माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सीबीसी, दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिस यांनी एकत्र येत निसर्गरम्य सलौलीम धरणावर योग संगम केला आयोजित
Posted On:
21 JUN 2025 8:56PM by PIB Mumbai
गोवा, 21 जून 2025
आकाशात काळे मेघ दाटलेले असताना, सांगेममधील सलौलीम धरणाच्या स्थिर पाण्यात योगाच्या शांत मंत्रांचे प्रतिध्वनी उमटले आणि आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी एका मंत्रमुग्ध वातावरणाची निर्मिती झाली.
केंद्रीय संचार ब्युरो (सीबीसी), गोवा यांनी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने, शनिवार, 21 जून रोजी देशव्यापी योग दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून योग संगम कार्यक्रमाचे आयोजन केले. निसर्गरम्य सलौलीम धरणाच्या माथ्यावर आयोजित हा कार्यक्रम ड्रोन फुटेजद्वारे सुंदरपणे टिपण्यात आला होता, ज्यामध्ये या ठिकाणचे चित्तथरारक दृश्य दिसत होते.

या कार्यक्रमात योगप्रेमी, जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकारी, सीबीसी प्रतिनिधी आणि आसपासच्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या प्रमाणित प्रशिक्षकांनी कॉमन योगा प्रोटोकॉलचे सामूहिक प्रात्यक्षिक सादर केले. सुमारे 300 लोकांची उपस्थिती असलेला हा कार्यक्रम देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमांतर्गत आयोजित महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी एक होता.
सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आणि सीबीसीने दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिसांच्या अधिकाऱ्यांना कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केल्याबद्दल सन्मानित केले.

आंतरराष्ट्रीय दिन 2025 हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य वृद्धिंगत करण्यासाठी योगसाधनेला जागतिक चळवळ म्हणून प्रोत्साहन देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. एक दशक यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, 2025 मध्ये 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन खऱ्या अर्थाने जागतिक आणि समावेशक पद्धतीने साजरी करण्यात आला. योग संगम या मुख्य कार्यक्रमात देशभरातील 1 लाखाहून अधिक ठिकाणी कॉमन योग प्रोटोकॉलवर आधारित समक्रमित सामूहिक योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

* * *
PIB Panaji | M.Pange/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138618)