नौवहन मंत्रालय
कोलंबो डॉकयार्ड पीएलसीच्या धोरणात्मक अधिग्रहणासह माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या जागतिक प्रवासाला प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
27 JUN 2025 8:39PM by PIB Mumbai
मुंबई, 27 जून 2025
भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील जहाजबांधणी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) श्रीलंकेतील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रस्थापित शिपयार्ड कोलंबो डॉकयार्ड पीएलसी (सीडीपीएलसी) मधील नियंत्रणात्मक भागभांडवलाच्या प्रस्तावित अधिग्रहणाला मंजुरी देऊन आपल्या धोरणात्मक उत्क्रांतीतील एका महत्त्वपूर्ण पावलाची घोषणा केली आहे. 52.96 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची ही गुंतवणूक प्राथमिक गुंतवणूक आणि सेकंडरी शेअर पर्चेसच्या संयोजनाद्वारे केली जाईल, ज्यामध्ये सध्याचा प्रमुख भागधारक ओनोमिची डॉकयार्ड कंपनी लिमिटेडच्या समभागांचे अधिग्रहण समाविष्ट आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पारंपरिक नियामक मान्यता आणि समाप्तीच्या अटींच्या अधीन राहून, सीडीपीएलसी एमडीएलची उपकंपनी बनेल.

"हे केवळ एक अधिग्रहण नाही तर एक प्रवेशद्वार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे आमचे पहिले पाऊल आहे आणि जागतिक जहाजबांधणी उद्योग म्हणून ओळख निर्माण करण्याची आमची महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करते. सीडीपीएलसीचे धोरणात्मक स्थान, सिद्ध क्षमता आणि मजबूत प्रादेशिक उपस्थिती यामुळे, हा निर्णय एमडीएलला दक्षिण आशियामध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून स्थान निर्माण करेल आणि जागतिक शिपयार्ड म्हणून आमच्या उदयाचा पाया रचेल," असे एमडीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन म्हणाले.
हे प्रस्तावित अधिग्रहण एमडीएलचा पहिला आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे आणि कंपनीच्या देशांतर्गत जहाजबांधणी कंपनी ते जागतिक आकांक्षा असलेल्या प्रादेशिक सागरी कंपनी या संक्रमणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कोलंबो बंदरात धोरणात्मकदृष्ट्या स्थित, सीडीपीएलसी एमडीएलला हिंद महासागर प्रदेशात परिचालनाचा एक मजबूत पाया प्रदान करते जो जगातील सर्वात व्यस्त आणि भू-राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण सागरी कॉरिडॉरपैकी एक आहे.

कोलंबो डॉकयार्ड पीएलसी एमडीएलला जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रात पाच दशकांहून अधिक अनुभव देत आहे. जपान, नॉर्वे, फ्रान्स, यूएई, भारत आणि अनेक आफ्रिकन राष्ट्रांमधील खरेदीदारांसाठी जटिल ऑफशोअर सपोर्ट व्हेसल्स, केबल लेईन्ग जहाजे, टँकर आणि गस्ती नौका वितरित करण्याचा कंपनीला अनुभव आहे. हे श्रीलंकेतील एकमेव शिपयार्ड आहे जे इन-हाऊस डिझाइन आणि बांधकामापासून ते प्रगत दुरुस्ती आणि सागरी स्टील फॅब्रिकेशनपर्यंत एकात्मिक सेवा प्रदान करते. सीडीपीएलसी चार ड्रायडॉक आणि मल्टिपल बर्थ चालवते जे 125,000 DWT पर्यंतच्या जहाजांना हाताळण्यास सक्षम आहेत आणि डीएनव्ही , लॉयड्स रजिस्टर, एबीएस आणि आयआरएस सारख्या आयएसओ आणि वर्गीकरण मानकांचे पालन करते.
तांत्रिक सामर्थ्याव्यतिरिक्त, सीडीपीएलसी सक्रीयपणे 300 दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त ऑर्डरची पाइपलाइन तयार करत आहे, ज्यामध्ये केबल लेईन्ग जहाजे, बहुउद्देशीय उपयुक्तता जहाजे आणि नवीन बांधलेल्या फ्लीट सपोर्ट व्हेसल्सचा समावेश आहे. एमडीएलच्या पाठिंब्यामुळे - विशेषतः तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीमुळे, भारतीय पुरवठा साखळींची उपलब्धता आणि भारतीय आणि संबंधित सागरी बाजारपेठांमध्ये प्रवेश यामुळे सीडीपीएलसी आर्थिक उलाढाल आणि दीर्घकालीन वाढीसाठी सुस्थितीत आहे.

हे अधिग्रहण भारताच्या सागरी अमृतकाल व्हिजन 2047 ला अनुरूप असून यामध्ये भारताला मजबूत प्रादेशिक एकात्मता आणि औद्योगिक क्षमतांसह एक आघाडीची सागरी शक्ती म्हणून उदयास आणण्याची कल्पना आहे. हे एमडीएलच्या सागरी स्वयंपूर्णतेला चालना देण्यासाठी, प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय कौशल्यावर आधारित स्पर्धात्मक, बहु-स्थानिक जहाजबांधणी उपक्रम तयार करण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचे देखील समर्थन करते.
या अधिग्रहणासह, एमडीएल केवळ या प्रदेशात आपले अस्तित्व मजबूत करणार नाही तर जागतिक जहाजबांधणी आणि सागरी अभियांत्रिकी क्षेत्रात आपली स्पर्धात्मकता वाढवेल.
पार्श्वभूमी
मुंबई येथे मुख्यालय असलेले माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड हे भारतातील युद्धनौका आणि पाणबुड्या तयार करणारी आघाडीची कंपनी आहे आणि देशाच्या नौदलाच्या आधुनिकीकरणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोलंबो स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेले कोलंबो डॉकयार्ड पीएलसी हे श्रीलंकेच्या सागरी उद्योगाचा प्रमुख उपक्रम आहे आणि आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील व्यावसायिक आणि सरकारी ग्राहकांच्या विस्तृत श्रेणीला सेवा पुरवते.
* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2140288)
आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English