संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सुदर्शन चक्र सैनिक तुकडीच्या परिचालनात्मक सज्जतेचा घेतला आढावा घेतला आणि निवृत्त सैनिकांना केला गौरव

Posted On: 17 APR 2025 8:40PM by PIB Mumbai

पुणे, 17 एप्रिल 2025

 

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज लष्करातील सुदर्शन चक्र तुकडीच्या परिचालनात्मक सज्जतेचा समग्र आढावा घेऊन उच्च प्रतीची लढाऊ सज्जता, नवोन्मेष आणि व्यावसायिक उत्कृष्टतेप्रती भारतीय लष्कराच्या सशक्त वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या भेटीदरम्यान त्यांना लष्कराचे सध्या सुरु असलेले उपक्रम तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा समावेश याविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या सैन्याच्या तुकड्यांशी द्विवेदी यांनी संवाद साधला आणि परिचालनात्मक कार्यक्षमता, अनुकुलनात्मक प्रशिक्षण आणि युद्धक्षेत्रासंबंधी नवोन्मेष यावर सैनिकांनी लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.  

लष्करातील पाच दिग्गजांचा व्हेटरन अचिव्हर पारितोषिक देऊन सन्मान हा लष्करप्रमुखांच्या या भेटीचा उत्कर्षबिंदू होता. समाज आणि राष्ट्र-उभारणीप्रती हे पाच जण देत असलेल्या योगदानाचा सोहळा साजरा करत त्यांचा गौरव करण्यात आला.

ब्रिगेडियर रामनारायण विनायक, (निवृत्त) विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित: निवृत्त सैनिकांच्या कल्याणासाठी सक्रियतेने कार्य करणाऱ्या ब्रिगेडियर रामनारायण यांनी  पुनर्वसन महासंचालनालयाद्वारे (डीजीआर)पुरस्कृत  सुरक्षा एजन्सी स्थापन करून त्याद्वारे 300 हून अधिक निवृत्त सैनिकांची नेमणूक केली, सन 1962, 1965 आणि 1971 या वर्षी झालेल्या युद्धांमधील वीर नारींना माजी-सैनिकांच्या योगदानात्मक आरोग्य योजनेचा (ईसीएचएस) लाभ मिळवून दिला तसेच उदारीकृत कुटुंब निवृत्तिवेतनाच्या मुद्द्याची बाजू उचलून धरली. ते त्यांच्या पत्नीसह शौर्य स्मारक येथे शैक्षणिक सादरीकरणे करुन शूरवीरांच्या वारशाचा प्रचार करतात.

कर्नल वैभव प्रकाश त्रिपाठी (निवृत्त): मध्य प्रदेश माजी सैनिक लीगचे उपाध्यक्ष म्हणून ते बेतुल येथे निवृत्त सैनिकांद्वारे संचालित ओजस शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेशी जोडलेले आहेत. ही संस्था संरक्षण दलांमध्ये प्रवेश करण्याची आकांक्षा असलेल्या आदिवासी युवकांना आवश्यक शिक्षण आणि प्रशिक्षण देते.

कर्नल के पी सिंग (निवृत्त): माजी सैनिक तसेच शहिदांच्या विधवांना कायदेशीर पाठबळ पुरवण्यासाठी सुप्रसिध्द असलेले कर्नल के पी सिंग बायोमेट्रिक पद्धतीने जीवन प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभतेने होण्यासाठी आणि स्पर्श या सैनिकांच्या निवृत्तीवेतनविषयक प्रणालीबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करतात

नाईक अनिल कुमार वर्मा (निवृत्त): वर्मा यांनी त्यांच्या वडिलोपार्जित घराचे रुपांतर मुलींसाठीच्या वसतिगृहात केले. तसेच त्यांनी विलासपूर येथे वंचित आदिवासी मुलांसाठी शाळा उभारली असून या शाळेतील मुलांनी बोर्डाच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.

लान्स दफादार प्रदीप कळसकर (निवृत्त): निवृत्त सैनिकांच्या निवृत्तीवेतनसंबंधी आणि आर्थिक समस्या सोडवण्यात हिरीरीने मदत करतात.

ही पारितोषिके भारतीय लष्करातून निवृत्त झालेले कर्मचारी आणि समाजावर ते टाकत असलेल्या प्रभावाप्रती लष्कराच्या दृढ आदराला अधोरेखित करतात. 

या भेटीच्या अखेरीला जनरल द्विवेदी यांनी भारतीय लष्कराचे शौर्य आणि इतिहासाची माहिती सांगणाऱ्या योद्धास्थळाला भेट दिली. नागरी-लष्करी सहकार्याला चालना देऊन आगामी पिढ्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने एक चित्ताकर्षक तसेच शैक्षणिक अनुभव देणारे स्थान या रुपात या स्थळाची उभारणी करण्यात आली आहे.

 

* * *

PIB Pune | N.Chitale/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2122556) अभ्यागत कक्ष : 41
Read this releasein: English