खाण मंत्रालय
भारतीय खाण ब्युरो तसेच राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात आयोजित महत्त्वपूर्ण खनिजांच्या संदर्भातील चर्चासत्रासाठी हितधारक आले एकत्र
Posted On:
10 MAY 2025 9:35PM by PIB Mumbai
नागपूर, 10 मे 2025
भारतीय खाण ब्युरो (आयबीएम) तसेच राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (एनएमडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने काल, 09 मे 2025 रोजी नागपुरात “खाणींचे अवशेष आणि कचरा यांमधून मह्त्वपूर्ण खनिजांचे उत्खनन: संधी आणि आव्हाने” या विषयावर आधारित सीएमईएमटी-2025 या एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. भारतातील खनिकर्म आणि खनिजे उद्योगांतील तज्ञ तसेच इतर हितधारक यांच्यासह संबंधित नियामक संस्थांचे प्रतिनिधी आणि शिक्षण क्षेत्रातील सदस्य या चर्चासत्रासाठी एकत्र जमले होते.
यावेळी सुमारे 180 सहभागींनी सखोल विचारमंथनपर तांत्रिक सत्रांमध्ये भाग घेतला. यावेळी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, नियामक संस्था, विविध उद्योग तसेच शिक्षणक्षेत्रातील तज्ञांनी 18 विषयांवर आधारित सादरीकरणे प्रस्तुत केली. खाणींतील टाकाऊ भाग/अवशेष/धातू मळी यांमधून महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान खनिजे शोधण्याच्या शक्यता ओळखण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सादरीकरणांचा त्यात समावेश होता.

यावेळी केलेल्या भाषणात महानियंत्रक (आय/सी) पी.एन.शर्मा म्हणाले की जीवाश्म इंधनावर आधारित उर्जेचे युग आता हळूहळू संपत चालले आहे. आता आपण स्वच्छ तसेच खनिजावर आधारित असलेल्या उर्जेचे पर्यायी मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाच्या सशस्त्र दलांनी दाखवलेल्या धैर्याची देखील त्यांनी प्रशंसा केली. “भारतीय सशस्त्र दलांच्या जवानांनी ज्या लवचिकता, शौर्य आणि धैर्याचे दर्शन घडवले त्यासाठी मी त्या सर्वापुढे नतमस्तक होतो. या सैनिकांमुळेच आपण येथे निर्धास्त आणि सुरक्षितपणे बसलो आहोत,” असे शर्मा म्हणाले.
“खनन उद्योग, प्रक्रिया उद्योग, संबंधित उद्योग आणि संशोधन क्षेत्रातील लोकांसाठी एकत्र येऊन, आपल्याकडून अपेक्षित असलेले कार्य करण्यची हीच योग्य वेळ आहे. आपल्याला एक मोहीम आखून दिलेली आहे आणि आपण लष्कराच्या अचूकतेने त्यासाठी कार्य करायचे आहे. एकत्रितपणे आपण हे साध्य करू शकू,” असे ते पुढे म्हणाले.
खाण विभागाचे मुख्य नियंत्रक पंकज कुलश्रेष्ठ यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे महत्त्वपूर्ण खनिजांचा पुरवठा सुरक्षित करण्याच्या पर्यायी पद्धतींच्या शोधाचा मार्ग मोकळा झाला आहे. आयबीएमच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर देखील त्यांनी प्रकाश टाकला. सदर प्रकल्पाच्या माध्यमातून देशभरातील अडीचशे खाणींतून सुमारे दीड हजार नमुने आधीच संकलित करण्यात आले आहेत. खाणींतील टाकाऊ भाग/अवशेष/मळी यांतून गोळा केलेल्या या नमुन्यांचे विश्लेषण करून त्यामध्ये महत्त्वाची खनिजे मिळण्याच्या शक्यतेची चाचपणी करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण खनिज क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी भक्कम चौकट स्थापित करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियानाला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
चर्चासत्राचे शिल्पकार एस.के. अधिकारी, प्रमुख खनिकर्म भूगर्भशास्त्रज्ञ, आयबीएम यांनी नमूद केले की अन्वेषण आणि वापर यामध्ये खूप मोठी तफावत आहे परिणामी सरकारने आपले लक्ष दुसरीकडे वळवले आहे. "लवकरच आपण आपल्या देशातील खाणींमध्ये पडून असलेल्या उर्वरित अवशेषांपासून काही महत्वपूर्ण खनिजे शोधण्यास सुरुवात करू शकू," असे ते पुढे म्हणाले.
एनएमडीसी लिमिटेडचे कार्यकारी संचालक एम. जयपाल रेड्डी यांनी संयुक्तरीत्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या आयोजनाचा प्रस्ताव दिल्याबद्दलआयबीएमचे आभार मानले. ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठीच्या महत्वपूर्ण खनिजांसाठी सुरुवातीला खूप वेळ लागतो आणि ती खाणीतून काढणे खूप आव्हानात्मक असते. दुय्यम स्त्रोतांमधून महत्वपूर्ण खनिजे काढण्यासाठी आणि खाणीतील उर्वरित अवशेष आणि कचऱ्यामधून आधीच साचलेल्या साहित्यातून खनिजे काढून घेता येऊ शकतील हे या चर्चासत्रामुळे स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.
चर्चासत्रात करण्यात आलेल्या शिफारशींमुळे देशाच्या महत्वपूर्ण खनिजांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होईल, असे एमओआयएल चे संचालक (उत्पादन आणि नियोजन) एम.एम. अब्दुल्ला यांनी सांगितले.

डेलोइट इंडिया चे भागीदार राजीव मैत्रा यांनी बीजभाषण केले. अन्य उल्लेखनीय वक्त्यांमध्ये डॉ अब्दुल रौफ शेख, मुख्य शास्त्रज्ञ, CSIR-IMMT, भुवनेश्वर; चंद्रकला कारी, मुख्य शास्त्रज्ञ, धातू आणि खाण, HINDALCO; अभिनव सेनगुप्ता (पीडब्ल्यूसी वन कन्सल्टिंग); निरज कुमार पांडा (AMD); केशव सी. मंडल (एचसीएल); गजानन यू. कापुरे (टाटा स्टील), डॉ. उपेंद्र सिंग (जेएनएआरडीडीसी), मोहम्मद दस्तगीर (एमईसीएल) यांचा समावेश होता.
तांत्रिक सत्राच्या नियंत्रकांपैकी पंकज सतीजा, कार्यकारी-प्रभारी, FAMD, टाटा स्टील; रामा रमण सतपथी, कार्यकारी संचालक, एक्सप्लोरेशन आणि बेनिफिशेशन, लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि वाय.जी. काळे, खाण नियंत्रक (मध्य विभाग), आयबीएम यांनी आभार मानले.
आयबीएमच्या सहाय्यक संपादक सृष्टी सिंग यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला JNARDDC चे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
* * *
PIB Mumbai | S.Kane/Sanjana/Manjiri/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2128124)