नौवहन मंत्रालय
भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून जेएनपीएने 36 वर्षे केली साजरी ; वरिष्ठ मान्यवर आणि उद्योग धुरीणांच्या उपस्थितीत वर्धापनदिन केला साजरा
"जेएनपीएचा प्रवास एका बंदराकडून राष्ट्रीय विकासाच्या शक्तिशाली इंजिनापर्यंत झाला आहे. भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून त्याचा उदय त्याच्या परिसंस्थेची ताकद प्रतिबिंबित करतो जी नेतृत्व आणि नवोन्मेषाने प्रेरित आहे." - केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल
Posted On:
26 MAY 2025 8:38PM by PIB Mumbai
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) सोमवार, 26 मे 2025 रोजी आपला 36 वा वर्धापन दिन साजरा करून भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून भारताच्या बंदर परिदृश्यात आपले स्थान पुनर्भाषित केले. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल; केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी के रामचंद्रन यांच्या उपस्थितीत हा प्रमुख कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, "समर्पित सेवेची 36 वर्षे पूर्ण केल्याबद्दल जेएनपीए परिवाराचे मी हार्दिक अभिनंदन करतो. पंतप्रधानांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि 'लोकल टू ग्लोबल' या संकल्पनेतून प्रेरणा घेणारे जेएनपीए केवळ एक बंदर राहिले नाही तर राष्ट्रीय विकासाच्या शक्तिशाली इंजिनमध्ये ते रूपांतरित झाले आहे. भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून त्याचा उदय त्याच्या परिसंस्थेचे सामर्थ्य दर्शवितो, जे नेतृत्व, नवोन्मेष आणि खाजगी क्षेत्राच्या मजबूत सहभागाने प्रेरित आहे. वाढवण बंदरासारखे प्रकल्प भारताला जगातील आघाडीच्या 10 सागरी केंद्रांमध्ये स्थान मिळवून देण्यास सज्ज होत असताना जेएनपीएने एक स्वयंपूर्ण , जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सागरी क्षेत्राच्या निर्मितीतला एक आदर्श म्हणून स्थान निर्माण केले आहे. या विकासाबरोबरच संपूर्ण सागरी उद्योगासाठी नेतृत्व, प्रेरणा आणि दर्जा उंचावण्याची मोठी जबाबदारी देखील येते. आता कृती करण्याची वेळ आली आहे - एकजुटता , नियोजन आणि उद्देशासह भारत जगातील अव्वल 5 सागरी देशांमध्ये स्थान मिळवू शकतो."

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर म्हणाले, “जेएनपीएचा 36 वा वर्धापन दिन हा केवळ एक उत्सव नाही तर बंदर क्षेत्रातील देशाच्या वाढते स्वारस्य आणि आपल्या आर्थिक प्रवासातली त्याची महत्त्वाची भूमिका प्रतिबिंबित करतो. 70% व्यापार आपल्या बंदरांच्या माध्यमातून होत असल्याने, दृष्टीकोनाची स्पष्टता आणि अंमलबजावणीतील ताकद महत्त्वाची आहे. जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय हा निर्णायक नेतृत्व आणि दूरदर्शी विचारसरणी, जेएनपीएच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली त्याच्या चमूने मूर्त रूप दिलेली मूल्ये यांचे फलित आहे. ही विकसित भारताची भावना आहे.”

