माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी दिली पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय नॅशनल फिल्म आर्काइव्हज ऑफ इंडिया (एन एफ ए आय–एन एफ डी सी) ला भेट
"एफ टी आय आय आणि एन एफ ए आय या दोन अशा संस्था आहेत ज्या देशातील चित्रपट आणि मनोरंजन परिसंस्थेला आकार देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एफटीआयआय प्रतिभेला आकार देते, तर एन एफ ए आय त्यांचे काम सर्वोत्तम परिस्थितीत जतन केले जाईल याची खात्री करते" : माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिव संजय जाजू
राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत विकसित केलेल्या चित्रपट पुनर्संचयित सुविधांचा संजय जाजू यांनी घेतला आढावा
Posted On:
02 JUL 2025 10:34PM by PIB Mumbai
मुंबई/पुणे, 2 जुलै 2025
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) भेट दिली. 'विशिष्ट श्रेणी' अंतर्गत पुण्यातील एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर ही त्यांची पहिली भेट होती.

एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.

संजय जाजू यांनी एफटीआयआय परिसराचा मार्गदर्शित दौरा केला व त्यादरम्यान त्यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विविध विषयांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील गतिमान बदल तसेच एफटीआयआयसारख्या संस्थांचे भविष्य घडवण्यातील महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दलचे आपले विचार मोकळेपणाने आणि अंतर्दृष्टीने मांडले.

भारताच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी चित्रपट व माध्यम शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात नवोन्मेष आणि शिस्त या दोन्हींचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांना संस्थात्मक प्रगती आणि धोरणात्मक संवादाच्या केंद्रस्थानी ठेवणाऱ्या एफटीआयआयच्या सक्रिय शैक्षणिक वातावरणाचे प्रतिबिंब या संवादात दिसून आले.

या भेटीतून संस्थेला नव्याने प्रदान करण्यात आलेल्या विद्यापीठ दर्जाच्या पार्श्वभूमीवर, व्यापक शैक्षणिक विस्तार, संस्थात्मक स्वायत्तता तसेच सर्जनशील उद्योगांमध्ये राष्ट्रीय योगदानाच्या दिशेने विकसित होत असलेले ध्येय अधोरेखित झाले.


एफटीआयआयला भेट दिल्यानंतर जाजू यांनी एनएफएआयच्या डिजिटायझेशन, पुनर्संचयन आणि संग्रहण सुविधेलाही सविस्तरपणे भेट दिली. त्यांना संपूर्ण प्रक्रियेच्या प्रक्रियात्मक, तांत्रिक आणि इतर पैलूंबद्दल माहिती देण्यात आली. आपल्या संवादादरम्यान ते म्हणाले:
"एफटीआयआय आणि एनएफएआय या दोन अशा संस्था आहेत ज्या देशातील चित्रपट आणि मनोरंजन परिसंस्थेला आकार देण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एफटीआयआय प्रतिभेला आकार देत असते तर एनएफएआय त्यांचे काम सर्वोत्तम परिस्थितीत जतन केले जाईल याची खात्री करते. या संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू आहेत कारण मंत्रालय त्यांना सर्व शक्य मार्गांनी पाठिंबा देण्यासाठी तसेच त्यांची जोपासना करण्यासाठी वचनबद्ध आहे.”

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी),राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) पुणे येथे, संजय जाजू यांनी राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहीम (एनएफएचएम) अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. ही मोहीम जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट जतन करणाऱ्या प्रकल्पांपैकी एक आहे.
त्यांनी पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा अशा दोन्ही विभागांची पाहणी केली. दुसऱ्या टप्प्यामध्ये एनएफएचएम अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक जतन व पुनर्संचय सुविधा आहेत.
सचिवांनी जुन्या चित्रपट रील्सची दुरुस्ती व रासायनिक प्रक्रिया, हाय-रिझोल्युशन स्कॅनिंग आणि भारतीय क्लासिक चित्रपटांच्या पुनर्संचयाचे काम प्रत्यक्ष पाहिले. यामध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि संग्रहण कौशल्य यांचे संयोजन दिसून आले. त्यांनी भविष्यातील पिढ्यांसाठी भारताच्या चित्रपट वारशाचे जतन करण्याच्या कामाबद्दल संग्रहालयाच्या भूमिकेचे कौतुक केले.
तसेच त्यांनी सार्वजनिक प्रदर्शनासाठी वापरल्या जाणाऱ्या थिएटर आणि प्रोजेक्शन रूम, तसेच अभिलेखागार वाचनालयाची सुद्धा पाहणी केली. जिथे त्यांनी चित्रपटपूर्व काळातील दुर्मिळ पोस्टर्स, मासिके आणि काचेच्या प्लेट्सवर छायाचित्र किंवा दृश्यमान माहिती असलेली स्लाईड्स पाहिल्या. त्याचबरोबर त्यांनी स्क्रिप्ट्स, लॉबी कार्ड्स, छायाचित्रे आणि मासिके यासारख्या साहित्याचे सुरू असलेले डिजिटायझेशनची देखील पाहणी केली, जे भारताच्या चित्रपट इतिहासाचे सर्वांगीण व सुलभ दस्तऐवजीकरण सुनिश्चित करत आहे.
शेवटी, संजय जाजू यांनी खात्री दिली की, मंत्रालय भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था आणि एनएफडीसी,एनएफएआय या दोन्ही संस्थांतील उन्नती आणि आधुनिकीकरण प्रकल्पांचे वेळेच्या चौकटीत निरीक्षण करत राहील. या उच्चस्तरीय भेटीद्वारे सरकारच्या गुणवत्तापूर्ण चित्रपट शिक्षण व भारतीय चित्रपट वारशाच्या जतनासाठी असलेल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार झाला.
S.Patil/N.Mathure/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141525)