सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगता संस्था (दिव्यांगजन) आणि मुंबईतील पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने संयुक्तपणे विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शाळेत ‘योग: दिव्यांगजनांसाठी एक निरोगी जीवनशैली’ या संकल्पनेअंतर्गत विशेष योग सत्राचे आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 अंतर्गत रोटरी संस्कारधाम ॲकॅडमी फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स या विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शाळेत आयोजित योग सत्रामुळे, कर्णबधीर दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभले शारिरीक आणि मानसिक आरोग्यविषयक कल्याण साधणारे आणि आत्मविश्वास निर्माण करणारे मार्गदर्शन
Posted On:
21 JUN 2025 7:25PM by PIB Mumbai
मुंबई, 21 जून 2025
मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) इतल्या रोटरी संस्कारधाम ॲकॅडमी फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स या विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शाळेत आज ‘योग: दिव्यांगजनांसाठी एक निरोगी जीवनशैली’ या संकल्पनेअंतर्गत विशेष योग सत्राचे आयोजन केले गेले. अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगता संस्थेने (दिव्यांगजन), मुंबईतील पत्र सूचना कार्यालयासोबत संयुक्तपणे या योग सत्राचे आयोजन केले. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या निमित्ताने आयोजित या योग सत्रात योग साधना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 75 पेक्षा जास्त कर्णबधिर मुलांनी योग साधना केली. या सत्रात पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा, अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगता संस्थेचे (दिव्यांगजन) संचालक डॉ. सुमन कुमार, आणि रोटरी संस्कारधाम ॲकॅडमी फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्सच्या संस्थापक प्राचार्या लता नायक हे मान्यवर सहभागी झाले.

सुमारे एका तासाच्या या योग सत्रात सांकेतिक भाषेतून समजावण्याचे (sign language interpretation) विशेष कौशल्य प्राप्त योग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन केले. योगसाधना फाउंडेशनचे सीताराम चव्हाण हे विशेषत्वाने दिव्यांगजनांना योग शिकवण्याची सेवा देतात. आपल्या या व्रतानुसार ते गेल्या 26 वर्षांपासून कर्णबधिर विद्यार्थ्यांना योगासनांचे शिक्षण देत आहेत. योगसाधना फाउंडेशनचे सागर विजय कावणकर, प्रशांत चव्हाण आणि नामदेव चव्हाण यांनी या सत्रादरम्यान योगासनांची प्रात्यक्षिके दाखवली आणि विद्यार्थ्यांना या योगासनांच्या मुद्रांमध्ये येण्यात मदत केली. सर्व योग तज्ञांनी या सहभागी विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार संरचित केलेल्या सूचना आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यामुळे या कर्णबधिर मुलांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यात भर पडली, यासोबतच या विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण आरोग्यासाठीचा एक समावेशक दृष्टिकोन विकसित व्हायलाही मदत झाली. अशा कल्पक नियोजनामुळे या योग सत्रात सहभागी झालेल्या कर्णबधीर दिव्यांग विद्यार्थ्यांना उत्तम समाजासाठी 'एक पृथ्वी आणि एक आरोग्य' या तत्त्वांचे पालन करण्याकरता आवश्यक आत्मविश्वास देणारे मार्गदर्शन लाभले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनीही या सहभागी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. आज योग साधना जगभरात एक चळवळ बनली असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षीही या विशेष दिवशी जगभरातील 25 कोटी लोकांनी योगाभ्यासविषयक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 अंतर्गत राबवल्या जात असलेल्या उपक्रमांबद्दलही माहिती दिली. याअंतर्गत i) हिरवळीच्या वातावरणात योगाभ्यास करण्याचा संदेश देणारा हरित योग, ii) खुल्या उद्यानांमध्ये योगाभ्यास करण्यासाठीची योग पार्क, iii) जगभरातील नागरिक कॉमन योग प्रोटोकॉलचे पालन करून गटांगटांमध्ये एकत्रितपणे योग करण्यासंबंधीचा योग समावेश आणि iv) योगाभ्यासाचे लाभ जगभरातील नागरिकांपर्यंत विस्तारण्यासाठी आपला देशाने दहा देशांसोबत भागीदारी केलेला योग बंधन हा उपक्रम… असे विविध उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्मिता वत्स शर्मा यांनी योग अनप्लग्ड, योग कनेक्ट, योग महाकुंभ या उपक्रमांच्या संकल्पनाचीही ओळख करून दिली. लोकांमध्ये योगाभ्यासाच्या आरोग्य विषयक लाभाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या सर्व उपक्रमांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्मिता वत्स शर्मा यांनी मुलांना पूर्ण क्षमतेने कामगिरी करण्याचे आणि कारकिर्दीसाठी नागरी सेवांच्या पर्यायाकडे (civil services) वळण्याचे आवाहन केले.

अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगता संस्थेनेचे (दिव्यांगजन) संचालक डॉ. सुमन कुमार यांनीही या मुलांना मार्गदर्शन केले. आपल्या जीवनात उत्कृष्ट प्रदर्शन करता यावे यासाठी दररोज योगाभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी डॉ. कुमार यांनी या विशेष दिवसाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. देशातील एक आघाडीची संस्था म्हणून अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगता संस्था (दिव्यांगजन) गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळापासून कार्यरत आहे. ही संस्था म्हणजे केंद्र सरकारची विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक संस्था असून, देशभरातील वाणी आणि श्रवण दिव्यांगता असलेल्या दिव्यांगांचे पुनर्वसन, समावेशक शिक्षण आणि सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती त्यांनी दिली.

पत्रसूचना कार्यालयाचे संचालक सय्यद रबीहाश्मी, पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी हे मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. सय्यद रबीहाश्मी यांनी या कार्यक्रमात आभार प्रदर्शनाची जबाबदारी सांभाळली. या योग सत्रात सहभागी झालेल्यांना अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगता संस्था (दिव्यांगजन) तसेच पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने सहभागाचे प्रमाणपत्र दिले गेले. भारतीय सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीत गायनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
* * *
PIB Mumbai | M.Pange/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138543)