रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यातील नव्या झुआरी पुलावरील वेधशाळा टॉवर्स व निरीक्षण गॅलरीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन


गोव्याला वास्तुकलात्मक पर्यटनाचे प्रमुख ठिकाण म्हणून उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

प्रविष्टि तिथि: 23 MAY 2025 11:00PM by PIB Mumbai

गोवा, 23 मे 2025

 

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दक्षिण गोव्यातील चिखली ग्राम पंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात गोव्यातील नवीन झुआरी पुलावरील वेधशाळा टॉवर्स व निरीक्षण गॅलरी प्रकल्पाचे भूमिपूजन केले.

हे वेधशाळा टॉवर्स एका खाजगी कंपनीकडून उभारले जातील व यासाठी सरकारला कोणताही आर्थिक खर्च करावा लागणार नाही. उलट, गोवा सरकारला जीएसटीच्या माध्यमातून महसूल मिळणार आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

गडकरी यांनी यावेळी सूचित केले की, या प्रकल्पात उभारली जाणारी निरीक्षण गॅलरी गोव्याच्या पारंपरिक स्थापत्यशैलीत असाव्यात, तसेच त्यामध्ये गोव्याच्या इतिहासासह मुक्तीसंग्रामाची माहिती देणारे ऑडिओ-व्हिज्युअल घटक समाविष्ट केले जावेत. 

बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा महामार्ग हा प्रकल्प येत्या तीन-चार महिन्यांत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होईल; त्यामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास आता फक्त पाच ते सहा तासांत पूर्ण करता येईल, असे गडकरी यांनी सांगितले.

गोव्यातील विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत 33,000 कोटी रुपये खर्च केले असून ते गोव्याच्या अर्थसंकल्पापेक्षा अधिक आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

गडकरी यांनी यावेळी पत्रादेवी ते बेंगळुरु असा अंदाजे 15,000 कोटी रुपये खर्चाचा वळण मार्ग (रिंग रोड) उभारण्याचीही घोषणा केली. ज्यामुळे गोव्यातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल असे ते म्हणाले.

   

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खंबीर नेत्याच्या व नितीन गडकरी यांच्यासारख्या दूरदर्शी नेत्याच्या अढळ पाठिंब्यामुळे गोव्यातील विकासात्मक प्रकल्प प्रत्यक्षात आले आहेत. नव्या झुआरी पुलावरील प्रतिष्ठित वेधशाळा टॉवर्स आणि निरीक्षण गॅलरीचा प्रकल्प लवकरच सुरू होईल. हा गोवेकरांसाठी अभिमानाचा क्षण असेल. राज्य व केंद्रातील डबल-इंजिन सरकारमुळे गोव्यात अटल सेतू तसेच झुआरी पुलासारख्या भव्य पायाभूत सुविधांसारखा विकास पाहत आहोत, असे सावंत म्हणाले व त्यांनी यावेळी गडकरी यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास केंद्रीय ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर, गोवा सरकारचे परिवहन मंत्री मॉविन गुदिन्हो, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, स्थानिक आमदार आणि राज्य सरकारी अधिकारी तसेच चिखली ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

वेधशाळा टॉवर्स व निरीक्षण गॅलरी:

270.07 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार असून, पॅरिसमधील आयफेल टॉवरपासून प्रेरणा घेऊन हे टॉवर्स उभारले जातील. यामध्ये फिरते रेस्टॉरंट, कला दालन (Art Gallery) यांचा समावेश असून, जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ही डिझाइन ओळखली जाणार आहे.

DBFOT (Design, Build, Finance, Operate, Transfer) पद्धतीने हा प्रकल्प उभारला जाणार असून, ज्यामुळे सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. संपूर्ण बांधकाम व 50 वर्षांचा संलग्न कालावधी खाजगी कंपनीकडे असेल. प्रत्येक टॉवर्स 125 मीटर उंचीचा असून, त्यासाठी दोन ‘पाइल कॅप’ पाया उभारले जातील. मनोऱ्याचे आतील माप हे 8.50 मीटर x 5.50 मीटर इतके असेल. वरच्या मजल्यावर 22.50 मीटर x 17.80 मीटर आकाराचे दोन प्रशस्त मजले असतील. कॅप्सूल लिफ्ट्स, निरीक्षण गॅलरी, कॅफेटेरिया तसेच पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी उपलब्ध असतील. पुलाच्या समुद्राकडील भागात दोन्ही बाजूंनी 7.50 मीटर रुंदीचा वॉकवे उभारला जाणार असून, त्यातून पर्यटक सहज फिरू शकतील. पुलाच्या दोन्ही टोकांना पार्किंगचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

हा प्रकल्प गोव्यात पर्यटन व आर्थिक घडामोडींना चालना देईल, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करेल. यामुळे भारताच्या जागतिक पातळीवरील पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रतिमेत भर पडेल. पर्यटन, परिवहन, हॉटेलिंग, किरकोळ विक्री अशा क्षेत्रांना चालना देऊन स्थानिक उद्योजकांना बळ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे वास्तुशिल्प पर्यटनासाठी गोव्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख मिळणार आहे.

 

* * *

PIB Panaji | S.Nilkanth/R.Dalekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 2130932) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English