परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे बिमस्टेक देशांसाठी मुंबईत टाटा मेमोरियल केंद्रात कर्करोग उपचारासंदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2025 5:24PM by PIB Mumbai
मुंबई, 7 जुलै 2025
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (एमईए) आज 07 जुलै 2025 रोजी मुंबईत टाटा मेमोरियल केंद्र येथे बिमस्टेक (बहुक्षेत्रीय तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्यावर आधारित बंगालच्या उपसागराशी संबंधित उपक्रम) देशांसाठी टाटा मेमोरियल केंद्रात कर्करोग उपचारासंदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा केली होती.

केंद्रीय अणुउर्जा विभागाचे (डीएई) सचिव आणि अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ.ए के मोहंती यांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (बिमस्टेक आणि सार्क) संयुक्त सचिव, सीएसआर राम, टाटा मेमोरियल केंद्राचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, विशाखापट्टणम येथील होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे संचालक डॉ. उमेश मोहंतशेट्टी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (बिमस्टेक आणि सार्क) संयुक्त सचिव, सीएसआर राम यांनी माहिती देताना सांगितले की या प्रशिक्षण उपक्रमाने बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि नेपाळ या बिमस्टेक देशांतील सहभागींना एकत्र आणले आहे. “या भागातील कर्करोगाचा वाढता उद्भव तसेच दर्जेदार कर्करोग उपचार सेवा मिळवण्यातील अडचणी यामुळे या क्षेत्रात क्षमता निर्मिती तसेच कौशल्य वाढवण्याच्या सामुहिक प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे. आज सुरु झालेला हा उपक्रम कर्करोगावरील उपचारांमध्ये सुधारणा घडवून आणण्यात मदत करण्यासह बिमस्टेक देशांमध्ये या विषयासंदर्भात अधिक सहयोग आणि संशोधन करण्यासाठी आवश्यक नेटवर्क प्रस्थापित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो,” त्यांनी नमूद केले.
टाटा मेमोरियल केंद्राचे संचालक डॉ.सुदीप गुप्ता यांनी बिमस्टेक देशांतून आलेल्या सहभागींचे स्वागत केले. ते म्हणाले की, केंद्रीय अणुउर्जा विभागाच्या अखत्यारीतील अनुदानित संस्था असलेले टाटा मेमोरियल केंद्र ही आशियातील महत्त्वाची कर्करोग उपचार संस्था असून वैद्यकीय सेवा, शिक्षण, संशोधन आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी या संस्थेची निवड वैशिष्ट्यपूर्णरित्या योग्य आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे बिमस्टेकच्या आरोग्यविषयक उपक्रमांचा भाग म्हणून कर्करोग सेवेच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर केंद्रित असलेला हा चार आठवड्यांचा प्रत्यक्ष कार्यस्थळावर चालणारा उपक्रम आहे अशी माहिती त्यांनी दिली. रेडिएशन आँकॉलॉंजी, न्युक्लिअर मेडिसिन आणि रेडीऑलॉंजी या विषयांतील तीन विशेष मोड्यूल्स एकाच वेळी राबवण्यात येत असून त्यायोगे सहभागींना आधुनिक निदान तसेच उपचार तंत्रांबाबत प्रगत प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

विशाखापट्टणम येथील होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे संचालक डॉ.उमेश मोहंतशेट्टी यांनी सांगितले की या प्रशिक्षण अभ्यासक्रमात आंतरसंवादी व्याख्याने, वैद्यकीय निरीक्षक आणि शिक्षकांच्या नेतृत्वाखालील मार्गदर्शन यांना एकत्रित करण्यात आले असून त्यातून अखंडित कर्करोग सेवा क्षेत्रातील तांत्रिक कौशल्ये आणि वैद्यकीय समज अशा दोन्हींना बळकट करणारा व्यापक तसेच गुंतवून टाकणारा अनुभव मिळणे सुनिश्चित होते. ते पुढे म्हणाले की हा कार्यक्रम भविष्यातील सहयोगामधील तफावत ओळखण्यास मदत करेल आणि सहभागींसाठी यानंतरचे प्रशिक्षण कार्यक्रम टाटा मेमोरियल केंद्राच्या देशभरात विविध ठिकाणी पसरलेल्या नऊ कार्यरत एककांमध्ये घेण्यात येतील.
हा कार्यक्रम, बिमस्टेक प्रदेशात आँकॉलॉंजी विषयाची क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने येत्या काळात असे अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दिशेने सुरु असलेल्या विस्तृत प्रयत्नांची सुरुवात ठरला.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2142919)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English