शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या संकल्पनेवर भर देत आयआयएम मुंबईने 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन केला साजरा

Posted On: 21 JUN 2025 8:05PM by PIB Mumbai

मुंबई, 21 जून 2025

 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (आयआयएम मुंबई) ने आज 21 जून  2025 रोजी मुंबईत 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली देशभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

स्वामी विवेकानंद सभागृहाच्या तळघरात सकाळी 6 वाजता  हा कार्यक्रम सुरू झाला, ज्यामध्ये पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले, त्यानंतर कैवल्यधाम, मुंबई येथील अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र पार पडले. आयआयएम मुंबईचे अध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकता, आरोग्य आणि शाश्वततेची भावना अंगीकारत सक्रिय सहभाग घेतला.

या प्रसंगी बोलताना, आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणाले: "आंतरराष्ट्रीय योग दिन हा जागतिक कल्याणात भारताच्या योगदानाची ठळकपणे  आठवण करून देतो. 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' ही या वर्षीची संकल्पना आयआयएम मुंबईच्या समग्र शिक्षण, पर्यावरण जागरूकता आणि वैयक्तिक निरामय आरोग्यप्रती वचनबद्धतेला अनुरूप आहे. आमच्या समुदायाकडून अशा सक्रिय सहभागाचा आम्हाला अभिमान वाटतो.  योग हा केवळ शारीरिक व्यायाम  नाही तर शाश्वत जीवन आणि आंतरिक सुसंवादासाठी  एकसंध  शक्ती आहे, हे यातून दिसून येते. "

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांमध्ये  डीन (विद्यार्थी कामकाज), प्रा. रौफ इक्बाल, मुख्य प्रशासकीय अधिकारी (सीएओ), लेफ्टनंट कमांडर निशा सिंग आणि आंतरराष्ट्रीय योगदिन समिती 2025 चे अध्यक्ष प्रा. निखिल मेहता या मान्यवरांचा सहभाग होता. संस्थेने  तज्ञ मार्गदर्शनाबद्दल कैवल्यधाम यांचे तसेच हा कार्यक्रम यशस्वी बनवणाऱ्या सर्व सहभागींचे मनापासून आभार मानले.

आयआयएम मुंबई बद्दल

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (आयआयएम मुंबई), ज्याचे पूर्वीचे नाव एनआयटीआयई होते, ही भारतातील प्रमुख व्यवस्थापन संस्थांपैकी एक आहे, जी 1963 मध्ये स्थापन झाली. 2024 च्या एनआयआरएफ क्रमवारीत 6 व्या स्थानावर असलेले आयआयएम मुंबई परिचालन, पुरवठा साखळी, शाश्वतता आणि सामान्य व्यवस्थापनातील उत्कृष्टतेसाठी ओळखली जाते. भारताच्या आर्थिक राजधानीत मोक्याच्या ठिकाणी असलेली ही संस्था असाधारण  उद्योग कनेक्टिव्हिटी प्रदान करते. ही संस्था लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनामधील उत्कृष्टतेचे केंद्र आहे, तसेच पीएम गति शक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा अंतर्गत एक प्रमुख संस्था आहे.

 

* * *

PIB Mumbai | M.Pange/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2138584) Visitor Counter : 2
Read this release in: English