शिक्षण मंत्रालय
खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि आयुकाचे संस्थापक-संचालक प्रा.जयंत विष्णु नारळीकर यांचे पुण्यात निधन
प्रविष्टि तिथि:
20 MAY 2025 9:39PM by PIB Mumbai
मुंबई, 20 मे 2025
जागतिक ख्यातीचे भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ, द्रष्टे विचारवंत आणि विज्ञानप्रसारक डॉ.जयंत विष्णु नारळीकर यांचे आज (20 मे 2025) पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
पंतप्रधानांनी X वरील आपल्या संदेशात म्हटले आहे,
"डॉ.जयंत नारळीकर यांचे निधन हे वैज्ञानिक समुदायाचे प्रचंड नुकसान आहे. ते विशेषतः खगोलभौतिकशास्त्र क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या संशोधनातील अग्रगण्य कार्य, विशेषतः काही महत्त्वपूर्ण सैद्धांतिक चौकटी, संशोधकांच्या भावी पिढ्यांसाठी अमूल्य ठरतील. एक संस्थापक म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण केली. अनेक शैक्षणिक आणि नवोपक्रम केंद्रांची उभारणी करून त्यांनी युवा मनांना घडविले. सामान्य नागरिकांपर्यंत विज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टीने त्यांच्या लेखनानेही मोलाचे योगदान दिले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचे सांत्वन. ओम शांती."
डॉ. नारळीकर यांनी आपल्या उल्लेखनीय कारकीर्दीत ब्रह्मांडविज्ञान (कॉस्मॉलॉजी) क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले, पारंपरिक वैज्ञानिक मतप्रवाहांना आव्हान दिले आणि सामान्य लोकांपर्यंत विज्ञान पोहोचविण्यासाठी स्वतःला वाहून घेतले. डॉ.नारळीकर हे हॉयेल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे सह-निर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत. हा सिद्धांत आइन्स्टाइनच्या सामान्य सापेक्षतावादाला पर्यायी सिद्धांत मानला जातो. त्यांनी स्थिर अवस्था सिद्धांताचे समर्थन केले.
डॉ.नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापुरात झाला. त्यांच्या कुटुंबाला शैक्षणिक पार्श्वभूमी होती. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण वाराणसी इथे घेतले आणि त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात जाऊन सर फ्रेड होयेल यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पीएच.डी.पूर्ण केली.
1988 मध्ये त्यांनी पुण्यात ‘आयुका’ अर्थात ‘खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र आंतरविद्यापीठा’ची स्थापना केली. आयुकाचे ते पहिले संचालक होते. त्यांनी या संस्थेला भारतातील खगोलशास्त्र संशोधन व प्रशिक्षणासाठी एक अग्रगण्य संस्था बनवले. त्यांच्या अष्टपैलू दृष्टिकोनात उच्च दर्जाचे संशोधन, विद्यापीठ प्राध्यापकांदरम्यान संवाद, पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, आधुनिक निरीक्षण संसाधनांची उपलब्धता आणि शालेय विद्यार्थी व सामान्य जनतेसाठी विज्ञान प्रसाराचा समावेश होता.
डॉ.नारळीकर हे केवळ वैज्ञानिक नव्हते, तर एक उत्कृष्ट लेखक आणि विचारप्रवर्तकही होते. सामान्य जनतेपर्यंत विज्ञान पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी इंग्रजी, हिंदी आणि मराठीत अनेक पुस्तके व लेख लिहिले. त्यांच्या लेखनात आधुनिक विज्ञानावरील ग्रंथांपासून विज्ञानकथा, कादंबऱ्यांपर्यंत विविध प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे.
डॉ.नारळीकर यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. त्यामध्ये पद्मभूषण (1965) आणि पद्मविभूषण (2004) या भारत सरकारच्या अनुक्रमे तिसऱ्या व दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानांचा समावेश आहे. 1996 मध्ये ‘युनेस्को’चा कलिंग पुरस्कार आणि 2004 मध्ये फ्रेंच खगोलशास्त्रीय संस्थेचा प्रि ज्युल्स जँन्सेन पुरस्कार अशा आंतरराष्ट्रीय सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले.
S.kakade/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2130103)
आगंतुक पटल : 56
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English