पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'जागतिक वारसा दिनानिमित्त इंडिया टुरिझम द्वारे कान्हेरी केव्हज् येथे स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 16 APR 2025 9:55PM by PIB Mumbai

मुंबई, 16 एप्रिल 2025

 

सांस्कृतिक वारसा जतन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 18 एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. 2025 या वर्षातील जागतिक वारसा दिवस साजरा करण्यासाठी इंडिया टुरिझम मुंबई, या भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) आणि मॅरियट एक्झिक्युटिव्ह अपार्टमेंट नवी मुंबई यांच्या सहयोगाने, इंडिया टुरिझम मुंबईतर्फे उद्या, गुरुवार, 17 एप्रिल 2025 रोजी कान्हेरी केव्हज, मुंबई येथे स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9:00 वाजता स्वच्छता मोहिमेने कार्यक्रमाची सुरुवात होईल, त्यानंतर वृक्षारोपण सोहळा होईल. या कार्यक्रमात इंडिया टुरिझम मुंबई, एएसआयचे अधिकारी आणि मॅरियट एक्झिक्युटिव्ह अपार्टमेंटचे कर्मचारी सहभागी होतील. या उपक्रमानंतर एएसआय च्या मार्गदर्शनाखाली सर्व सहभागींसाठी कान्हेरी केव्ह्जचा दौरा आयोजित केला जाईल.

 

कान्हेरी केव्ह्ज

मुंबईत बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वसलेल्या कान्हेरी गुंफा, हे एक मनोहारी  ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय स्थळ असून, या ठिकाणी बसाल्ट खडकात कोरलेल्या 100 पेक्षा जास्त गुंफा आहेत. ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंतच्या काळात ही लेणी बौद्ध मठ (विहार) आणि प्रार्थना गृह (चैत्य) म्हणून वापरली जात होती. एकेकाळी बौद्ध धर्माचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र असलेल्या या वास्तूने शिक्षण, ध्यान धारणा आणि प्राचीन काळातील व्यापारी मार्गांवरील थांबा म्हणून महत्वाची भूमिका बजावली. 

पर्यटकांना या ठिकाणी गुंतागुंतीचे कोरीव काम, बुद्धमूर्ती, ब्राह्मी, देवनागरी आणि पाली लिपीतील शिलालेख, तसेच पाण्याचे टाके, खडकात कोरलेले बेंच आणि एक विशाल स्तूप पाहता येईल, जो या स्थळाच्या स्थापत्य शास्त्रीय आणि आध्यात्मिक वारशाचा दाखला आहे. 

भारताचा वारसा जतन करण्याबरोबर आपल्या पुरातन वारसा स्थळांची स्वच्छता आणि पर्यावरण विषयक शाश्वततेला प्रोत्साहन देण्याप्रति असलेली भारत सरकारची वचनबद्धता या उपक्रमामधून अधोरेखित होते.    

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2122279) आगंतुक पटल : 51
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English