भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सचिवांनी वातावरणीय रसायनशास्त्र प्रयोगशाळा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अर्ली करिअर रिसर्चर्स हब संकेतस्थळाचे आयआयटीएम पुणे येथे केले उद्घाटन


ईसीआर हब हे तरुण शास्त्रज्ञांसाठी आणि कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या संशोधकांसाठी त्यांच्या वैज्ञानिक प्रवासात संपर्क, विकास आणि शोध यासाठी स्रोत आहे: डॉ. रविचंद्रन

वायफेक्स-II उत्तर भारतातील अधिक विमानतळांवर स्थानिकीकृत, धावपट्टी-विशिष्ट धुक्याचे अंदाज वर्तवेल : सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालय

Posted On: 22 JUL 2025 9:33PM by PIB Mumbai

मुंबई, 22 जुलै 2025

 

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी आज पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान विज्ञान संस्थेत (आयआयटीएम) अत्याधुनिक वातावरणीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेचे औपचारिक उद्घाटन केले. डॉ. रविचंद्रन यांनी या प्रसंगी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अर्ली करिअर रिसर्चर्स हबच्या (ईसीआर हब) संकेतस्थळाचंदेखील प्रारंभ केला. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे ईसीआर हब हे पुढल्या पिढ्यांच्या वैज्ञानिकांसाठी पृथ्वीवरील  सर्वात कठीण आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ आहे. डॉ. रविचंद्रन यांनी आयआयटीएम परिसरातील सफर (सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) आणि वायफेक्स (हिवाळी धुके प्रयोग) नियंत्रण कक्षालाही भेट दिली.  डॉ. रविचंद्रन यांनी त्यांच्या भेटीदरम्यान आयआयटीएम इथल्या  शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी संवाद साधला. या  भेटीदरम्यान त्यांना महानगरीय हवाई गुणवत्ता आणि हवामान अंदाज सेवेविषयी माहिती देण्यात आली 

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ईसीआर हबचे (https://ecrhub.github.io/) उद्घाटन करताना डॉ. रविचंद्रन म्हणाले की हे केंद्र तरुण शास्त्रज्ञांसाठी आणि कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या  संशोधकांसाठी त्यांच्या वैज्ञानिक प्रवासात संपर्क, विकास आणि शोध यासाठी  स्रोत आहे. त्यांची उत्सुकता, आवड आणि नवोन्मेष  हे एक लवचिक आणि शाश्वत भविष्य घडवण्याच्या गुरुकिल्ली आहेत. आपल्या राष्ट्राचे आणि ग्रहाचे भविष्य एका मजबूत, प्रेरित आणि उत्तम पाठबळ असलेल्या वैज्ञानिक समुदायाच्या हातात आहे, हा सरकारचा ठाम विश्वास या उपक्रमातून प्रतिबिंबित होतो, असे ते म्हणाले. 

वायफेक्सच्या मजबूत पायाबद्दल प्रसारमाध्यम प्रतिनिधींना  माहिती देताना डॉ. रविचंद्रन म्हणाले, “भारतातील सर्वात व्यस्त आणि धुक्यामुळे सर्वाधिक प्रभावित विमानतळ असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरू झालेले हे प्रारूप एक उत्तम निरीक्षण जाळे म्हणून विकसित झाले आहे. ते आता जेवर विमानतळ, नोएडा आणि हिसार, हरियाणा पर्यंत विस्तारत  असून  उत्तर भारतातील प्रमुख विमान वाहतूक मार्ग व्यापणार आहे.”   हे प्रारूप धुके कधी पडेल, ते किती दाट असेल, ते किती काळ राहील  आणि ते कधी दूर होईल याचा विश्वसनीय अंदाज लावू शकते.  खूप दाट धुक्यासाठी (200 मीटरपेक्षा कमी दृश्यमानता) 85% पेक्षा जास्त अचूकता हे वर्तवते, अशी माहिती डॉ. रविचंद्रन यांनी दिली.   विमान कंपन्या, वैमानिक, हवाई वाहतूक नियंत्रक आणि प्रवाशांसाठी,  कमी खर्चिक  मार्ग बदल, कमी विलंब, सुरक्षित धावपट्टी आणि आव्हानात्मक हिवाळी  धुक्याच्या हंगामात अधिक माहितीपूर्ण प्रवास शक्य करते, अशी माहिती त्यांनी दिली. 

वर्ष 2015 च्या हिवाळ्यामध्‍ये नवी दिल्लीमधील  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर  विमान उड्डाणामध्‍ये अडथळा निर्माण करणारे धुके विरळ करून दृष्‍यमानता वाढविण्‍यासाठी केलेला आणि यशस्वी ठरलेला वायफेक्स (WiFEX) प्रयोगाने आता दशकपूर्ती करून एक महत्वाचा टप्पा गाठला  आहे. उत्तर भारतामध्‍ये  दाट हिवाळी धुके  आणि दैनंदिन जीवनावर आणि दृष्‍यमानता कमी असताना  विमान वाहतुकीची  सुरक्षिततेवर त्याचा   होणारा परिणाम यावरील दहा वर्षांच्या समर्पित संशोधनाचा एक उल्लेखनीय टप्पा पूर्ण केला आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES) अंतर्गत भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) च्या नेतृत्वाखाली, भारतीय हवामानशास्त्र  विभाग (IMD) आणि राष्ट्रीय मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्र (NCMRWF) यांच्या सहकार्याने, वायफेक्स  हा जगातील काही दीर्घकालीन  आणि  मोकळ्या  मैदानी प्रदेशात केलेल्या  प्रयोगांपैकी एक आहे. हा प्रयोग  केवळ धुक्यावर केंद्रित आहे. थंडीच्या दिवसात गंगेच्या वहन क्षेत्रातील मैदानी प्रदेशामध्‍ये दाट धुक्यामुळे  सातत्याने  हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीत व्यत्यय येत असतो. मात्र  वायफेक्स तंत्रज्ञानाने आता   पुढील टप्प्यात पाऊल टाकले आहे – वायफेक्स- 2 टप्प्यामुळे  उत्तर  भारतातील आणखी  विमानतळांवर उड्डाणापूर्वी धावपट्टीवरील विशिष्ट धुक्याच्या नेमका  अंदाज घेवून तो  अधिक  विस्ताराने  व्यक्त  करू शकणार आहे.

WiFEX बद्दल अधिक माहितीसाठी, येथे क्लिक करावे.

आयआयटीएमचे संचालक डॉ. सूर्यचंद्र ए. राव, डॉ. शैलेश नायक, संचालक, एनआयएएस बेंगलुरू आणि डॉ. सचिन घुडे, प्रकल्प संचालक, वायफेक्स आदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सोनाली/सुवर्णा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2147082) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English