरून गोळा केलेले तेल जहाजावर त्यासाठी असलेल्या खास टाक्यांमध्ये साठवू शकेल अशा पद्धतीने डिझाइन केले आहे.
72% स्वदेशी घटकांसह, प्रकल्पाने GSL आणि त्याच्या विस्तारित पुरवठा साखळीमध्ये उत्पादन क्रियाकलापांशी संबंधित स्थानिक उद्योग आणि MSME च्या सक्रिय सहभागाद्वारे राष्ट्रीय क्षमता उभारणी, रोजगार निर्मिती आणि कौशल्य वृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
* * *
पीआयबी पणजी | शैलेश पाटील/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2147491)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English