जेएनपीएचे अध्यक्ष आणि व्हीपीपीएलचे सीएमडी उन्मेष शरद वाघ यांनी सांगितले की, “36 व्या वर्षी, जेएनपीए एका गंतव्यस्थानावर नाही तर सखोल जबाबदारीच्या टप्प्यावर उभा आहे. आमच्या पुढच्या टप्प्यात अधिक तीक्ष्ण प्रणालीची विचारसरणी, जलद निर्णय चक्र आणि जागतिक व्यापार गतिमानतेशी निकटतेने जुळवून घेण्याची आवश्यकता असेल. आम्ही एक बंदर परिसंस्था डिझाइन करत आहोत जी आधुनिक लॉजिस्टिक्सच्या जटिलतेचा अंदाज घेऊन जुळवून घेऊ शकेल आणि आत्मसात करू शकेल. या वर्धापनदिनानिमित्त मागे वळून पाहण्याची संधी मिळाली आहे, परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, पुढील प्रदीर्घ प्रवासासाठी पुनर्तपासणी करण्याची ही संधी आहे.”
या कार्यक्रमात जेएनपीए 36 इयर्स जर्नी कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले, ज्यामध्ये बंदराच्या स्थापनेपासूनच्या कामगिरीचा इतिहास मांडण्यात आला. जेएनपीए कॉर्पोरेट फिल्मच्या विशेष प्रसारणादरम्यान बंदराची पायाभूत सुविधा, नवोन्मेष, शाश्वतता प्रयत्न आणि भविष्यकालीन दृष्टिकोन यांचे दर्शन घडले.
या कार्यक्रमात वाढवण बंदर कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. व्हीपीपीएल आणि सह्याद्री फार्म्स यांच्यात स्वाक्षरी झालेल्या पहिल्या सामंजस्य कराराचा उद्देश लक्ष्यित प्रशिक्षणाद्वारे ग्रामीण युवक, शेतकरी आणि शेती उत्पादक कंपन्यांचे कौशल्य विकसित करणे हा आहे. या सहकार्याचा उद्देश कृषी-लॉजिस्टिक्स मूल्य साखळी मजबूत करणे तसेच उदयोन्मुख संधींसाठी स्थानिक समुदायांना तयार करणे असा आहे.

व्हीपीपीएल आणि रुरल एन्हान्सर्स प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात स्वाक्षरी झालेल्या दुसऱ्या सामंजस्य करारात, कंटेनर, बल्क आणि लिक्विड कार्गो हाताळण्यासाठी वाढवण बंदरातील टर्मिनलच्या विकासात सहभागी होण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट करण्यात आला
आहे. त्यात सागरी सेवांसाठी आधारभूत पायाभूत सुविधा, इंटरमॉडल कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सोल्यूशन्स, मजबूत आयटी पायाभूत सुविधा तसेच संरचित मनुष्यबळ प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे परिसंस्थेची शाश्वतता सुनिश्चित करण्याच्या योजनांचा समावेश आहे. या भागीदारींमुळे वाढवण बंदराला आधुनिक, समावेशक आणि भविष्यासाठी सज्ज असणारे सागरी प्रवेशद्वार म्हणून बांधण्याचा जेएनपीएचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो.

या समारंभाचा समारोप एका पुरस्कार सोहळ्याने झाला. या पुरस्कार सोहळ्यात सागरी आणि लॉजिस्टिक्स उद्योगातील व्यावसायिकांना तसेच जेएनपीए कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी आणि सेवा उत्कृष्टतेसाठी सन्मानित करण्यात आले. जेएनपीएला या उंचीवर पोहोचण्यास मदत करणाऱ्या समर्पणाचे आणि प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी हे पुरस्कार देण्यात आले.
जेएनपीए आपल्या विस्तार योजना आणि स्मार्ट बंदर उपक्रमांसह पुढे जात असताना भारताच्या सागरी व्यापाराला बळकटी देत आहे, तसेच जागतिक व्यापाराचे एक महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून आपले स्थान बळकट करत आहे.
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाबाबत अधिक माहिती :
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. 26 मे 1989 रोजी स्थापना झाल्यापासून, जेएनपीएचे बल्क कार्गो टर्मिनल पासून देशातील प्रमुख कंटेनर बंदरात रूपांतर झाले आहे. जेएनपीए पाच कंटेनर टर्मिनल चालवते - न्हावा शेवा फ्रीपोर्ट टर्मिनल (एनएसएफटी), न्हावा शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), न्हावा शेवा (भारत) गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी), भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) आणि एपीएमटी. बंदरात सामान्य कार्गोसाठी शॅलो वॉटर बर्थ देखील आहे. 277 हेक्टर जमिनीवर वसलेले जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण भारतातील निर्यात-केंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधानी युक्त तसेच अत्यंत कल्पकते ने आरेखित केलेले बहु-उत्पादन सेझ देखील चालवते.
***
JPS/SK/NM/SM/PK
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2131481)
अभ्यागत कक्ष : 49