रेल्वे मंत्रालय
पश्चिम रेल्वेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साजरा
Posted On:
21 JUN 2025 8:27PM by PIB Mumbai
मुंबई, 21 जून 2025
पश्चिम रेल्वेतर्फे आज 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुंबईतील बधवार पार्क इथल्या उत्सव सभागृहात पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली, एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग, या यंदाच्या संकल्पनेअंतर्गत विशेष योगाभ्यास सत्राचे आयोजन केले गेले.

या कार्यक्रमात महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांच्यासह पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांचे प्रमुख, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पश्चिम रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा क्षमा मिश्रा, कार्यकारिणी समितीचे सदस्य तसेच पश्चिम रेल्वेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सर्वांनी कॉमन योग प्रोटोकॉल अंतर्गत विविध योगासनांचा सराव केला. डॉ. जॅन्सी शेखर आणि त्यांच्या चमूने या सत्रात प्रमुख मार्गदर्शन केले. याबरोबरीनेच रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वे गाडीलगत योगासने करून आजच्या समारंभात सक्रिय सहभाग नोंदवला. विरार कारशेडमध्येही वातानुकुलीत उपनगरीय रेल्वे गाडीच्या पार्श्वभूमीवर एका अभिनव योग सत्राचे आयोजन करण्यात आले. यातून रेल्वेच्या कार्यान्वयनात आरोग्याचा साधला गेलेला मेळही अधोरेखित झाला.
या वेळी, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी उपस्थितांना संबोधित केले. एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग या या वर्षाची संकल्पनेतून मानवी कल्याण आणि आपल्या पृथ्वीच्या आरोग्याच्या परस्पर संबंध ठळकपणे अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले. यातून संतुलित जीवनशैली, शाश्वत जीवन आणि जागतिक सलोखा वाढवण्यातली योगाभ्यासाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित होत असल्याचे ते म्हणाले.

पश्चिम रेल्वेच्या सर्व सहा विभागांमध्येही आज योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये पश्चिम रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंब सदस्यांसह मोठ्या संख्येने भाग घेतला. यानिमित्ताने योगाभ्यासाचे व्यापक लाभ आणि त्याची निरोगी व्यक्ती, निरोगी समाज आणि निरोगी पृथ्वीच्या दृष्टिकोनाला कशी मदत होते हे दर्शवणारे माहितीपूर्ण आणि आकर्षक वेब कार्ड्स पश्चिम रेल्वेच्या समाज माध्यम खात्यांवरून सामायिक केले गेले.
पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व प्रवाशांना, आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगाभ्यासाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे आवाहनही केले आहे.
* * *
PIB Mumbai | M.Pange/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138597)