संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाचा वासंतिक प्रशिक्षण 2025 - दीक्षांत पथसंचलन सोहळा

Posted On: 31 MAY 2025 6:14PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाचा वासंतिक प्रशिक्षण 2025 - दीक्षांत पथसंचलन सोहळा आज  31 मे  25 रोजी एझिमला इथल्या भारतीय नौदल अकादमीत आयोजित करण्यात आला होता.  भारतीय नौदल अकदमीच्या प्रशिक्षण अभ्यासक्रम 107 आणि 108, 38 वा भारतीय नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (विस्तारित), 39 वा भारतीय नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (विस्तारित), 40 वा भारतीय नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (नियमित), 41 वा भारतीय नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (तटरक्षक ) च्या 186 प्रशिक्षणार्थींनी प्राथमिक टप्यावरचे आपले प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्ण केले. यामध्ये मित्र देशांचे चार कॅडेट्स होते.

दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल व्ही. श्रीनिवास यांनी परेडचे निरीक्षण केले. या कार्यक्रमाला आयएनएचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल कमोडोर प्रवीण नायर, इतर वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित होते.

भारतीय नौदल अकादमीत बी. टेक अभ्यासक्रमात प्रथम स्थान मिळवल्याबद्दल  मिडशिपमन नकुल सक्सेना यांना राष्ट्रपती सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. टांझानियातील प्रशिक्षणार्थी मिडशिपमन किओन्डो मायकेल फ्लोरेन्स यांना सर्वात आश्वासक कॅडेटसाठी राज्य रक्षा मंत्री चषक प्रदान करण्यात आला. परदेशी कॅडेटची ही महत्त्वपूर्ण कामगिरी भारतीय नौदल अकादमीतील समावेशक आणि जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण वातावरणाचा दाखला आहे. माजी एनडीए प्रशिक्षणार्थींमध्ये गुणवत्तेनुसार प्रथम स्थान मिळवल्याबद्दल मिडशिपमन नितीन एस नायर यांना एफओसी-इन-सी (साउथ) चषक  प्रदान करण्यात आला तर नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (विस्तारित)  आणि नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (नियमित) साठी सीएनएस सुवर्णपदक अनुक्रमे कॅडेट पवार रोहित प्रकाश आणि कॅडेट रजनीश सिंग यांना प्रदान करण्यात आले.  तटरक्षक दल महासंचालक चषक कॅडेट कोम्मू डेव्हिड यांना प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी, संपूर्ण कालावधीत शैक्षणिक, सेवा विषय, बाह्य प्रशिक्षण, कवायत, क्रीडा आणि अभ्यासक्रमेतर उपक्रमांसह विस्तृत प्रशिक्षण उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कमांडंट चॅम्पियन स्क्वॉड्रन बॅनर चीता स्क्वॉड्रनला प्रदान करण्यात आला.

फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चिफ,दक्षिण नौदल कमांड यांनी प्रशिक्षण काळातील निर्दोष कामगिरी, उत्तम लष्करी क्षमता आणि कौशल्यांबद्दल प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले. त्यांनी कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी, पदक विजेते आणि चॅम्पियन स्क्वॉड्रन यांचे अभिनंदन केले. पुनरीक्षण अधिकाऱ्यांनी प्रशिक्षकांच्या प्रयत्नांची आणि पालकांनी दिलेल्या पाठिंब्याची प्रशंसा केली. त्यांनी परदेशी प्रशिक्षणार्थींना सामावून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले, यामुळे केवळ आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत होत नाही तर जागतिक स्तरावर भारताच्या नौदल प्रशिक्षण उत्कृष्टतेचे दर्शन देखील घडते.

पथसंचलन झाल्यानंतर, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चिफ, दक्षिण नौदल कमांड आणि भारतीय नौदल अकादमीचे कमांडंट यांच्यासह इतर मान्यवर आणि आपल्या पाल्यांच्या अभिमानास्पद कामगिरीने भारावलेल्या पालकांनी यशस्वी प्रशिक्षणार्थींना त्यांची भारतीय नौदलात नियुक्ती झाल्याचे निर्देशक असलेले पट्टे हस्तांतरीत केले. कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या कुटुंबांशी त्यांनी संवाद साधला. हे अधिकारी आता नौदलाची विविध जहाजे आणि आस्थापनांमध्ये रुजू होतील, तिथे ते तिथल्या गरजेनुसार विशिष्ट क्षेत्रातील प्रशिक्षण पूर्ण करतील.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2133074)
Read this release in: English , Urdu , Hindi