पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईतील ऐतिहासिक कान्हेरी लेणी येथे पर्यटन मंत्रालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी केले कान्हेरी लेणी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याचे नेतृत्व

Posted On: 21 JUN 2025 4:10PM by PIB Mumbai

मुंबई, 21 जून 2025

 

भारतपर्यटन - मुंबई या केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या मुंबईतील प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने आज 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त मुंबईतील ऐतिहासिक कान्हेरी लेणी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतपर्यटन - मुंबई यांनी आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाचे मुंबई मंडळ आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासोबत संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राचीन बौद्ध शिल्पे, शिलालेख आणि बारकाईने केलेले नाजूक कोरीव काम यासाठी प्रसिद्ध असलेल्या कान्हेरी लेणी परिसरात, शांत वातावरणाच्या प्रेरणादायी पार्श्वभूमीवर योगसाधना करण्याची संधी उपस्थितांना मिळाली. एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग या यंदाच्या संकल्पनेअंतर्गतच या योग साधना कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. त्यांनीही  सामूहिक योग सत्रात भाग घेतला. त्यांच्या सहभागाने जागतिक आरोग्य आणि एकतेला प्रोत्साहन देण्यात योगाचे महत्त्व अधिक दृढ झाले. यावेळी पीयूष गोयल यांनी सर्व सहभागींना संबोधित केले. सर्वांगीण आरोग्य आणि सामाजिक सलोखा वृद्धींगत करण्यासाठी योगसाधनेला दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग बनवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. योगाभ्यासाचे चमत्कार म्हणावेत असे अनेक परिणाम समोर आले आहेत. योगाभ्यासाच्या माध्यमातून अनेक लोकांनी असाध्य आजारांपासूनही मुक्ती मिळवली आहे. भारताच्या लोकांनी या परिवर्तनाचा अनुभव घेतला आहे. आणि आज संपूर्ण जग योग साधनेचा सराव करत असून पारंपरिक औषधोपचाराच्या दिशेने वाटचाल करत आहे असे त्यांनी सांगितले.

सकाळी 05:30 वाजता सर्व सहभागींच्या आगमनाने या कार्यक्रमाची सुरुवात  झाली, त्यानंतर सकाळी 06:30 ते 07:00 या वेळेत पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखवले गेले. कैवल्यधाम इथल्या प्रसिद्ध योग प्रशिक्षक सुनीता देशमुख आणि मृणाल कानिटकर यांनी सकाळी 07:00 ते 07:45 या वेळेत सामान्य योग प्रोटोकॉलसाठी प्रमुख मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन सत्रामुळे योग साधनेचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठीचे परिवर्तनीय लाभही उपस्थितांना समजून घेता आले. या कार्यक्रमात इंडियाटूरिझम मुंबईच्या प्रादेशिक संचालकांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली, त्यानंतर, सामूहिक छायाचित्र आणि अल्पोपाहारानं कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाला पर्यटन मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुमन बिल्ला, भारतपर्यटन - मुंबईचे प्रादेशिक संचालक मोहम्मद फारूक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय सरकारी अधिकारी, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, योग प्रेमी, पर्यटन क्षेत्रातील भागधारक आणि सामान्य नागरिक असे सुमारे 500 जण भारताच्या या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यासाठी एकत्र आले होते. कान्हेरी लेणी परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झालेला हा कार्यकम, योग साधनेच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभांचा प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीने उपयुक्त मंच ठरला.

 

* * *

PIB Mumbai | M.Pange/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2138407)
Read this release in: English