पर्यटन मंत्रालय
योग हा एक आध्यात्मिक आणि तात्विक प्रवास आहे: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
Posted On:
21 JUN 2025 7:05PM by PIB Mumbai
गोवा, 21 जून 2025
आपण जाणतो की योग केवळ शारीरिक व्यायाम नाही तर एक आध्यात्मिक आणि तात्विक प्रवास आहे. अनिश्चिततेच्या आणि झपाटयाने बदलणाऱ्या या काळात, योग आपल्याला स्वतःशी पुन्हा जोडण्याचा, गोंधळात शांतता मिळविण्याचा आणि स्वतःबद्दल आणि इतरांप्रति करुणा जोपासण्याचा मार्ग दाखवतो, असे केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

योग दिनाच्या भव्य उत्सवासाठी निवड झालेल्या भारतातील 189 प्रतिष्ठित पर्यटन स्थळांपैकी एक, ओल्ड गोव्याच्या चर्च आणि कॉन्व्हेंटच्या लॉन्स येथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित विविध क्षेत्रातील योगप्रेमींना ते संबोधित करत होते.
केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय, पर्यटन मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
"या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना - "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग" अशी असून ताणतणाव, अनारोग्य, आधुनिक जीवनाचे वेगवान स्वरूप यांसारख्या आजच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकता, शांती आणि आंतरिक शक्तीची जागतिक आकांक्षा प्रतिबिंबित करते असे नाईक म्हणाले.
मी आयुष मंत्री असताना पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला हे माझे सौभाग्य आहे. या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो, असे नाईक म्हणाले.

समाजातील सर्व घटकांमध्ये योगबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि तो सुगम्य करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व योग शिक्षक, संघटना, स्वयंसेवक आणि अभ्यासकांचे त्यांनी कौतुक केले.
“आज आपण केवळ योगाभ्यास करण्याचाच नव्हे तर योग जगण्याचा संकल्प करूया. या परिवर्तनकारी शिस्तीचा वापर करून एक निरोगी समाज, अधिक शांततापूर्ण जग आणि जागरूकता तसेच निरामयतेमध्ये रुजलेले भविष्य घडवूया,” असे आवाहन नाईक यांनी गोव्यातील लोकांना केले.
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने मांडलेल्या प्रस्तावानंतर, 2015 साली योग दिनाची स्थापना झाल्यापासून, 190 पेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. हजारो वर्षांपूर्वी एक प्राचीन भारतीय पद्धत म्हणून सुरू झालेली योगसाधना आता निरामयतेची वैश्विक भाषा बनली आहे, हे पाहून आनंद होतो.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना सर्वप्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण करताना मांडली होती.
या प्रस्तावाला 177 देशांनी (ही एक विक्रमी संख्या आहे) अनुमोदन दिले होते, ज्यातून या उपक्रमाला जागतिक पाठिंबा दिसून येतो. 21 जून हा दिवस निवडण्यात आला कारण तो उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे, ज्याला अनेक संस्कृती आणि योग परंपरांमध्ये महत्त्व आहे.
* * *
PIB Panaji | M.Pange/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138523)