पर्यटन मंत्रालय
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी इंडियाटूरिझम मुंबईच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात घेतला सहभाग
Posted On:
21 JUN 2025 3:50PM by PIB Mumbai
मुंबई, 21 जून 2025
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज, 21 जून 2025 रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या कार्यक्रमात भाग घेतला. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे प्रादेशिक कार्यालय असलेल्या इंडियाटूरिझम मुंबईने बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, मुंबई पोर्ट ट्रस्ट अथॉरिटी आणि भारत स्वाभिमान न्यास (पतंजली) यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळी 6:00 ते सकाळी 8:30 पर्यंत आयोजित या कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारताच्या प्राचीन योग परंपरेला समर्पित हा क्षण एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या भव्य योग सत्रात 4,000 पेक्षा जास्त लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या वर्षीच्या योग दिनाची संकल्पना "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग", संपूर्ण कार्यक्रमात प्रतिध्वनित झाली. ही संकल्पना एकता, शाश्वतता आणि कल्याणाचा संदेश देणाऱ्या भारत सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांसह पर्यटन मंत्रालयाचे उपसचिव इर्शाद आलम, इतर वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर सामील झाले. या सर्वांनी योगाला जागतिक वारसा म्हणून प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या सततच्या वचनबद्धतेला बळकटी दिली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 06:20 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणाने झाली, त्यानंतर कॉमन योगा प्रोटोकॉल (CYP) नुसार एक मार्गदर्शित सामूहिक योग सत्र झाले. तज्ञ प्रशिक्षकांनी प्रत्येक योगासन अचूक पद्धतीने शिकवले. यामुळे समुहात सजगता आणि सुसंवादाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, योग साधक, पर्यटन क्षेत्रातील हितसंबंधी, समाज माध्यमावरील प्रभावशाली लोक, केंद्रीय राखीव पोलीस दल कर्मचारी, भारतीय नौदल अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक यांचा समावेश होता. हा सहभाग योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम अधोरेखित करणारा होता.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 उत्साही आणि प्रेरणादायी बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या करणाऱ्या सर्व सहभागी, सहयोगी आणि समर्थकांचे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने मनापासून आभार मानले.

* * *
PIB Mumbai | M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138383)