ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
सुवर्णालंकारांच्या हॉलमार्किंगची 25 वर्षे साजरी करण्यासाठी मुंबईत आयोजित रत्न आणि आभूषण प्रदर्शनाला केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची उपस्थिती
भारतीय मानक संस्था आणि अखिल भारतीय देशांतर्गत रत्न आणि आभूषण परिषदेच्या सहकार्याने नॉन-डीस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगसाठी हॅकेथॉनची घोषणा
Posted On:
08 APR 2025 6:40PM by PIB Mumbai
मुंबई, 8 एप्रिल 2025
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज प्रतिष्ठित इंडिया रत्न आणि आभूषण प्रदर्शनाचे (जीजेएस) आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतात सोन्याच्या आभुषणांच्या हॉलमार्किंगला 25 वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा देखील साजरा करण्यात आला. सोन्याच्या आभुषणांचे हॉलमार्किंगची सुरुवात हा या उद्योग क्षेत्रातली गुणवत्ता, पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास सुनिश्चित करणारा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. 4 ते 7 एप्रिल 2025 दरम्यान चालणारा हा कार्यक्रम, या उद्योग क्षेत्राची सर्वोच्च उद्योग संस्था असलेल्या अखिल भारतीय रत्न आणि आभूषण देशांतर्गत परिषद (जीजेसी) या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी प्रल्हाद जोशी यांनी उपस्थितांना संबोधित केले. हॉलमार्किंगचा अवलंब करण्यासाठी सराफांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. हॉलमार्किंगने सोन्याच्या आभुषणांसाठी एक विश्वासार्ह बाजारपेठ म्हणून भारताचे स्थान बळकट करण्यासोबतच ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. सराफांसाठी हॉलमार्किंग अनुपालन सुलभ करण्याबाबत आणि ते ग्राहकांच्या हिताच्यादृष्टीने अधिक सुव्यवस्थित करण्याबाबत केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काही प्रमुख सराफा आणि व्यापार प्रतिनिधीनी हॉलमार्किंगच्या अवलंबाच्या यशोत्सव साजरा करत, हॉलमार्किंगमुळे खरेदीदारांच्या हिताचे होत असलेले रक्षण आणि त्याचवेळी जागतिक आभूषण बाजारपेठेत भारताची वाढलेली निर्यात याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रमुख सराफा, उद्योग क्षेत्रातले भागधारक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी आपल्या सहभागाने हा सोहळा यशस्वी केला.

भारतीय रत्न आणि आभूषण उद्योग हा आपल्या राष्ट्राच्या वारशाचा आधारस्तंभ आहे आणि तो कायमच देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देत राहील असे मत प्रल्हाद जोशी यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना व्यक्त केले. भारतीय मानक संस्थेच्या (BIS) स्वतःच्या मालकीच्या आणि मान्यताप्राप्त 650 पेक्षा जास्त प्रयोगशाळा आहेत आणि ग्राहकांना गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळतील यावर भर देत संस्थेने देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला विस्तार वाढवला असल्याचे त्यांनी सांगितले. एचयुआयडी (HUID) चा गैरवापर होणार नाही याची सुनिश्चिती करण्यासाठी योग्य व्यवस्था विकसित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. सर्व भागधारकांच्या संयुक्त प्रयत्नांतून आपण सगळ्यांनीच संपूर्ण भारतात ॲसेइंग हॉलमार्किंग केंद्रांची (AHC) संख्या वाढवण्यावर भर देऊ या असे आवाहन त्यांनी केले. सध्या अनिवार्य योजनेत 361 जिल्ह्यांचा समावेष असून, यावर्षी ही संख्या 500 जिल्ह्यांपर्यंत पोहोचण्याचे परस्पर सामायिक लक्ष्य आपण ठेवू या असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांच्या व्यवसाय सुलभतेच्या दृष्टिकोनाला अनुरूप आपले मंत्रालय या उद्योगक्षेत्राला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी तत्पर असल्याचे ते म्हणाले. भारतीय मानक संस्था, अखिल भारतीय रत्न आणि आभूषण देशांतर्गत परिषदेच्या सहकार्याने सोन्याच्या आभुषणांसाठी मोठ्या व्याप्तीची, किफायतशीर आणि हानी न पोहोचवणारी चाचणी प्रक्रिया विकसित करण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण आणि व्यावहारिक उपाययोजनांच्या कल्पना मांडण्यासाठी राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

अखिल भारतीय रत्न आणि आभूषण देशांतर्गत परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रल्हाद जोशी यांचे या कार्यक्रमात स्वागत करताना अत्यंत अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांची उपस्थिती या उद्योग क्षेत्राला सरकारकडून मिळणाऱ्या पाठबळाचीच साक्ष असल्याचे ते म्हणाले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी प्रल्हाद जोशी ह्यांचे मनापासून आभार मानले. एक उद्योग म्हणून, आम्हाला आमच्या पारदर्शकतेचा आणि पिढ्यानपिढ्या प्रमाणित असलेल्या आपल्या सोन्याच्या विश्वासार्ह वारशाचा खूप अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्र्यांनी आज केलेली हॅकेथॉनची घोषणा या उद्योग क्षेत्राच्या वाटचालीतील एक नवीन अध्याय सुरू करेल आणि आपणही या क्षेत्राच्या भविष्याबद्दल अत्यंत सकारात्मक आहोत असे ते म्हणाले. आपण एकत्रितपणे उज्ज्वल भविष्यासाठी शुद्धता, विश्वासार्हता आणि नवोन्मेषाची परंपरा जपत राहू असे त्यांनी सांगितले.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2120149)
अभ्यागत कक्ष : 56