आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पत्र सूचना कार्यालय (पीआयबी ), केंद्रीय संचार ब्युरो (सीबीसी), दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या वतीने गोव्यातील पणजी येथे एका विशेष कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

Posted On: 12 JUN 2025 5:29PM by PIB Mumbai

पणजी , 12 जून  2025

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज गोव्यात पणजी येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेनेझेस ब्रगेंझा  इथे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांच्या वतीने योगाभ्यासाविषयी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय संचार ब्युरो (सीबीसी), पत्र सूचना कार्यालय (पीआयबी), दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्राने संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता.

 

 

 

या कार्यक्रमाला गोवा येथील आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राचे उप महासंचालक संदीप श्रीवास्तव,  पत्र सूचना कार्यालयाचे संचालक नाना मेश्राम आणि केंद्रीय संचार ब्युरोचे जनसंपर्क अधिकारी रियास बाबू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

क्यूसीआय-प्रमाणित योग आचार्य गिरीश परुळेकर यांनी या कार्यक्रमातील सत्रात योगाभ्यासाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सहभागींना कॉमन योग प्रोटोकॉलनुसार मार्गदर्शन केले आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या अनेक योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवले.

या कार्यक्रमात नाना मेश्राम यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी भारताच्या प्राचीन योग परंपरेला जागतिक स्तरावर मिळालेली मान्यता आपल्या भाषणातून ठळकपणे अधोरेखित केली. योगाभ्यास ही आता आरोग्यासंबंधीची एक जागतिक चळवळ बनली असल्याचे ते म्हणाले. योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात वृद्धी होते आणि विशेषतः उच्च तणावाच्या स्थितीत काम करणाऱ्या व्यक्तिंसाठी योगाभ्यास लाभदायक असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. 

 

 

 

 

संदीप श्रीवास्तव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात योगाभ्यासाची ऊर्जा देण्याची क्षमता अधोरेखित केली. सर्वांनी,विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांनी, योगाभ्यासाचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करावा असे प्रोत्साहनपर आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात गोवा इथल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी, तसेच स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेतला. हा कार्यक्रम सर्वांगीण आरोग्य प्राप्त करण्याच्या वाटचालीत योगाभ्यासाचा अंतर्भाव करून घेण्याच्या दृष्टीने टाकलेले एक सामूहिक पाऊल म्हणून, तसेच 21 जून 2025 रोजी होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याच्या दृष्टीनेही पूर्वतयारीचा भाग म्हणून यशस्वी कार्यक्रम ठरला.

 

 

S.kakade/T.Pawar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2135977)
Read this release in: English