अणुऊर्जा विभाग
दुबई मध्ये झालेल्या 57 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केली चार पदकांची कमाई
Posted On:
14 JUL 2025 9:54PM by PIB Mumbai
मुंबई, 14 जुलै 2025
संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे 5 जुलै ते 14 जुलै 2025 या कालावधीत झालेल्या 57 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड (IChO) भारतीय विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी झालेल्या चारही विद्यार्थ्यांनी पदके पटकावली असून त्यात दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा देशाला अभिमान असून यामुळे देशाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील नावलौकिक वाढला आहे. महाराष्ट्रातील जळगाव येथील देवेश पंकज भैया आणि हैदराबाद मधील तेलंगणा येथील संदीप कुची या दोघांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. तर ओडिशा मधील भुवनेश्वर येथील देबदत्त प्रियदर्शी आणि नवी दिल्ली येथील उज्ज्वल केसरी यांना रौप्य पदक मिळाले आहे.
भारतीय संघाला शिक्षणतज्ञांच्या समर्पित पथकाचे मार्गदर्शन लाभले. मुंबई येथील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे, प्रा. अंकुश गुप्ता यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून काम पाहिले, तर दिल्लीच्या आचार्य नरेंद्र देव महाविद्यालयाच्या प्रा. सीमा गुप्ता या मार्गदर्शक होत्या. पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या डॉ. नीरजा दशपुत्रे आणि पश्चिम बंगालच्या सिंगूर येथील शासकीय सामान्य पदवी महाविद्यालयातील डॉ. अमृत मित्रा हे वैज्ञानिक निरीक्षक होते. या आव्हानात्मक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
यावर्षी, आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 5 निरीक्षक देशांसह 90 देशांतील 354 विद्यार्थी सहभागी झाले होते. युक्रेन, उझबेकिस्तान, कझाकस्तान आणि इस्रायलसह एकूण पदकतालिकेत भारत सहाव्या स्थानावर राहिला. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या सहभागाचे हे 26 वे वर्ष होते. या काळात, भारतीय विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले असून 30% सुवर्ण , 53% रौप्य आणि 17% कांस्य पदके आपल्या खात्यात जमा केली आहेत. केवळ गेल्या दहा स्पर्धांमध्ये, सुवर्ण आणि रौप्य पदकांची टक्केवारी अनुक्रमे 38% आणि 58% इतकी आहे.
टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) अंतर्गत, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र हे, विविध ठिकाणी होणाऱ्या गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यार्थ्यांना निवडण्याचे तसेच प्रशिक्षणाचे नोडल केंद्र म्हणून काम करत आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे घेतली जाणारी राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षा अंतिम संघ निवडीसाठीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाते.
आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड 2025 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी मिळवलेले उल्लेखनीय यश हे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाड विभागाच्या समर्पित प्रयत्नांचे फलित असून बाह्य शिक्षक आणि मार्गदर्शकांचा यात मोठा वाटा आहे.
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात आयोजित सखोल अभिमुखता आणि प्रस्थान पूर्व शिबिरादरम्यान संघाचा सराव, यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील स्पर्धेला तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांची कसून तयारी झाली. राष्ट्रीय विज्ञान ऑलिंपियाड समिती, शिक्षक संघटना आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अंतराळ विभाग आणि शिक्षण मंत्रालय यांचा अढळ पाठिंबा विद्यार्थ्यांना लाभला. यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शकांसोबत उद्या सकाळी 11 वाजता HBCSE- टीआयएफआर, मानखुर्द, मुंबई येथे संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया HBCSE कार्यालयातील सुमना अमीन यांच्याशी 022-2507 2207/2208 किंवा मोबाईल: 9833947206 वर संपर्क साधा. अधिक माहिती https://www.ichosc.org आणि https://olympiads.hbcse.tifr.res.in या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

डावीकडून: डॉ. नीरजा दशपुत्रे (वैज्ञानिक निरीक्षक), डॉ. अमृत मित्रा (वैज्ञानिक निरीक्षक), विद्यार्थी- उज्ज्वल केसरी, संदीप कुची, देवेश पंकज भैय्या, देबदत्त प्रियदर्शी, प्रा. सीमा गुप्ता (मार्गदर्शक), प्रा. अंकुश गुप्ता.
* * *
PIB Mumbai | S.Kakade/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2144716)