आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयसीएमआर-एनआयव्ही पुणे यांनी जीनोमिक संशोधन आणि महामारी सज्जतेला चालना देण्यासाठी उच्च कार्यक्षमता कम्प्युटिंग सुविधेचे केले उद्घाटन
Posted On:
31 MAY 2025 8:45PM by PIB Mumbai
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), पुणे येथे त्यांच्या पहिल्या उच्च कार्यक्षमता कम्प्युटिंग (एचपीसी) सुविधेचे उद्घाटन करत देशाच्या सार्वजनिक आरोग्य संशोधन क्षमतांना चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांच्या हस्ते नक्षत्र नावाच्या अत्याधुनिक कम्प्युटिंग क्लस्टरचे अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले.

प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (पीएम-अभिम) अंतर्गत विकसित केलेली ही एचपीसी सुविधा "हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग (एनजीएस) हब" नावाच्या नवीन प्रकल्पाचा कणा आहे. पारंपारिक कम्प्युटिंग पायाभूत सुविधांमुळे कोविड-19 साथरोगादरम्यान भेडसावलेल्या मर्यादांना सामोरे जात, जीनोमिक आणि बायोइन्फॉरमॅटिक्स डेटावर प्रक्रिया करण्यात क्रांती घडवून आणणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
आपल्या उद्घाटन भाषणात डॉ. राजीव बहल यांनी देशाची जीनोमिक देखरेख आणि डेटा विश्लेषण क्षमता मजबूत करून 'विकसित भारत 2047’ संकल्पाच्या दिशेने वेळेत धोरणात्मक पाऊल टाकल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. तंत्रज्ञानाच्या मदतीने साथरोग सज्जता आणि भविष्यातील सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज करण्यात वर्धित कम्प्युटिंग स्रोत किती महत्त्वाचे आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले.
आयसीएमआर-एनआयव्हीचे संचालक डॉ. नवीन कुमार यांनी साथीच्या आजारांना जलद, डेटा-चालित प्रतिसाद देण्यात एचपीसी क्लस्टरची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. बायोइन्फॉरमॅटिक्स अँड डेटा मॅनेजमेंट ग्रुपच्या गटप्रमुख आणि प्रकल्पाच्या प्रमुख संशोधक डॉ. सारा चेरियन यांनी क्लस्टरच्या क्षमता आणि जीनोमिक संशोधनातील या क्लस्टरच्या भूमिकेची सविस्तर माहिती दिली.
Q2ZI.jpeg)
नव्याने सुरू झालेल्या एचपीसी क्लस्टरमध्ये बारा कॉम्प्युट नोड्स आहेत, जे एकूण 700 कोर आणि 1 पेटाबाइट स्टोरेज देतात. पुढील पिढीतील सिक्वेन्सिंग (एनजीएस), ट्रान्सक्रिप्टोमिक्स, फायलोजेनेटिक्स, मेटाजेनोमिक्स आणि स्ट्रक्चरल बायोइन्फॉरमॅटिक्ससह गुंतागुंतीच्या बायोइन्फॉरमॅटिक्स वर्कफ्लोला आधार देण्यासाठी पायाभूत सुविधा तयार केली आहे. सुरुवातीला, ही सुविधा नजीकच्या काळात देशभरातील पाच आयसीएमआर संस्थांना सेवा पुरवेल, डेटा सिक्वेन्सिंगसाठी केंद्रीय भांडार म्हणून काम करेल आणि व्हायरल रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज (व्हीआरडीएल) ला पाठिंबा देईल. यामुळे पुणे येथील संस्था साथीचा तपास आणि साथरोग सज्जतेसाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र बनली आहे, ज्यामध्ये एआय-चालित औषध आणि लस संशोधनाला गती देण्याची क्षमता आहे.
आयसीएमआरच्या अतिरिक्त महासंचालक डॉ. संघमित्रा पाती आणि संसर्गजन्य रोग विभागाच्या प्रमुख डॉ. निवेदिता गुप्ता हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्घाटन समारंभाला आयसीएमआर-एनआयव्हीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि उच्च-कार्यक्षमता संगणन सोल्यूशन तैनात करण्याची जबाबदारी सोपवलेल्या एजन्सी नेटवेब टेक्नॉलॉजीजचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा क्षण भारताच्या आरोग्य संशोधन परिसंस्थेत प्रगत कम्प्युटेशनल पायाभूत सुविधा एकत्रित करण्यात एक महत्त्वाचा टप्पा आहे.
"भारतासाठी याचे महत्व काय"
नक्षत्र एचपीसी सुविधा कार्यान्वित होणे ही केवळ तंत्रज्ञान विषयक सुधारणा नाही तर ती वेग, अचूकता आणि सज्जता यामधील राष्ट्रीय गुंतवणूक आहे. क्लिष्ट जीनोमिक डेटाचे जलद विश्लेषण सक्षम करून, ही सुविधा भारताला नवीन रोगांचे धोके लवकर शोधण्यासाठी, उद्रेकांना अधिक कार्यक्षमतेने प्रतिसाद देण्यासाठी आणि एआय-चालित लस आणि औषध विकासाला गती देण्यासाठी बळ देते. थोडक्यात, हा उपक्रम भारताला सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज बनवतो.
***
M.Pange/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2133084)
अभ्यागत कक्ष : 21